Kohala Puja : अंबाबाईची गजारुढ रुपातील अलंकार पूजा

Kohala Puja

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा बांधली आहे. अंबाबाई देवी लवाजम्यासह टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबुली देवीला हत्तीवर बसून भेटायला जात असल्याचे अनुभुती या पूजेतून भाविकांना मिळाली. दरम्यान आज टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याचा विधी अलोट भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. (Kohala Puja)

करवीर माहात्म्यातील  कथेप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूराचा वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव राहील.  दरवर्षी तुझ्या नावाने कोहळा बळी दिला जाईल आणि या क्षेत्राला गयेचे पावित्र्य मिळेल.  त्याला अनुसरून देवी कोहळा फोडण्याचा सोहळा आपल्या मुक्ती मंडपात करत असे.  पुढे कोल्हासूराचा नातू कामाक्ष याने कपिलमुनींकडून योगदंड मिळवून  अंबाबाई सह सर्व देवतांचे रूपांतर बकऱ्यामध्ये करून दिले. त्यावेळेला मांगले गावच्या भार्गव आणि विशालाक्षी या दांपत्याची कन्या असणारी, त्रिकाळ पाण्यामध्ये राहून देवीच्या सुवर्ण कमळाचे रक्षण केले म्हणून त्र्यंबोली नावाने ओळखली जाणारी सखी कुबेराच्या पुत्राकडे कोहळा फोडण्याच्या  विधीसाठीचे साहित्य आणायला गेल्याने वाचली होती. तेव्हा नारदा कडून तिला या गोष्टीची बातमी कळतात तिने चतुराईने कामाक्ष दैत्याकडून योगदंड काढून घेतला आणि त्याचेच रूपांतर बकऱ्यांमध्ये केले. त्यानंतर अंबाबाईसह सर्व देवांची मुक्तता केली. (Kohala Puja)

या आनंदात देव त्र्यंबोलीला विसरले म्हणून त्र्यंबोली रागाने शहराबाहेरच्या टेकडीवर येऊन शहराकडे पाठ करून बसली.  तेव्हा अंबाबाई देवांसह तिच्या भेटीला आली आणि तिने तिला वरदान दिले की आजपासून तू या क्षेत्राची संरक्षक देवता आहेस जो कोणी व्यक्ती तुला सांगितल्या वाचून पुण्य कर्म करेल तर त्याचे पुण्यफल घेण्याचा अधिकार तुझा असेल. याखेरीज जो कुष्मांडभेदनाचा सोहळा माझ्या मुक्ती मंडपात होतो तो यापुढे तुझ्यासमोर होईल.  मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईल.  या वरदानाला अनुसरून आज करवीर निवासिनी त्र्यंबोली भेटीसाठी गेली. आजची पूजा विनय चौधरी, संजय फडणीस, मकरंद मुनेश्वर आणि उमेश उदगावकर यांनी बांधली. (Kohala Puja)

भर पावसात कोहळा फोडण्याचा विधी

आज सकाळपासून कोल्हापुरात पावसाची संततधार होती. सकाळी साडेनऊ वाजता तोफेची सलामी झाल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील भवानी देवीची पालखी लवाजम्यास त्र्यंबोली देवीच्या भेटीस निघाली. मार्गावर भाविकांनी फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत केले. भर पावसात भाविकांचा उत्साह होता. शाहू मिल आणि टाकाळा येथे पालख्या विसाव्यासाठी थांबल्या. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पालख्या टेंबलाई टेकडीवर पोहोचल्या. देवीची उत्सवमूर्ती  आणि त्र्यंबोली यांची भेट झाल्यानंतर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि यौवराज शहाजीराजे श्रीमंत यशराज राजे यांनी त्र्यंबोलीचे दर्शन घेऊन आरती केली. मंडपात असलेल्या गुरव पुजारींच्या घरातील कुमारीकेची पूजा केली आणि बावडा गाव कामगार चावडीच्या त्रिशूलाने कोहळा फोडला. फोडलेल्या कोहळ्याचे तुकडे मिळवण्याची भाविकांची झुंबड उडाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी टेंबलाई टेकडीवर मोठी गर्दी केली होती.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर