भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असून जो रुटच्या फलंदाजीला चांगलाच बहर आला आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्डवर कसोटी कारकीर्दीतील त्याने ३८ वे शतक झळकावले. राहूल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंगला मागे टाकत क्रिकेटच्या इतिहात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जो रुटच्या पुढे फक्त आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे. (Joe Root)
सतीश घाटगे
१५७ कसोटी खेळणारा रुटने ३८ शतके झळकावत १३ हजार ४०९ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा सचिन तेंडूलकरच्या १५ हजार ९२१ आहेत. तेंडूलकरच्या धावांची बरोबरी करण्यासाठी रुटला अजून अंदाजे २५०० हजार धावांची गरज आहे. त्यासाठी मोठी वाटचाल करावी लागणार आहे. पण ३८ वे शतक झळकावून रुटने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
जोसेड एडवर्ड रुट असे त्याचे पूर्ण नाव असून ३० डिसेंबर १९९० मध्ये त्याचा जन्म झाला आहे. ३४ वर्षीय रुटची उंची पाच फूट दहा इंच इतकी आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि कधी कधी उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजीही करतो. टॉप ऑर्डर बॅटस् मन असलेला रुटने सलामीसह मधल्या फळीत उपयुक्त फलंदाजी केली आहे. कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० मध्ये त्याने आपली चमक दाखवली आहे. १३ डिसेंबर २०१२ मध्ये भारताविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो इंग्लंडचा ६५५ वा खेळाडू होता. २०१३ मध्ये भारताविरुद्ध तर टी-२० मध्येही भारतीय संघाविरुद्धच त्याने पदार्पण केले.
रुट हेलेन आणि मॅट रुट यांचा मोठा मुलगा असलेला जो रुटने लहान भावांसोबत क्रिकेटचे धडे गिरवले. इंग्लीश कौंटीमध्ये यॉर्कशायरकडून त्याने खेळण्यास सुरुवात केली. त्याची खेळातील प्रगती पाहून २०१२ २०१३ मध्ये भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत माजी अष्टपैलू पॉल कॉलिंगवूडकडून त्याने इंग्लंडची कॅप स्वीकारली. सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने २२९ चेंडूत ७३ धावा केल्या. भारतातील यशस्वी दौऱ्यानंतर न्यूझिलंडच्या दौऱ्यासाठी त्याची कसोटी क्रिकेटमध्ये निवड झाली. त्यापूर्वी त्याने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये निवड झाली होती. या दौऱ्यात त्याने हेडिंग्लेच्या घरच्या मैदानावर पहिले शतक झळकावले. १६७ चेंडूत त्याने १०४ धावा केल्या. अशेस मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीह केली. परतीच्या ऑस्ट्रेलियातील अशस मालिकेत त्याची डाळ शिजली नाही. चार कसोटीत तो १९० धावाच करु शकला. (Joe Root)
जो रुटने आपल्या शैलीदार फलंदाजीने सर्वांना मोहित केले. एकाद्या सामन्यात बाद झाल्यानंतर पुढच्या डावात जुन्या चुका सुधारुन नव्याने खेळण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांना भावतो. त्याने कसोटी, एक दिवसीय सामन्यात सातत्य दाखवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो इंग्लंड संघांचा कणा आहे. त्यांच्या कारकीर्दीकडे नजर टाकले की लक्षात येते. १५६ कसोटीत त्याने १३ हजार ४०९ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३८ शतके आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. २६२ ही रुटची सर्वोत्तम धावसंख्या आहे. फलंदाजीची सरासरी ५१.१८ अशी सरासरी आहे. मैदानावर जमलेली जोडी फोडण्यासाठी त्याला गोलंदाजी दिली जाते. त्याने ७३ बळी मिळवले आहेत. आठ धावात पाच गडी बाद करण्याची किमयाही त्याने केली आहे. तो स्लीपमध्ये चपळ क्षेत्ररक्षक आहेत. २११ झेल त्याने टिपले आहेत.
कसोटी क्रिकेटबरोबर एकदिवसीय सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सरासरी ४९.१४ अशी आहे. १८ शतके आणि ४२ अर्धशतके झळकावात ७१२६ धावा केल्या आहेत. त्याने २८ बळी मिळवले असून ५२ धावात ३ बळी ही त्याची एकदिवसीसी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी आहे.
रुटच्या खेळात संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजी तो उत्तम खेळून काढतो. त्याच्या खेळात सातत्य असल्याने २०२७ पर्यंत तो सचिन तेंडूलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल असे माजी इंग्लीश खेळाडूंचे मत आहे. तेंडूलकरांच्या धावांची बरोबरी रुट करणार का हे काळच ठरवणार आहे. (Joe Root)