मँचेस्टर : तळच्या फलंदाजीच्या साथीने कर्णधार बेन स्टोक्सने तडाखेबाज शतक ठोकत भारत इंग्लंड क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभारला. स्टोक्सने ११ चौकार आणि तीन षटकार ठोकत १४१ धावांची दणदणीत खेळी केली. त्यांना बायडन कार्सची चांगली साथ मिळाली. त्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करत ४७ धावां केल्या. (Ben Stokes)
मँचेस्टर मधील ओल्ड ट्रॅफर्डवर कालच्या ७ बाद ५४४ धावसंख्येवरुन इंग्लंडने डाव सुरू केला. जसप्रित बुमराहने लायम डॉसनला क्लिन बोल्ड केले. त्याने २६ धावा केल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने ख्रिस वोक्सची ४ यष्टी वाकवली. भारतीय गोलंदाज इंग्लंडचा डाव संपवतील असे वाटत असताना बेन स्टोक्स आणि बायडन कार्सने भारतीय फलंदाजांची पिसे काढली. दोघांनी वेगवान आणि फिरकी गालंदाजी धुवून काढली. बेन स्टोक्सने शतक ठोकल्यानंतर धुवॉंधार फलंदाजी केली. दोघांनी नवव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी केली. स्टोकसची धुवांधार फलंदाजी रवींद्र जडेजाने खंडीत केली. साई सुदर्शनने त्याचा झेल घेतला. १९८ चेंडू खेळून काढताना ११ चौकार आणि तीन षटकार खेचत १४१ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर बायडन कार्सलाही जडेजाने बाद केले. मोहम्मद सिराजने त्याचा झेल टिपला. ५४ चेडूत ४७ धावा करणाऱ्या कार्सने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. इंग्लंडने भारतावर ३११ धावांचे अधिक्य मिळवले. (Ben Stokes)
इंग्लंडचे तीनशे धावांहून अधिक लिड घेऊन दुसऱ्या डावात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. ख्रिस वोक्सने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन फलंदाज बाद करत भारताला धक्का दिला. यशस्वी जयस्वाल झेल स्लीपमध्ये टिपला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर साई सुदर्शन तंबूत परतला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या २ बाद १ अशी होती. (Ben Stokes)
उपहारानंतर के.एल.राहूल आणि शुभमन गिल ही जोडी मैदानात उतरली. जोफ्रा आर्चरच्या वेगवान गोलंदाजीवर शुभमन गिलच्या विरोधात पायचितची दोन अपिल करण्यात आली. एका रिव्ह्यू मध्ये चेंडू बॅटला लागल्याने तो वाचला. त्यानंतर दोघांनी अतिशय सावध फलंदाजी केली. कर्णधार शुममन गिलने खराब चेंडू सीमापार धाडले. तर दुसऱ्या बाजूला के.एल. राहूल खेळपट्टीवर नांगर टाकून बसला होता. शुभमन गिलने अर्धशतक साजरे केले. त्याने आठ चौकार सीमापार धाडले. दोघांनी भारताचे शतक फलकावर लावले. के.एल. राहूल ४१ धावांवर खेळत होता. (Ben Stokes)