मुंबई : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. लोकभवनातील दरबार हॉल हा कार्यक्रम झाला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. (Jishnu Dev Verma to join as Governor of Maharashtra)
जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल ठरले आहेत. गेल्यावर्षी १२ सप्टेंबरला तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर गेल्या शुक्रवारी या पदावर जिष्णू वर्मा यांची नियुक्ती राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली.
शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, मुंबईतील विद्यापीठांचे कुलगुरु, राजशिष्टाचार सचिव राजेश गावंडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. (Jishnu Dev Verma to join as Governor of Maharashtra)
नुतन राज्यपालांचा परिचय
३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची तेलंगणाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी वित्त, ग्राम विकास व ऊर्जा खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे.
आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असलेले जिष्णु देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक होते आणि संस्थेच्या ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक होते. ते उत्तम लेखक व कवी देखील आहेत. (Jishnu Dev Verma to join as Governor of Maharashtra)