…अवघड बाब आता अशी झाली होती की चिंपाझींना लंगूर व मॅकाक माकडांचे हे गठबंधन खूप “कट्टरपंथी” व आव्हानात्मक वाटत होते. या अशा उघड व छुप्या प्रकारच्या अनेक गठबंधनांमुळे माकड व वानर प्रजातींमध्ये मोठाच वैचारिक व कार्यकारी गोंधळ माजला होता. याचा परिणाम असा झाला की अनेक तरुण मर्कटांना हे सर्व प्रकार निरर्थक वाटू लागले होते. काही विद्रोही व आक्रमक युवा मर्कटांचे मत होते की वाघ, कोल्हे व तरस हे आपले खरे शत्रू आहेत. यांच्याविरूद्ध सर्व मर्कटांनी एकजूट दाखवायला हवी…(Jakhotia Article)
– डॉ. गिरीश जाखोटिया
मर्कटांची वार्षिक सभा आज भयंकर वादळी होणार होती. तसा भयसूचक संदेश ‘मर्कट भवना’चा हल्ली सदस्य नसलेल्या ‘गिबन’ प्रजातीच्या एका आडदांड वानराने दिला होताच. भवनासमोर अन्य काही गिबन्स आणि थोड्या फितवलेल्या लंगुरांना घेऊन हा आधीच आरडाओरड करू लागला होता. भवनाची सुरक्षा पाहणाऱ्या अजस्त्र गोरिलांनाही हे आवरत नव्हते. मर्कटांमधील दोन प्रमुख प्रजाती म्हणजे वानर आणि माकड. ओरांगउटांग, चिंपाझी, गोरिला, बोनोबो व गिबन्स हे वानर प्रजातीमधील मर्कट. म्यांड्रिल, मॅकाक व लंगूर हे माकड प्रजातीमधले. या दोन्ही समूहांमध्ये एक पारंपारिक वाद कायमचाच होत आलाय – वानरांना माकडे ही ‘लिंबूटिंबू चिरचिरी नि पेद्रू’ वाटतात. माकडांचं म्हणणं असायचं की वानरांचं शरीर मोठंय पण मेंदू लहान. हां, याबाबतीत एक अपवाद होता तो ‘चिंपाझीं’चा. बुद्धिमान चिंपाझी हे माकड आणि वानर असे दोन्ही प्रजातीत वावरतात. चलाख असल्यामुळे ते सोयीस्करपणे दोन्हीकडचे फायदे उचलतात. माकडे व वानरांनी सैद्धांतिक, प्रजातीय आणि अन्य मतभेद विसरून “किमान कार्यक्रमा”वर एकत्र यावे ही चिंपाझींचीच आयडिया होती ! चिंपाझी आणि म्यांड्रिल हे गुप्तपणे वाघ, कोल्हे व तरसांशी संबंध ठेवून असत. रंगीबेरंगी चेहऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारे म्यांड्रिल माकड म्हणजे एक खतरनाक प्रजाती. चेहऱ्याचे रंग बदलत हे आपला सैद्धांतिक मुद्दाही सोयीने बदलत. चिंपाझी आणि म्यांड्रिलने वाघांसोबत एक गुप्त तह केला होता. आपल्यातीलच दुर्बळ, एकेकट्या, म्हाताऱ्या किंवा स्वाभिमानी मर्कटांना खाद्य म्हणून हे वाघांकडे चलाखीने सुपूर्द करीत स्वतःच्या कुटुंबियांना वाचवत. चिंपाझींनी तर हुशारीने म्यांड्रिलनाही न सांगता एक अगदीच “आतला” करार वाघांसोबत केला होता. गरज पडलीच तर या करारानुसार काही म्यांड्रिल हे वाघांना गुप्तपणे खाद्य म्हणून चिंपाझीतर्फे पाठवले जात. (Jakhotia Article)
आजच्या वादळी सभेत तसे काही खूप गंभीर विषय पटावर येणार होते. काही मस्तवाल हत्ती हल्ली “बोनोबो” वानरांच्या क्रियाशील सहकार्याने डेरेदार वृक्षांची नासधूस करु लागले होते. असे करताना बोनोबोंचे एक घोषवाक्य असायचे – “वनसंवर्धनासाठी जुनी डेरेदार झाडे नष्ट केली पाहिजेत. नव्या झाडांना संधी मिळाली पाहिजे.” या सगळ्या उपद्व्यापामुळे “ओरांगउटांग” वानरे मात्र खूप चिडलेली होती. या ‘शाकाहारी’ वानरांनी आता चिंपाझींसोबत नव्याने घरोबा केलेला होता. काही गोरिलांची तक्रार वेगळीच होती. त्यांच्यामते चिंपाझी हे वानर व माकड असे दोन्हीकडचे असल्याने “जातसंकर” नावाचा जिहाद चालवत होते. गोरिलांना त्यांचा आकार मोठा असूनही हल्ली कुणी फारसे जुमानत नव्हते. या साऱ्या गोंधळात “मॅकाक” जातीतील माकडांचं कुणीही ऐकत नव्हतं. ह्यांचा अनुवंशशास्रीय दावा होता की हे बर्फाळ प्रदेशात रहात असल्याने अत्यंत “शुद्ध प्रजाती”चे होते आणि खूप पवित्रही होते. चिंपाझी व गोरिलांना मात्र “शुद्ध प्रजाती” हीच एक मोठी थाप वाटत होती. तरुण माकडांना व वानरांना मात्र सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हवे होते. ‘लंगूर’ माकडे हल्ली एक मजेदार विधान करून “संस्कृतीरक्षक” असण्याचा आव आणत होते. लंगुरांचं मत होतं की वानरांसोबत कोलॅबरेशन करून आपण आपलं ओरिजिनल ‘माकडत्व’ नासवत आहोत. “एकला चलोरे” अशी हाकाटी पिटत लंगुरांची एक टोळी हल्ली रानात जोरदार राजकीय मुसंडी मारु इच्छित होती. यास्तव आजच्या वार्षिक सभेत लंगुरांनी राडा करायचं ठरवलं होतं. चिंपाझींनी नेहमीप्रमाणे लंगुरांना आतून पाठिंबा दिला होता. चिंपाझींची थिअरीच अशी होती की “संभ्रम निर्माण करा नि आपले वर्चस्व टिकवा !” (Jakhotia Article)
प्रत्येक वार्षिक सभेपूर्वी एक जटील समस्या उभी रहायची. मंचावर किती प्रतिनिधींनी बसायचं ? पुढे, मागे आणि मधे कुणी बसायचं ? निवृत्त व जेष्ठ प्रतिनिधींचा कसा आणि किती सत्कार करायचा ? कुणी सभेचं संचालन करायचं ? या समस्यांवर मात करण्यासाठी “प्रतिनिधी सभे”चा आकार वाढतच गेला होता. अधिकाधिक सदस्यांचं समाधान करण्यासाठी अनेक समित्या आणि उपसमित्या बनवल्या गेल्या. त्यातही खायकीची अथवा मिरविण्याची संधी जास्त असणाऱ्या समितींवर आपली वर्णी लावून घेण्यासाठी माकडे व वानर विविध क्लुप्त्यांचा वापर करीत असत. बोनोबो वानर हे हत्तींच्या मदतीने खूप अधिक फळे एकदमच मिळवायचे आणि छोट्या माकडांमध्ये वाटून त्यांचा पाठिंबा घ्यायचे. अर्थात बोनोबांच्या या “स्ट्रॅटेजी”ची कुणकुण हल्ली अन्य वानरांना लागलेली होती. बोनोबोंना प्रत्युत्तर म्हणून चिंपाझींनी अलिकडेच वाघांसोबत आणखी एक स्वतंत्र करार करुन जंगलातीलच काही भाग स्वतःसाठी आरक्षित करुन घेतले होते. मॅकाक माकडांनी हल्ली “प्रजाती शुद्धते”चा आणि “मर्कटीय पावित्र्या”चा मुद्दा खूपच टोकदार केला होता. संस्कृतीरक्षक असण्याचा दावा करणारे लंगूर म्हणूनच मॅकाक माकडांना मोठा पाठिंबा देऊ लागले होते. अवघड बाब आता अशी झाली होती की चिंपाझींना लंगूर व मॅकाक माकडांचे हे गठबंधन खूप “कट्टरपंथी” व आव्हानात्मक वाटत होते. या अशा उघड व छुप्या प्रकारच्या अनेक गठबंधनांमुळे माकड व वानर प्रजातींमध्ये मोठाच वैचारिक व कार्यकारी गोंधळ माजला होता. याचा परिणाम असा झाला की अनेक तरुण मर्कटांना हे सर्व प्रकार निरर्थक वाटू लागले होते. काही विद्रोही व आक्रमक युवा मर्कटांचे मत होते की वाघ, कोल्हे व तरस हे आपले खरे शत्रू आहेत. यांच्याविरूद्ध सर्व मर्कटांनी एकजूट दाखवायला हवी. यासाठी “वंश पावित्र्या” सारखा भंपकपणा बाजूला ठेवायला हवा. मानवी वसाहतींच्या जवळ वावरणाऱ्या लंगुरांना “संस्कृती रक्षणा”चे मानवी प्रयत्न दिसत असल्याने ते हल्ली ‘मर्कट संस्कृती’ जपण्यावर जोर देत होते. (Jakhotia Article)
आज संध्याकाळच्या सभेत आणखी एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याचा आग्रह शाकाहारी ओरांगउटांग वानरांनी धरला होता. हल्ली बरेच ससे हे हत्तींनी जंगले तुडविल्याने पुरेसं गवत खायला मिळवू शकत नव्हते. भरीस भर म्हणून मांसाहारी हिंस्र प्राण्यांच्या शिकारीस ससे वाढत्या संख्येने बळी पडत होते. सशांच्या प्रजातीला प्रकर्षाने जाणवत होते की मर्कटांनी वाघ, तरस, कोल्हे व हत्तींसोबत केलेल्या मतलबी करारांमुळे अधिकाधिक सशांवर मृत्यूची संक्रांत ओढवते आहे. तसंही हिंस्र प्राण्यांसाठी सशांची शिकार ही सोपीच होती. सशांची प्रजाती नष्ट होऊ नये व जंगलातील “इको सिस्टीम” नीट रहावी म्हणून मर्कट सभेनेच काही उपाय करावा अशी ओरांगउटांग वानरांची नैतिक मागणी होती. गोरिला, चिंपाझी, गिबंस व लंगूरांचं मत मात्र अगदीच भिन्न होतं. “Survival of the fittest” या नियमानुसार ‘जो सक्षम असेल तोच जगेल’. ओरांगउटांगना मनुष्य प्रजातीमध्ये असणारा हा भयंकर नियम मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं होतं, “Survival of the weakest also”. चाणाक्ष मर्कटांप्रमाणे हिंस्र प्राण्यांसोबत छुपे करारमदार करणे सशांना शक्यच नव्हते. अहिंसा मानणारे काही लबाड ससे यामुळे हल्ली ‘संस्कृती रक्षक’ लंगूरांशी संधान बांधू इच्छित होते. त्यांना मर्कट सभेत लंगूरांच्या माध्यमातून आपल्या व्यथा पोचवायच्या होत्या. ओरांगउटांग वानरांची संख्या खूपच कमी असल्याने ते सशांसाठीचा आवाज पुरेसा उठवू शकत नव्हते.
मध्यंतरी गोरिला, गिबन्स व बोनोबो या वानरांनी एक मोठा मुद्दा उपस्थित केला होता. लंगुरांची संख्या ही झपाट्याने वाढत चालली होती. यामुळे झाडांवरची फळे लंगूर जास्त फस्त करू लागले होते. वनसंवर्धनासाठी लंगुरांचं योगदान अगदीच फालतू होतं. त्यांच्या वाढत्या संख्याबळानुसार त्यांना सभेतील प्रतिनिधित्व मात्र आता वाढीव हवे होते. वनसुरक्षेच्या व संवर्धनाच्या बजेटमधला लंगूरांचा सहभाग हा खूपच कमी होता. कमी संख्येने असणाऱ्या वानरांना हल्ली वाटत होतं की ते जास्त संख्येने असणाऱ्या खादाड लंगुरांना उगीचच पोसताहेत. महान मर्कट संस्कृतीची मुळे खराब करण्याचं “अमर्कटीय काम” लंगूर करतात, असं बहुसंख्य वानरांचं प्रामाणिक मत होतं. चिंपाझींना मात्र वानरांचं मत मान्य नव्हतं. तथाकथित संस्कृती – प्रेमाने बाधित झालेल्या लंगुरांना कमी संख्येने असणारे चाणाक्ष चिंपाझी शिताफीने वापरत होते. वाघांना द्यावयाच्या शिकारीत लंगुरांची संख्या जास्त असायची. चिंपाझींनी लंगुरांच्या मेंदूवर आपला प्रभाव प्रचंड ठसवलेला होता. यास्तव चिंपाझी लंगुरांना सांगत, “मर्कट प्रजाती व संस्कृतीच्या रक्षणासाठी तुम्ही बलिदान दिलं पाहिजे. वननिर्माण आणि वनसंवर्धनाच्या या एकूणच चळवळीत तुम्हा लंगुरांचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदलं जाईल.” चिंपाझींच्या अशा उत्तेजक विधानांनी लंगूर आणखीनच चेकाळत नि चिंचिं करून सारं वन डोक्यावर घेत असत. (Jakhotia Article)
मागच्या वर्षी मर्कट सभेचा अध्यक्ष हा गिबन्स या वानरांपैकी होता. मर्कटांच्या विविध प्रजातींना खूश ठेवण्यासाठी चार उपाध्यक्ष नेमले गेलेले होते. यंदा माकडांपैकी एक अध्यक्ष व्हायचा होता. संख्याबळामुळे याहीबाबतीत लंगूर अरेरावी करत. म्यांड्रिल व मॅकाक माकडांची संख्या बरीच कमी असल्याने त्यांचा सदस्य हा सहजासहजी ‘अध्यक्ष’ होत नसे. यावेळी मात्र “आपण शुद्ध व पवित्र प्रजाती आहोत”, हाच मुद्दा पुढे करत मॅकाक माकडे अध्यक्षपदावर मोठा हक्क सांगत होती. यासाठी त्यांनी गिबन्स व बोनोबो या वानरांसोबत छुपी हातमिळवणीही केली होती. मर्कटांच्या वार्षिक सभेची वेळ जवळ आलेली असतानाच चिंपाझींनी अचानकपणे एक वेगळाच प्रस्ताव पुढे आणला होता. चिंपाझींचं असं मत होतं की वनवसाहतीमधील सहचर्यासाठी आवश्यक असणारी सौहार्दता वाढवायची असेल तर काही मातब्बर हिंस्त्र प्राण्यांना “सन्माननीय पाहुणे” म्हणून सभेला बोलवावं. काही वाघ व तरस यायला तयार होते. त्यांना सभेतील मर्कटांची सामुदायिक ताकद दिसेल व मर्कटीय लोकशाहीचं दर्शनही होईल. चिंपाझींच्या या प्रस्तावाने हलकल्लोळ माजला. चिंपाझी वाघांना व तरसांना बोलवू शकतात म्हणजे ह्यांची “छुपी युती” कार्यरत आहे, यावर बहुतेक मर्कटांचं आता शिक्कामोर्तब झालं. बोनोबो वानर तर प्रचंड चिडले होते. वाघ व तरस आपल्या वार्षिक सभेस हजर राहिले तर त्यांना आयताच आपला “डेटाबेस” मिळेल, असं बोनोबोंचं तार्किक मत होतं. काही चिंपाझींना आता जाणवलं होतं की ते नुसतेच बुद्धिमान आहेत पण अक्कलवान नाहीत. अर्थात व्हायचा तो परिणाम झालाच. आजची वार्षिक सभा पुढे ढकलली गेली. राडा करु इच्छिणाऱ्या लंगुरांचा मात्र खूपच हिरमोड झाला. “मर्कटांच्या कोलॅबरेशन”बाबत आता मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मर्कटांची लोकशाही अनपेक्षित अशा “हिंस्रशाही”ने पुरती झाकोळली गेली होती !