बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, सीमाभागात कन्नड सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीतर्फे देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन देण्यात आले. (Opposition to Kannad Compulsion)
मागच्या आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बेळगावात बैठक पार पडली. या बैठकीत मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नडसक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण बेळगावसह ८६५ खेडी ही मराठी बहुभाषिक आहेत. या मराठी बहुभाषिक भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या हक्कावर गद्दा आणणे आहे. तसेच २००४ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथील निर्णयाचा आम्ही सर्वजण सन्मान करणार आहोत, बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिक बहुसंख्य असल्याने बेळगाव महानगर पालिकेचे महापौर म्हणून आपण हा निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही महापौर मंगेश पवार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. (Opposition to Kannad Compulsion)
अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे उपसचिव बेळगावात आले होते त्यावेळी कन्नड सक्तीबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी महानगर पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यांच्या सूचनेचा अवमान केला जात आहे. कन्नडसक्तीच्या माध्यमातून मराठी भाषेला डावलल्यास मराठी भाषिक म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे आपण कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी युवा समितीने केली आहे. (Opposition to Kannad Compulsion)
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, महेश टकसाळी, राजकुमार बोकडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.