कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी (९ जून) पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. १ लाख रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (Jabbar Patel)
राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस १९८४ पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा २०२५ चा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. जब्बार पटेल यांना देण्यात येणार आहे. २६ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Jabbar Patel)
कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी नाळ
डॉ. जब्बार पटेल यांचा कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जिव्हाळयाचा संबंध आहे. डॉ. जब्बार पटेल यांनी ‘थिएटर अॅकेडमी’ नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन केली. १९७० मध्ये त्यांनी विजय तेंडूलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरूवात केली. १९७२ मध्ये त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे ऐतिहासिक व राजकीय परिप्रेक्ष्यातील क्रांतिकारी नाटक सादर केले. त्याला जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिध्दी आणि मान्यता मिळाली. या नाटकाचे प्रयोग इंग्लड, अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, हंगेरीसह युरोपातील अनेक देशांमध्ये यशस्वी झाले. १९७५ मध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘सामना’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड यादीमध्ये अंतर्भूत होता. त्यानंतर सन १९७८ मध्ये ‘तीन पैशाचा तमाशा’ हे पु. ल. देशपांडे यांचे नाटकही त्यांनी प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच सुमाराला १९७८ मध्ये ‘जैत रे जैत’ हा मंगेशकर कुटुंबीयांनी निर्मिती केलेला लोकसंगीतप्रधान चित्रपट दिग्दर्शित केला. १९७९ साली दिग्दर्शित केलेला ‘सिंहासन’ हा राजकीय परिस्थितिवरील उपरोध असलेला चित्रपट प्रचंड गाजला. पुढे त्यांनी स्वतः निर्मिती आणि दिग्दर्शित केलेल्या ‘उंबरठा’ या चित्रपटाने त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील आणि गिरीष कर्नाड यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘एक होता विदुषक’ सन १९९१ मधील संगीतमय विनोदी चित्रपट आणि १९९४ मधील ‘मुक्ता’ या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. (Jabbar Patel)
चरित्रपट आणि माहितीपट
त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींवर चित्रपट आणि माहितीपट बनविले आहेत. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चरित्रपट इंग्रजीसह नऊ भारतीय भाषांमध्ये संपूर्ण भारत आणि परदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता आणि कला दिग्दर्शन यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावे २०१२ साली निर्मित ‘यशवंतराव चव्हाण’ हा चित्रपट आणि पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स.मा. जोशी, इत्यादी माहितीपटांचा समावेश आहे. त्यांचा पं. कुमार गंधर्व यांच्यावर आधारित माहितीपट, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. त्यांनी विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या जीवनावरदेखील माहितीपट बनवला आहे. डॉ. जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमीकडून सन १९७८ साली सन्मान झाला. त्यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार सन १९८२ मध्ये मिळाला, पुण्यभूषण पुरस्कार २००२ मध्ये, विष्णुदास भावे पुरस्कार २०१४ मध्ये मिळाला. सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. (Jabbar Patel)
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, ट्रस्टच्या सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, डीवायएसपी सुवर्णा पत्की, राजदीप सुर्वे उपस्थित होते.