मुंबई : मुंब्रा स्थानकाजवळील रेल्वे अपघातानंतर सत्ताधारी महायुती सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. हा अपघात नव्हे तर सरकारने घेतलेले बळी आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परराज्यातील लोंढ्यामुळे असे अपघात होत आहेत, असे म्हटले आहे. (Congress on Train accident)
या घटनेची चौकशी केलीच पाहिजे, पण घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Congress on Train accident)
सपकाळ यांनी म्हटले आहे की, आज सकाळी मुंब्रा स्थानकाजवळ दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना घासल्याने लटकलेले आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत सहा प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली!
दोन प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत ही प्रार्थना. (Congress on Train accident)
गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहेत. या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे. सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल सुरू असल्याचे सांगून सपकाळ यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आ.हे रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा.
हेही वाचा :
ठाणे अपघातानंतर रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय
रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू