Inferiority and arrogance : न्यूनगंड आणि अहंगंड

Inferiority and arrogance

महाविद्यालयीन अध्ययनादरम्यान इंग्लिश मिडियम मधून आलेल्या मित्रांचं इंग्रजी ऐकून मी न्यूनगंडग्रस्त व्हायचो. माझं व्याकरण उत्तम होतं परंतु शब्दभांडार माझा मर्यादित होता. वक्तृत्व स्पर्धेत काही ठराविक स्पर्धक संस्कृत भाषेतील सुभाषितांचा भडीमार करायचे नि पांडित्यपूर्णतेचा प्रभाव निर्माण करायचे. या प्रकारानेही मला थोडा न्यूनगंड येत असे. माझं वाचन – चिंतन – मनन वाढत गेलं नि मी इंग्रजी व संस्कृतमधील यांच्या घोकंपट्टीवर मिस्किलपणे हसू लागलो. नंतर अर्थात माझी इंग्रजी बरीच सुधारली. संशोधनाने हेही कळलं की संस्कृत ही एक सामान्य इंडोयुरोपियन भाषा आहे. जन्माने मारवाडी असल्याने काही वर्षे माझे मराठीतले काही उच्चार नीट होत नसत. सरावाने हाही दोष दूर झाला.

डॉ. गिरीश जाखोटिया

वैचारिक प्रवासात नंतर जाणवलं की आपण मानवनिर्मित अशा भाषिक न्यूनगंडात उगीच अडकायचो. संवादासाठी भाषा महत्त्वाची असते परंतु भाषेपेक्षा विचार खूप अधिक महत्त्वाचा असतो. थोडक्यात असे की आपण सामान्य तर्क वापरला तर अनेक न्यूनगंड हे चुटकीसरशी दूर करता येतात. मुळात यासाठी हे तपासावं लागतं की आपल्याला कोणकोणते न्यूनगंड येतात ? ते कुणामुळे येतात ? त्यातील कोणते न्यूनगंड हे आपल्याला गैरलागू असतात ? उदाहरणार्थ, माझ्या मुलाइतका मी संगणकीय वापरात निष्णात नाही. परंतु माझ्या गरजेपुरता संगणकीय वापर मला करता येतो. जी गोष्ट माझ्या गरजेची नाही ती माझ्या न्यूनगंडाचं कारण होऊ शकत नाही. मला पोहता येत नाही, शेतातील बऱ्याच वनस्पती ओळखता येत नाहीत, खूप ऊंच डोंगरावर चढता येत नाही. अरे, येत नाही तर येत नाही. त्यावाचून माझं काही अडतंय का ? हां, मला बऱ्याच गोष्टी उत्तम येतात ज्या बऱ्याच लोकांना येत नाहीत !   

           “न्यूनगंड” म्हणजे  “आपल्यात एखादी न्यूनता (कमतरता) असण्याचा गंड किंवा समज”. हा ‘गंड’च असल्याने तो बऱ्यापैकी काल्पनिक असतो. ही न्यूनता आपल्यात खरोखर आहे का हे आधी तपासलं पाहिजे. ती जर असेलच तर तिच्यामुळे माझं काही नुकसान होतंय का, हे दुसऱ्या टप्प्यावर तपासलं पाहिजे. काहीजणांनी खोटी किंवा छद्म न्यूनता माझ्या मेंदूत पेरण्याचा प्रयत्न केलाय का, हेही  काळजीपूर्वक पहायला हवं. उदाहरणार्थ, शाकाहार हा मांसाहारापेक्षा चांगला असतो, असा बिलंदर गैरसमज अनेक दुढ्ढाचारी अहंगंडवाले पसरवत राहतात. असला फालतू अहंगंड मांसाहारी लोक मात्र सहसा बाळगत नाहीत. यास्तव न्यूनगंड टाळायचा असेल तर ‘अहंगंडी लोकांना’ फाट्यावर मारायचं. आहार, पेहराव, भाषा, प्रार्थना, सण, धार्मिक चालीरीती इ. अनेक फालतू प्रकार वापरीत अहंगंडधारी लोक स्वतःचं वेगळेपण जपत असतात. या लोकांनी काय जपावं, हा त्यांचा अधिकार आहे. हां, तो वापरून आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा यांचा वेडगळ प्रकार आपणही आक्रमकपणे नाकारला पाहिजे. याचा सोपा तार्किक उपाय म्हणजे यांना चर्चेला आमंत्रण देणं. तर्कबुद्धीचा वापर न करता आल्याने किंवा तसा तो करायचाच नसल्याने हे लोक काही मिनिटातच चर्चेतून पळ काढतात. एकदा तुम्ही “तर्कनिष्ठ” आहात हे यांना कळलं की स्वतःचा अहंगंड कुरवाळण्याचा प्रयत्न हे तुमच्या समोर करणार नाहीत.

           साधारणपणे वर्चस्ववादी महाभागांना प्रचंड अहंगंडाची लागण झालेली असते. हा अहंगंड ते जातींची उतरंड, भाषा – पेहराव – आहार – पूजापद्धती, सण साजरे करण्याचा उन्माद, सांपत्तिक प्रदर्शन, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाबद्दलच्या भूलथापा इ. विविध प्रकारच्या मार्गांनी व्यक्त करतात. अधेमधे हे थोरामोठ्यांभोवती घुटमळतात किंवा त्यांचे गोलमटोल संदर्भ सांगत राहतात. यांच्या थोरामोठ्यांचाही आपण अभ्यास केला तर त्यातील फोलपणा लक्षात येतो. बहुतेक सर्व धर्मांमधील बहुतांश धर्माचार्यांना अहंगंडाने ग्रासलेले असते. असाच अहंगंड हा राजकारण, उद्योग, प्रशासन इ. क्षेत्रातील अनेकांना ग्रासलेला असतो. यामुळे होतं असं की भाबड्या जनतेला हे धूर्त लोक “न्यूनगंडा”त अडकवतात. हा सार्वजनिक न्यूनगंड जेवढा जास्त तेवढा या लबाडांच्या अहंगंडाचा प्रभाव जास्त ! थोडक्यात असे की ज्या समाजातील ९०% सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात, तो समाज शोषकांसाठी सोपी शिकार असतो. आपल्याकडे गावी एखादा पुढारी किंवा मोठा उद्योगपती अथवा उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी आला की आपल्यापैकी अनेकांना अगदी “दबल्यासारखं” होतं. आपल्या नकळत आपण यांना अनावश्यक आदर दाखविण्यासाठी उभे राहतो. हा आपल्या जनुकांमध्ये रूजलेल्या पारंपारिक न्यूनगंडाचाच एकूण परिणाम असतो. तुम्ही जेव्हा एखाद्याला विनाकारण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजता तेव्हा न्यूनगंडात फसण्याची सुरूवात होते. अशा न्यूनगंडाने मग आपण आपली आंतरिक ऊर्जा विसरतो, आपली गुणसंपदा कमी लेखू लागतो, आपल्या देदीप्यमान सांस्कृतिक मुळांनाही विसरू लागतो. व्हिएतनाम या लढवय्या देशाने कधीही स्वतःला न्यूनगंडात अडकवले नाही. यास्तव तो तीन दशके उद्दाम अमेरिकेशी लढू शकला व जिंकूही शकला.

           साधारणपणे अनेकांचा अहंगंड हा त्यांच्या छुप्या न्यूनगंडातूनच निर्माण होतो. म्हणजे आपण फारसं कर्तृत्व गाजवू शकत नाही या वास्तवातून हे लोक न्यूनगंडाने ग्रस्त असतात. हा न्यूनगंड लपविण्यासाठी मग हे अहंगंड दाखवू लागतात. हा अहंगंड नंतर नंतर इतका वाढत जातो की हे अंधश्रद्धांचा आधार घेत आपली थोरवी दाखवू लागतात. ही एक प्रकारची ‘मनोरुग्णता’च असते. या थोरवी दाखविण्यामध्ये सहसा “छद्म अध्यात्मा”चा किंवा “राजकीय नेत्यांच्या जवळीकीचा” लबाडीने आधार घेतला जातो. “माझ्यावर अमुकतमुकची कृपादृष्टी आहे” हे यांचं अगदी ठेवणीतलं वाक्य असतं. आयुष्याच्या उतरंडीवर हे भ्रमिष्ट होऊ लागतात कारण यांना यांचा अहंगंडच खरा वाटू लागतो ! एका अध्यात्मिक बाबाचा व त्याच्या अनुयायांचा अहंगंड मी खूप जवळून पाहिलाय – अनुभवलाय. तुम्ही यांना फक्त तुमच्या कटाक्षाने जरी सुचवलंत की यांचा भंपकपणा तुम्हाला माहीत आहे, तर हे तुम्हाला टाळू लागतील. वाणिज्य विषयाच्या एका परीषदेत एक तथाकथित संस्कृतीरक्षक नि अहंगंडग्रस्त प्राचार्य विषयाचं ज्ञान पुरेसं नसल्याने भंपक भाषण देऊ लागले. काही वेळाने श्रोत्यांनीच त्यांना बसायला सांगितले. व्यावसायिक गुणवत्ता नसलेले असे अनेक महाभाग आपले व्यावसायिक विषयाबद्दलचे “न्यून” लपविण्यासाठी पूर्वजांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा “अहं” दाखवीत फिरत असतात. आयुष्यभर फारशी व्यावसायिक कामगिरी न करणारे अहंगंडी लोक उतारवयात आपली अशी न्यूनता झाकण्यासाठी कट्टरपंथी धार्मिक आचरणाचा वा पाखंडाचा आश्रय घेतलेला मी जेव्हा पाहतो तेव्हा माझी प्रचंड करमणूक होते. तुम्ही अशी अद्भुत अहंगंडधारी प्रजाती अगदी तुमच्या आसपास अनुभवू शकता. चातुर्वर्ण्यव्यवस्था निर्मिणाऱ्या लोकांनी कधीच जीवनोपयोगी विषयांचा विकास केला नाही. हाच न्यूनगंड त्यांना सतावू लागल्याने हे मग स्वतःच निर्मिलेल्या छद्म व्यवस्थेच्या मजेशीर आधाराने आपला अहंगंड कुरवाळत राहिले. ज्या ज्या “बहुजन नायकां”नी यांचा अहंगंड उतरवला ते अर्थात यांचे ‘परमशत्रू’ ठरले.

               अहंगंड आणि न्यूनगंड, दोन्हीही टाळायला हवेत व ते सहजपणे टाळता येतात. बऱ्याचवेळा स्वाभिमान व अभिमान यातील फरक न करता आल्याने आपण ‘दुराभिमानी’ होत जातो. या दुराभिमानाचे मग रुपांतर अहंगंडामध्ये होते. यावरचे दोन सोपे उपाय असे – १. आपल्या क्षेत्रातील आपल्यापेक्षा अधिक सक्षम परंतु नम्र व्यक्तींचे स्मरण करावे. २. अब्जावधी सूर्यमालिकांमधील आपली एक सूर्यमालिका. त्यातील पृथ्वी या ग्रहावरील एका देशाचे आपण नागरिक. अनंताची कल्पनाही न करू शकणारे आपण त्यांस “Infinite” म्हणून मोकळे होतो. म्हणजे आपली समज ती केवढी ? अहंगंड टाळल्याने आपण नेहमी सतर्क राहतो, नवे शिकण्याची इच्छा बाळगतो, मोठ्या ध्येयावर काम करु इच्छितो, इतरांच्या मतांचा आदर बाळगतो, चांगला संवाद साधत अनेक उत्तम मित्र जोडतो आणि सदैव आनंदी राहतो. याचप्रकारे न्यूनगंडही टाळता येऊ शकतो. यासाठी मुळात आपण एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहोत हे मानायला हवे. आपले जीवनध्येय आणि काम हे महत्वाचे व पवित्र आहे, ही धारणा असायला हवी. आपणांस उपलब्ध असणारी संसाधने व संधीच्या प्रमाणात आपल्या कामाचे गुणोत्तर (Ratio) मोजायला हवे. हे गुणोत्तर एखाद्या उद्योगपतीच्या किंवा मोठ्या राजकारण्याच्या गुणोत्तरापेक्षाही जास्त असू शकेल ! बहुजनांनी तर न्यूनगंड टाळण्यासाठी आपल्या मूळ संस्कृतीचा वेध घेतला पाहिजे. तथाकथित उच्चवर्णियांच्या चालीरीती, भाषा, पेहराव, आहार इ. गोष्टींची “कॉपी करण्याची” अजिबात आवश्यकता नसते. किंबहुना भारतीय प्राचीन संस्कृतीचे जनक, तारक व साधक हे बहुजनच होते व आहेत. कपटाने किंवा पारंपारिक पद्धतीने न्यूनगंड निर्माण करणाऱ्या व फुकाचा अहंगंड बाळगणाऱ्या धूर्त लोकांपासून दूर रहायला हवे. हां, प्रसंगानुसार यांना नामोहरम करायचेच असेल तर तसे प्रगल्भ विचारांनी करता येते. त्यांच्या कपटी नियमांनुसार वैचारिक द्वंद्व न खेळता योग्य रीतीने ते खेळण्याचा आग्रह धरला पाहिजे. अथवा अशा मूर्खांच्या नादी लागून आपले मनस्वास्थ्य बिघडवून घेऊ नये. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या स्वत्वाचे व प्राथमिक अधिकारांचे रक्षण करायला हवे.

           न्यूनगंड पूर्णपणे दूर ठेवायचा असेल तर आपली वैचारिक ताकद वाढवायला हवी. तुम्ही स्वतंत्र व विवेकी विचारांचे असाल तर न्यूनगंड तुमच्यापासून कोसो दूर राहील. संपत्ती, पद, जात, भाषा, धर्म, वर्ण किंवा राजकीय ताकदीचा उपयोग करीत अहंगंड दाखविणारे फक्त आणि फक्त विवेकी विचारांना घाबरतात. मोठ्यातला मोठा राजकीय नेता अथवा उद्योगपती हा तुमच्या विवेकी तर्काला पराभूत करु शकत नाही. बहुतेक धार्मिक किंवा अध्यात्मिक ‘गुरू’ हे अशाच विवेकी तर्कांपासून दूर राहतात कारण त्यांचे दुकान हे अंधश्रद्धांवर पोसलेल्या अहंगंडाने चालते. यांच्या अहंगंडाच्या फुग्याला पिन मारायची असेल तर जे तत्त्वज्ञान ते प्रसरवत असतात त्याला नम्र आव्हान द्या. स्वतःच्या तत्वज्ञानातील फोलपणा माहीत असल्याने हे लोक आमनेसामने चर्चा करायला तयार होणार नाहीत. कळीचा मुद्दा असा की अहंगंडधारींच्या टोळ्यांपासून शक्यतो दूर राहून स्वतःच्या ध्येयावर काम करीत रहा. यासाठी अहंगंडींना ओळखता आलं पाहिजे. छुपे अहंगंडी हे वरवर सात्विक दिसू शकतात परंतु ते संधी मिळताच आपला अहंगंड दाखवतात. काहीजण टोळीत असले की अहंगंडी बनतात. अशा टोळ्यांना आपण एकटे भिडू शकत नाही. याबाबतीत हाराकिरी न करता ह्यांच्या उन्मादी अहंगंडाला टाळून आपली ऊर्जा वाचवली पाहिजे. अशा वेळी नम्रतेचे नाटक करीत ह्यांच्या अहंगंडाला बोथट केले पाहिजे. ज्ञानाधारित ताकदीला वाढवीत आपण एक “मस्त कलंदर, चुस्त बिलंदर” बनायचं, जेणेकरून अहंगंडधारी महाभागांनाच आपली भिती वाटली पाहिजे. “थ्री इडिअट्स” या गाजलेल्या हिंदी चित्रपटातला रांचो (म्हणजे वास्तवातला सोनम वांगचुक) आठवा. हा भल्याभल्यांचा अहंगंड तोडतो कारण त्याला न्यूनगंडाने स्पर्शही केलेला नसतो !

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर