न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या अनिशा अरोरा या तरुणीनं सांगितलेली ही स्टोरी आहे. तिच्या विमानप्रवासाची. त्यादरम्यान भारतीय पासपोर्ट असल्यामुळं आलेल्या अनुभवाची. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून आपलं अनुभवकथन केलंय. अनिशा न्यूयॉर्कमध्ये राहात असली तरी तिच्याकडं भारतीय पासपोर्ट आहे. (Indian Passport)
- महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क
फ्लाइटला उशीर झाल्यामुळे अनिशाची फ्रँकफुर्ट येथून पुढे जाणारी कनेक्टिंग फ्लाइट चुकली. अनिशासोबत जे अमेरिकन नागरिक होते त्यांची फाइव स्टार हॉटेलमध्ये मोफत जेवणासह राहण्याची सोय करण्यात आली. तर अनिशाला एका छोट्याशा खोलीत ठेवण्यात आलं. कारण काय तर अनिशाकडे शेनझेन व्हिसा नव्हता. आणि तिचा पासपोर्ट भारतीय होता. (Indian Passport)
अनिशाने व्हिडीओत सांगितलं, ‘‘आजपर्यंत मी माझ्या पासपोर्टबाबत फारसा विचार केला नव्हता.’’ तिनं रूम दाखवत असताना म्हटलं – ‘‘बाकीचे प्रवासी फाइव स्टार हॉटेलमध्ये डिनर आणि ब्रेकफास्टसह राहत आहेत, आणि मी या छोट्याशा कॅप्सूलमध्ये आहे.’’
शेनझेन व्हिसा नसल्यामुळे अनिशा विमानतळाबाहेर जाऊ शकत नव्हती. तर अमेरिकन पासपोर्ट असलेल्या प्रवाशांनी वीस तासांचा प्रतीक्षा कालावधी प्रतीक्षा जर्मनीलं महत्त्वाचं शहर फिरण्यात घालवला.
अनिशाने पुढे सांगितलं – ‘‘कोणीही अमेरिकन प्रवाशांच्या जागी असतं, तर आनंदी झालं असतं – त्यांच्यासाठी सगळं मोफत होतं आणि वीस तास नवीन देश फिरण्यासाठी मिळाले होते, पण माझ्यासाठी काहीच नव्हतं. कारण माझ्याकडे भारतीय पासपोर्ट होता.’’
अनिशाच्या मते, तिनेही तिकिटासाठी तेवढेच पैसे खर्च केले होते, जेवढे अमेरिकन प्रवाशांनी केले होते… पण वागणुकीत जमीनअस्मानाचा फरक होता… (Indian Passport)
२०२५ च्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगात भारतीय पासपोर्टचा क्रमांक ८५ वा आहे. गेल्या वर्षी तो ८० वा होता. भारताच्या पासपोर्टची सर्वोच्च स्थिती २००६ मध्ये होती. तेव्हा तो ७१ व्या क्रमांकावर होता. अमेरिकन पासपोर्ट ९ व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्ट सिंगापूरचा आहे. त्यानंतर जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९९ देशांच्या यादीत भारत ८५ व्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात तळाला आहे अफगाणिस्तान. आणि आपण विश्वगुरू झाल्याच्या, जगात आपली प्रतिष्ठा, मानसन्मान वाढल्याच्या गप्पा मारतो.
२०२५ च्या नोमॅड कॅपिटालिस्ट पासपोर्ट इंडेक्सनुसार, भारत १९९ देशांपैकी १४८ व्या स्थानावर आहे.
भारताचा शेजारी पाकिस्तान १९५ व्या स्थानी आहे. नेपाळ आणि बांगलादेश अनुक्रमे १८० व्या आणि १८१ व्या स्थानांवर आहेत. श्रीलंका १६८व्या स्थानी आहे. भारतीय उपखंडातील इतर देशांमध्ये भूतान भारताच्या पुढे म्हणजे १४०व्या क्रमांकावर आहे.
हा इंडेक्स १९९ देशांची नागरिकत्व व्यवस्था तपासतो. प्रत्येक पासपोर्टची रँकिंग पाच महत्त्वाच्या निकषांवर केली जाते :
- व्हिसाशिवाय प्रवास (Visa-free travel)
- कर प्रणाली (Taxation)
- जागतिक प्रतिमा (Global perception)
- दुहेरी नागरिकत्व (Dual citizenship)
- वैयक्तिक स्वातंत्र्य (Personal freedom)
भारत १४८ व्या स्थानावर आहे. आणि विशेष म्हणजे आफ्रिकेतील कोमोरोस हा साडेआठ लाख लोकसंख्येचा देश आपल्या शेजारी आहे. (Indian Passport)
या यादीमध्ये सिंगापूरला मागे टाकून आयर्लंडने पहिलं स्थान मिळवलं आहे.
आशिया खंडातला टॉप १० मध्ये असलेला देश आहे संयुक्त अरब अमिराती (UAE). त्याचे स्थान आइसलँड आणि न्यूझीलंडसोबत १० व्या क्रमांकावर आहे. …आणि आपण विश्वगुरू झाल्याच्या, जगात आपली प्रतिष्ठा, मानसन्मान वाढल्याच्या गप्पा मारतो.