Henrich Klaasen : हेन्रिक क्लासेनचा क्रिकेटला अलविदा

Henrich Klaasen

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. नुकतेच क्रिकेट साउथ आफ्रिकेने जाहीर केलेल्या केंद्रीय करारांमधून क्लासेनला वगळले होते. त्या पार्श्वभूमीवर क्लासेनने यापुढे केवळ देशविदेशातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (Henrich Klaasen)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१८ साली पदार्पण करणाऱ्या क्लासेनने सात वर्षांच्या कारकिर्दीत ४ कसोटी, ६० वन-डे आणि ५८ टी-२० सामने खेळले. प्रामुख्याने वन-डे आणि टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज म्हणून क्लासेनला ओळख मिळाली. त्याने वन-डेत ४३.६९ च्या सरासरीने २,१४१ धावा फटकावल्या असून त्यामध्ये ४ शतके व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२०मध्ये त्याने ५ अर्धशतकांसह १,००० धावा केल्या. त्याचा वन-डेतील स्ट्राइक रेट ११७.०५ आणि टी-२०तील स्ट्राइक रेट १४१.८४ इतका आहे. याबरोबरच त्याने यष्ट्यांमागे वन-डेमध्ये ५८ (५१ झेल, ७ यष्टिचित), तर टी-२०मध्ये ३८ (३३ झेल, ५ यष्टिचित) बळी घेतले आहे. मागील वर्षी टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्याने भारताविरुद्ध २७ चेंडूंमध्ये ५२ धावांची खेळी केली होती. (Henrich Klaasen)

“आजचा दिवस माझ्यासाठी दु:खाचा असून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबियांसाठी सर्वोत्तम काय आहे, हे ठरवण्यासाठी मला खूप वेळ लागला. हा निर्णय कठीण होता, परंतु आता मी त्याच्याशी जुळवून घेतले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा गणवेश परिधान करणे हा नेहमीच माझ्या कारकिर्दीतील सर्वोच्च स्नमान राहील. आता मी कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्यास उत्सुक आहे,” असे क्लासेनने निवृत्ती जाहीर करताना सांगितले. (Henrich Klaasen)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर