स्टॅव्हेंजर : भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशने नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेमध्ये माजी विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला हरवून सनसनाटी निकाल नोंदवला. १९ वर्षीय गुकेशने कारकिर्दीत प्रथमच ३४ वर्षीय कार्लसनविरुद्ध विजय मिळवला. (D. Gukesh)
या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत हे दोन्ही बुद्धिबळपटू आमनेसामने आले होते. त्यावेळी जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वलस्थानी असणाऱ्या कार्लसनने गुकेशला पराभूत केले होते. त्या विजयानंतर कार्लसनने सोशल मीडियावर स्वत:ला ‘बुद्धिबळाचा राजा’ म्हणवून घेत आपलीच पाठ थोपटली होती. मात्र, सोमवारच्या पराभवाने कार्लसनला मान खाली घालायला लावली. या लढतीत कार्लसन पांढऱ्या, तर गुकेश काळ्या मोहऱ्यांसह खेळला. पराभवानंतर कार्लसनला निराशा लपवता न आल्याने त्याने जोरात टेबलावर हात आपटला. गुकेशने मात्र हा विजय मिळवल्यानंतर खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन घडवले. आमच्या दरम्यान १०० लढतींपैकी ९९ वेळा कार्लसन जिंकू शकतो. या एकाचवेळी मी जिंकलो, असे गुकेश म्हणाला. (D. Gukesh)
या स्पर्धेमध्ये गुकेशचा हा दुसरा विजय असून सहा लढतींनंतर त्याच्या खात्यात ७.५ गुण झाले आहेत. गुणतक्त्यात तो तिसऱ्या स्थानी आहे. कार्लसन ९.५ गुणांसह गुणतक्त्यात अव्वलस्थानी आहे. (D. Gukesh)