व्होटचोर रंगा -बिल्लाला सत्तेतून खाली खेचणार  : हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal criticizes vote theft

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस व इंडिया आघाडीने व्होट चोरीचा मुद्दा मांडत देशभर  सुरु केलेले आंदोलन ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे,  हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून ३० हजारांच्यावर पोलिसांचा फौजफाटा आहे. आंदोलन दडपून वोट चोरी लपवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारला अटक करत नाही आणि व्होटचोर रंगा -बिल्लाला सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. (Harshvardhan Sapkal criticizes vote theft)

दिल्लीतील लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्रातून प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई,  बी एम. संदीप, रेहाना चिश्ती, आमदार भाई जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह राज्यातील नेते व आमदार उपस्थित यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना  प्रदेशाध्यक्ष सपकाळ  म्हणाले की, ‘आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या मदतीने भाजपाने वोट चोरी केली आहे. एसआयआरच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असून हे कृत्य देशद्रोहाचे आहे, या मतचोरीत ते कठपुतली असून  खरे सुत्रधार रंगा बिल्ला आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक व्हायला हव्यात पण ज्ञानेशकुमारांनी त्याला बगल दिली आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून काँग्रेसचे सर्व आमदार, माजी आमदार-खासदार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जवळपास हजार कार्यकर्ते आले आहेत. हे आंदोलन फक्त दिल्लीतच सुरु नाही तर गल्ली ते दिल्ली आंदोलन सुरु आहे. (Harshvardhan Sapkal criticizes vote theft)

मुंबईतही व्होट चोरीविरुद्ध आंदोलन

 दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटला असताना मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आंदोलन केले. दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, भाजपा आणि मोदी-शाह यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ऍड. संदेश कोंडविलकर, गुरुमितसिंग बच्छर, दिपक वाघमारे, राघवेंद्र शुक्ला, प्रशांत धुमाळ, दत्ता नांदे, संतोष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

एमपीएससी घोटाळ्याची वेळेत चौकशी पूर्ण करा

 एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले असून  पेपरफुटीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली, याचाच अर्थ ‘दाल में कुछ काला है’. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे विहित वेळत ही चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करावी. पण भिमनवार यांची नियुक्तीच चुकीची होती. आपल्या विचारांच्या लोकांना प्रशासनात घुसवणे व पेपरफुटी दडपण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी भिमनवार यांची नियुक्ती केली होती. या सर्व प्रकरणामुळे एमपीएससीची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. (Harshvardhan Sapkal criticizes vote theft)

Related posts

इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन