महाप्रज्ञासूर्यास महाअभिवादन !

अरुण विश्वंभर जावळे : जगाच्या पाठीवरचे भारदस्त नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृतीशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा एक ना असंख्य शास्त्रातला महापंडित, महाविद्वान अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अवघे जग त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून ओळखते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना बराक ओबामा यांनी डॉ. बाबासाहेबांना महाप्रज्ञासूर्य म्हटले होते. ६ डिसेंबर १९५६ ला या महाप्रज्ञासूर्याचा दिल्लीत अस्त झाला. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने..! (Dr. Ambedkar)

सहा डिसेंबर. अर्थात महापरिनिर्वाण दिन! सहा डिसेंबर १९५६ या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याचा अस्त झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी कोट्यवधी अनुयायांच्या अश्रूंना वाट करून देत काळजाला स्पर्शून जातो. जिथे डॉ. आंबेडकरांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या चैत्यभूमीवर उसळणारी गर्दी आणि प्रत्येक वर्षीचा ब्रेक होणारा गर्दीचा उच्चांक हा डॉ. बाबासाहेबांबद्दलच्या श्रद्धेचा अन् आदराचा दाखलाही देऊन जातो. एका बाजूला अथांग सागर आणि दुसऱ्या बाजूला विराट जनसागर असे अचंबित करून टाकणारे चित्र इथे प्रत्येकाला पहायला मिळते. जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच महापुरुषाच्या महापरिनिर्वाणदिनाला अशी ऐतिहासिक गर्दी कोठेच दिसत नाही. मात्र या क्रांतीनायकाबाबत हे घडते. केवळ भारताच्याच नव्हेतर, जगाच्या कानाकोपऱ्यांतील असंख्य अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर दाखल होत असतात.

का घडते हे ? या प्रश्नाकडे वळले म्हणजे लक्षात येते की, या सृष्टीवर हजारो वर्षे सूर्य उगवत होता, पण तो कधीही शोषित पीडित, वंचित दलितांना प्रकाशित करू शकला नाही. मात्र या सूर्यापेक्षाही प्रखर तेजाने आपली बुद्धी ऊर्जा पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने ‘अंधारयुगा’त चाचपडणाऱ्या माणसाला ‘ज्ञानप्रकाश’ दिला. त्याच्यातील जगण्याची उमेद जागवली. जो सर्वहारा माणूस शेकडो वर्षे जातीव्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खात होता, त्याचे प्राण वाचविण्याचे तेजस्वी आंदोलन या क्रांतीनायकाने छेडले. त्यामुळे स्वयंविश्वासाचा पूर्णतः चोळामोळा झालेल्या दलित, उपेक्षित माणसाला ‘माणूसपण’ मिळाले. त्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. तो ताठ उभा राहिला. त्याच्या धमण्याधमण्यांतून स्वयंविश्वास अन् स्वयंअस्मितेचे रक्त सळसळू लागले. प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड त्याच्या पायातून निखळून पडले. तो मुक्त झाला. तो स्वतंत्र झाला..! त्यामुळे मानवी स्वातंत्र्याच्या या उद्गात्याबद्दलची अपार श्रद्धा सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर उफाळून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आज ६८ वर्षे होत आहेत. या महापरिनिर्वाणाच्या पार्श्वभूमीवर चिंतन आणि मंथन होणे आवश्यक आहे. या ६८ वर्षांच्या कालखंडात आंबेडकरांचा समतामूलक समाजनिर्मितीचा लढा, आर्थिक – सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय अशा पातळ्यांवर आपण कुठपर्यंत पुढे नेला?  जाती निर्मूलनाची चळवळ आपण किती यशस्वी केली?  अन्याय-अत्याचार रोखण्याबरोबर सांस्कृतिक परिवर्तनासाठी कोणती ठोस भूमिका घेतली? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण किती झटलो?  सफलतेच्या दृष्टीने देश कुठंपर्यंत नेला? संविधानातील मार्गदर्शक तत्त्वात नवभारताचे जे चित्र रेखाटले ते आपण साकार केले काय? स्वातंत्र्य, समता, बंधूता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्त्वे आदर्श समाजरचनेची पायाभरणी करणारी असतील तर या तत्त्वांशी भारत देश प्रामाणिक राहण्यासाठी आपण कोणत्या स्वरुपाची आंदोलने केली?   (Dr. Ambedkar)

जीवनाच्या सुंदर उभारणीचा व सर्जनशील निर्माणाचा जोरकसपणे पुरस्कार करण्यासाठी आपण काय केले? हजारो वर्षे प्रस्थापित संस्कृतीने – व्यवस्थेने इथल्या माणसाला नाकारून, झिडकारून, लाथाडून यातनांच्या तुरुंगात बंदिस्त केले, त्या बंदीवानाच्या मुक्ततेसाठी आपण बाबासाहेबांनंतर कोणता संघर्ष छेडला? कालबाह्य तत्त्वांचा, श्रद्धा-अंधश्रद्धांचा, कर्मकांडाचा, उच्च- नीचतेचा, विषमतेचा, वर्ण-वर्गभेदाचा सर्व धर्मसंभार गाडून ज्ञानवादी, मनोधारणांसाठी, विज्ञानवादी, भाववृत्तीसाठी, स्वयंप्रज्ञ चित्तवृत्तीसाठी आपण किती आणि कशी वाटचाल केली? निरंतर मानवी प्रगती बुद्धीप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद या अजरामर आशा तीन सिद्धांतावर होते, आशी विचारधारा पेरणारा सर्वोत्तम भूमिपुत्र जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली या भारताला दिला, त्या गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आपण किती निष्ठापूर्वक स्वीकार केला? का फक्त किर्तनात बुद्धाचे नाव आणि वर्तनात काहीच नाही, असे तर आपण वागत नाही ना? या आणि अशा प्रश्नांचा ठाव घेऊन समग्र व्यवस्था परिवर्तनाची चळवळ नव्याने गतिमान करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. याचे भान या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने नव्याने येणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ भावनिक पातळीपेक्षा बौद्धिक पातळीवर अधिक तेजस्वी आणि यशस्वी कशी करता येईल यासाठी व्यापक प्रयत्न झाला पाहिजे, तरच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्यास अर्थपूर्ण महाअभिवादन ठरेल ! (Dr. Ambedkar)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

पोटातले ओठावर!