अदानींना जेलमध्ये टाकावे : नाना पटोले यांची मागणी

मुंबई; विशेष प्रतिनिधी : उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींनी देश-विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले, पण अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या तपासात अदानीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही भ्रष्ट अदानींना अटक का केली जात नाही? भारत सरकारने चौकशी करून गौतम अदानींना जेलमध्ये टाकावे, ही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी रास्तच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात ते  म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्या सहकार्याने व सरकारी यंत्रणांच्या मदतीने अदानी देशाला लुटत आहे. विमानतळ, बंदरे, ऊर्जानिर्मितीसह सर्वच क्षेत्रांत अदानीची मक्तेदारी सुरू असून त्याला जबाबदार  मोदी आहेत. अदानीला देश-विदेशातील कंत्राटे देण्यासाठी ते मदत करत आहेत हे उघड आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर करण्याचा डाव आखून लाखो कोटींची मुंबईतील जमीन अदानीच्या घशात घातलेली आहे. विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यांनी अदानीवर कारवाई करण्याची केलेली मागणी रास्तच असून, अमेरिका जर गौतम अदानीच्या भ्रष्टाचाराबद्दल अटक वॉरंट काढू शकते तर भारत सरकार का कारवाई करू शकत नाही?  देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

लोकसंख्या वाढीचा भागवत यांचा सल्ला!

मला पाडण्याची  राणांची लायकी नाही