कोल्हापूर : प्रतिनिधी : गांधीनगर व्यापाऱ्यांचे पावनेदोन कोटी लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. पार्किंगमधील टेंपोची काच फोडून डॅशबोर्डवर ठेवलेली रक्कम त्यांनी पळवून नेली होती. पोलिसांनी तीन संशयित आणि एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांच्याकडून एक कोटी ७८ लाख रुपये हस्तगत केले. (Gandhinager theft)
कोल्हापूर शहरालगत व्यापारीपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधीनगर येथे १३ जून रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी गुडलक स्टेशनरीच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून पार्किंगमध्ये प्रवेश केला होता. तिथे पार्क केलेलेल्या टेंपोंची काच फोडून डॅश बोर्डमधील रक्कम चोरुन नेली होती. कैलाश वसंत गोरड (मुळ रा. शहापूर, बेळगाव, कर्नाटक) यांनी एक कोटी ९० लाख रुपये चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. गांधीनगर पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास सुरू केला.
पोलिस उप निरीक्षक संतोष गळवे आणि पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून योगेश पडळकर हा हॉकी स्टेडियमजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून योगेश पडळकर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी योगेश पडळकर, स्वयंम सचिन सावंत वय १९, रा. बुधवार पेठ कोल्हापूर, सम्राट संजय शेळके वय २४ रा. लक्षतीर्थ वसाहत यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. (Gandhinager theft)
असा रचला चोरीचा प्लॅन
संशयित योगेश पाडळकर यांनी चोरीचा प्लॅन कसा रचला याची माहिती पोलिसांना दिली. गुडलक स्टेशनरीचे मालक प्रकाश वाधवानी यांच्याकडे स्वरुप शेळके हा कामास होता. त्याला कैलास गोरड आणि वाधवानी यांचे आर्थिक व्यवहार व रोख रक्कम कुठे ठेवतात यांची माहिती होती. स्वरुप शेळके पैशाची माहिती देत होता. त्यानंतर योगेश पाडळकर, स्वरुप शेळके, स्वयंम सावंत गोट्या आणि विधीसंघर्ष बालकाने एक महिन्यापासून चोरीचा प्लॅन तयार केला. त्यानंतर स्वरुप शेळके याने कैलास गोरड यांचा अशोक लेलँड कंपनीचा टेंपो गुडलक स्टेशनिरीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या कंपाउंडमध्ये पार्किग केला असून डॅशबोडवर पैसे ठेवले असल्याचे सांगितले. तसेच हा टेंपो दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी १३ तारखेच्या मध्यरात्री एक वाजता दोन मोटार सायकलवरुन तिघेजण रेल्वे रुळाच्या पलिकडून गुडलक स्टेशनिरीच्या पत्र्याच्या कंपाउंडजवळ आले. पत्रा उचकटुन पार्किंगमध्ये चौघांनी प्रवेश कला. स्वरुप शेळके याने दिलेल्या माहितीप्रमाणे टेंपोच्या काचा फोडून डॅश बोर्डजवळील रोख रक्कमेचे पांढरे पोते चोरुन नेले. चोरलेली रक्कम मंगळवार पेठेतील स्वयंम सावंत यांच्या खोलीवर ठेवली. त्यातील काही रक्कम त्यांनी खर्च केली. पोलिसांनी सावंत यांच्या खोलीतून एक कोटी ७८ लाख रुपये जप्त केले. (Gandhinager theft)
स्वरुप शेळके गैरहजर
गुडलक स्टेशनरीमध्ये २८ कामगार कामाला आहेत. चोरीच्या दुसऱ्या दिवशी तो कामाला आला नव्हता. बाकीच्या २७ कामगारांकडे पोलिसांनी चौकशी केली होती. त्यामुळे स्वरुप शेळकेवर पोलिसांचा संशय होता. तसेच त्यांचे साथीदारही मिळालेल्या रक्कमेतून चैनी करत होत असल्याचे पोलिसांना दिसून आले. ते मिळालेल्या रक्कमेची वाटणी करणार होते. पण पोलिसांनी वाटणी करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतले.
यांनी केला तपास
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संतोष गळवे, जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, राजू कांबळे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बरगे, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, कृष्णात पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतीश तानुगडे, सचिन बेंडखळे, सायली कुलकर्णी यांचा सहभाग होता.