जमीर काझी : मुंबई : माजी मंत्री व काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम नाहक बदनाम करत आहेत. हिंदु-मुस्लीम वाद उपस्थित करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा हा डाव आहे. साटम यांनी मंगलप्रभात लोढांसाठी अस्लम शेख यांना पोकळ धमक्या देण्याचे थांबवावे. टॉवर बांधताना मंगलप्रभात लोढा यांनी किती मंदिरे उद्धवस्त केली, याचे उत्तर द्यावे, असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबई ही काही फक्त अदानी, लोढा व कंभोजची नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार गायकवाड यांनी दिला.
लोढा टॉवरमध्ये भूमीपुत्रांना घरे नाकारतात
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, ‘ज्या मालवणी पॅटर्नच्या नावाने आपण कंठशोष करत आहात, तो आधी समजून घ्या. ज्या लोढांसाठी आपण आमदार अस्लम शेख यांना पोकळ धमक्या देत आहात, ते मालवणी पॅटर्नचे उद्गाते आहेत. हिंदू- मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व जाती धर्मांचे नागरिक जेथे गुण्यागोविंदाने नांदतात तो मालवणी पॅटर्न आहे. त्याउलट एका विशिष्ट समाजाला सोडून मुंबईतील मूळ भूमिपुत्रांनासुद्धा लोढा टॉवर्समध्ये घरे नाकारली जातात. लोढा मालवणीतील गोरगरीबांच्या डोक्यावरचे छत्र हिरावून घेत आहेत. त्यांनी अंबोजवाडीत भर पावसात गोरगरीबांचे संसार उघड्यावर आणले होते. भाटी गावची हिंदू स्मशानभूमी तोडली. राठोडीतील हिंदूंना नोटीस न बजावता उघड्यावर आणणारे हेच मंगलप्रभात लोढा आहेत. आज ते मालवणीतील सामाजिक ऐक्य संपवण्याचे काम करत आहेत. याविरोधात मालवणी पॅटर्न धर्मनिरपेक्षतेची मशाल तेवत ठेवत आहे आणि भाजपा व अमित साटम बांगलादेशी, रोहिंग्यांचा मुद्दा काढुन मालवणीतील हिंदूंना बेघर करत आहेत असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे. (Gaikwad’s warning to Satam)
भाजपकडून हिंदू-मुस्लीम वाद
मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाच्या मदतीने भाजपा महायुतीचेच सरकार आहे, राज्यात त्यांचेच सरकार असून मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांची लुट केली जात आहे. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या मुलभूत प्रश्नांवर निवडणुका लढल्या पाहिजेत पण मुंबईकरांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी साटमसारखे भाजपाचे लोक हिंदू- मुस्लीम वाद निर्माण करत आहेत पण त्यांचा हा कुटील डाव मुंबईकर हाणून पाडतील, असेही त्यांनी सांगितले. (Gaikwad’s warning to Satam)
युवक काँग्रेसची अमित साटम यांच्या कार्यालयावर धडक
अमित साटम यांनी अस्लम शेख यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरित पाकिस्तानची अवलाद, असा उल्लेख केला, त्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत साटम यांच्या अंधेरीतील कार्यालयावर धडक देत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बांद्रा पोलीस ठाण्यात नेले. मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिलेश यादव, हरगून सिंह, विक्रम सिंह, फहीम शेख, जिल्हा अध्यक्ष भावना जैन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला.
यावेळी पोलीस भाजपा कार्यकर्त्यांना मोकाट सोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली आहे. ते सत्ताधारी पक्षाच्या इशा-यावर काम करत आहे. काँग्रेस अशा दडपशाहीला भीक घालत नाही. अस्लम शेख यांना उघडपणे धमकावणा-या साटम यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस धजावत नाहीत पण कांग्रेस गप्प बसणार नाही. असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला. (Gaikwad’s warning to Satam)