Forests in danger : जंगले धोक्यात, जंगलांजवळचे लोकही संकटात

Forests in danger

जगातील १.६ अब्ज हेक्टर जंगलांपैकी सुमारे ३९१ दशलक्ष हेक्टर उष्णकटिबंधीय जंगले नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही जंगले सुमारे ५३ दशलक्ष लोकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहेत. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्यावतीने (UNEP) यासंदर्भातील नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. (Forests in danger)

ही जंगले केवळ कार्बन शोषणासाठीच नव्हे तर पाणीपुरवठा, मृद संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र शेतीचा विस्तार, पायाभूत सुविधा उभारणी, जंगलतोड आणि खनिज उत्खनन यांसारख्या कारणांमुळे ही जंगले धोक्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

एशिया-पॅसिफिकमध्ये अधिक धोका

युएनईपी ने “ हाय रिस्क फॉरेस्ट, हाय व्हॅल्यू रिटर्नस् (High-risk forests, high-value returns)” या नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, उष्णकटिबंधीय जंगलांच्या जवळ राहणाऱ्या प्रत्येक चार व्यक्तींमधील एक व्यक्ती अशा जंगलांवर अवलंबून आहे. ही जंगले धोक्यात आल्यामुळं संबंधित लोकांच्या जीवनावरही त्याचे विपरित परिणाम होणार आहेत. धोक्याच्या पातळीवर असलेली ही जंगले एकूण ३९१ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पसरलेली आहेत. युरोपियन युनियनच्या भूभागाएवढे हे क्षेत्र आहे. (Forests in danger)

 जंगलांच्या जवळ राहणाऱ्या किंवा जंगलांवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या आफ्रिकेत सर्वाधिक आहे. मात्र धोक्यात आलेल्या जंगलांच्या परिसरात राहणारे लोक एशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक आहेत.

जंगलांचा मोठा ऱ्हास

या जंगलांचे संरक्षण पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यांचे संरक्षण केल्यास दरवर्षी एक गिगाटन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. १९९० ते २०१९ दरम्यान जंगलांनी दरवर्षी १३.१ गिगाटन कार्बन डायऑक्साइड शोषून घेतला, जे जगातील एकूण जीवाश्म इंधन उत्सर्जनाच्या सुमारे निम्मे आहे.

एवढी गंभीर परिस्थिती असतानासुद्धा गेल्या दोन दशकांत जगाने दरवर्षी सुमारे १० दशलक्ष हेक्टर उष्णकटिबंधीय जंगले गमावली. दक्षिण कोरियाच्या आकाराएवढे हे क्षेत्र आहे. अॅमेझॉनमधील २० ते ४० टक्के जंगलतोड झाली तर संपूर्ण परिसंस्था ढासळण्याची शक्यता आहे, असा इशारा युएनईपी ने दिला आहे. त्यामुळे या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी होऊन जंगलांचा नाश होऊ शकतो आणि संपूर्ण प्रदेश कोरडा गवताळ भाग बनू शकतो. (Forests in danger)

शेतीवर उदरनिर्वाह

ही जंगले दरवर्षी सुमारे २.३ दशलक्ष टन नायट्रोजन धरून ठेवतात. जे कॅनडाच्या वार्षिक खत वापराएवढे आहे. यामुळे नद्यांमध्ये पोषक द्रव्यांचे प्रदूषण कमी होते आणि जलस्रोत स्वच्छ राहतात. तसेच, दरवर्षी ५२७ दशलक्ष टन माती आणि गाळ नद्यांमध्ये वाहून जाण्यापासून रोखले जाते. जे दीड लाख ऑलिंपिक आकाराच्या जलतरण तलावांइतक्या चिखलाएवढे आहे. या जंगलांमुळे १० दशलक्ष लोकांना परागणावर (pollination) अवलंबून असलेल्या पिकांमधून वार्षिक अन्नपुरवठा मिळतो. (Forests in danger)

याशिवाय, १११ दशलक्ष टन लाकूड, तसेच फळे, सुकामेवा, औषधी वनस्पती या जंगलांतून मिळतात. ज्याद्वारे २५ दशलक्ष गरीब लोकांच्या ऊर्जा, अन्न आणि उत्पन्नाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. विशेषतः महिला आणि आदिवासी समुदाय घरगुती स्वयंपाक, ऊब, पोषण आणि पारंपरिक उपजीविकेसाठी या संसाधनांवर अवलंबून आहेत.

आर्थिक नुकसान टाळण्यासही मदत

जंगले दरवर्षी सुमारे ८१ अब्ज डॉलर्स इतक्या जीडीपी नुकसानीपासून जगाचे संरक्षण करतात. जमीन स्थिर ठेवणे, पावसाचे पाणी मंदावणे, आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करणे — अशा अनेक मार्गांनी ही जंगले पूर, भूस्खलन आणि वादळांपासून बचाव करतात.

उष्णकटिबंधीय जंगले पृथ्वीच्या हवामान संतुलनासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ती नष्ट झाली तर केवळ जैवविविधतेचे नुकसान होणार नाही, तर पाण्याचे, अन्नाचे आणि अर्थव्यवस्थेचे संतुलनही बिघडू शकते. म्हणून या जंगलांचे संरक्षण हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर मानवी अस्तित्वाचेही रक्षण असल्याचे मानले जाते. (Forests in danger)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर