श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटात नऊ लोक ठार झाले असून २९ जखमी झाले आहेत. जप्त करून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांमध्ये रात्री भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटात बहुतांश पोलीस आणि जप्त केलेले स्फोटक पदार्थ तपासणारे फॉरेन्सिक तज्ज्ञांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री हा स्फोट झाला. (Explosion at Nowgam Police Station)
रात्री उशिरा हा स्फोट त्यावेळी झाला जेव्हा तपासणी पथक नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित स्फोटकांच्या मोठ्या साठ्याचे नमुने गोळा करत होते. हा स्फोट कशामुळे झाला यासंर्भात पोलिसांकडून स्फोटाच्या दोन शक्यता तपासल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमोनियम नायट्रेट सील करत असताना अपघाताने स्फोट होण्याची एक शक्यता आहे. दहशतवादी हल्ला असावा अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही कारणे लक्षात घेऊन पोलिस तपास करत आहेत. (Explosion at Nowgam Police Station)
या पोलीस ठाण्यात दहशतवादी मॉड्यूलप्रकरणी मूळ एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अंदाजे ३५० किलो जप्त केलेले स्फोटक रासायनिक पदार्थ साठवलेले होते. काही रसायने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती, परंतु बहुतांश साठा इमारतीतच होता. तपासणी पथक पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या एका गाडीमध्ये आयईडी पेरला होता का, या दिशेनेही तपास करत आहे. (Explosion at Nowgam Police Station)
जखमींना भारतीय लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटल आणि एसकेआयएमएस येथे दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने परिसर सील केला आहे. दिल्लीत चार दिवसांपूर्वी कार स्फोट झाला होता हा स्फोट दहशतवादी कृत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या घटनेनंतर लगेचच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी स्निफर डॉग्सच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी केली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिल शकील गनई याच्या भाड्याच्या फरिदाबाद येथील निवासस्थानातून ३५० किलो स्फोटक रसायने जप्त करण्यात आली होती. अशी माहिती मिळत आहे. (Explosion at Nowgam Police Station)