गोफ दुहेरी विणलासे

प्रल्हाद जाधव

साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातला प्रतिभावंत हा केवळ त्या मर्यादित वर्तुळापुरता उरत नाही. तो असतो साहित्यिक नि कलावंत, पण त्याच्यातल्या ज्ञानवंताने समाज, विज्ञान, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, निसर्ग पर्यावरण अशी अनेक क्षेत्रेही कवेत घेतलेली असतात. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सृजनात उमटलेले असते, जेव्हा अशा ज्ञानवंतांच्या प्रत्यक्ष सहवासाची लालसा पूर्णत्वास जाते, तेव्हा आत्मसमृद्धीच्या जाणिवेने मन सुखावून गेलेले असते. इतरांना ज्ञानाचे सुख मिळवून देणाऱ्या अरुण खोपकर आणि श्रीनिवास विनायक कुलकर्णी या दोन प्रज्ञावंतांच्या सहवासातून कोरल्या गेलेल्या अविस्मरणीय क्षणांचे हे शब्दचित्र..

एक : अरूण खोपकर

अरुण खोपकर यांचा मी चाहता. बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईत एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उद्घाटन प्रसंगी त्यांचे भाषण ऐकून मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. (नंतर ते भाषण मी त्यांच्याकडून मिळवले.) गेल्या पंचवीस-तीस वर्षांत दोन-चार कार्यक्रमांत त्यांची ओझरती भेट झालेली. त्यांची काही पुस्तके आणि स्फुट लेखन वाचलेले. सिनेमे माहितीपट पाहिलेले. एकदा मंत्रालयात त्यांना माहिती खात्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. कधी एखादा फोन, कधी एखादा ‘हाय हॅलो’चा संदेश… चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालयातून एक जुना दुर्मीळ ग्रंथ मी त्यांना मिळवून दिला होता. संबंध काय तो एवढाच !

एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटावे असे बरेच दिवस मनात होते. कोरोनानंतर त्या विचाराने उचल खाल्ली. त्या कारणाने मी अधूनमधून त्यांना विचारायचो. ते काही ना काही कामात असायचे. लेखन असायचे, दौरे असायचे. माझा पाठपुरावाही सुरू असायचा.

एकदा ते म्हणाले, ‘आपण सप्टेंबरनंतर भेटू.’ त्यानंतर लगेच एक-दोन दिवसांत त्यांचा फोन आला. त्यांचे टाइम-टेबल थोडे मागेपुढे झाले होते. ते म्हणाले, ‘सप्टेंबरऐवजी आपण ऑगस्टमध्ये भेटू. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी!’ मी खूश झालो आणि लगेच त्यांना हो म्हणून शनिवारची वेळ नक्की केली. साडेचारची वेळ ठरली. ६ ऑगस्ट २०२२ हा तो दिवस !

या भेटीसाठी पत्नीला (रेखा) सोबत घेऊन जावे असे डोक्यात आले. पण तिची बँक पाच वाजता सुटते. त्यामुळे वेळेचे गणित कसे सोडवावे, हा प्रश्न होता. सुदैवाने तो खोपकरांनीच सोडवला. ते म्हणाले, ‘हरकत नाही. पाच वाजेपर्यंत आरामशीर आलात तरी चालेल.’ मग मी रेखाला तशी कल्पना दिली. तिला म्हटले, ‘तू सर्व काम आटपून तयारीत राहा. मी तुझ्या बँकेबाहेर टॅक्सी करून उभा राहतो.’

दरम्यान खोपकरांनी एकदा फोन करून आम्हाला खायला काय काय आवडते याची माहिती घेतली. ‘ऑम्लेट चालेल का? केकमध्ये अंडे चालेल का? तुमचा ‘श्रावण’ आहे का? गव्हाची किंवा अन्य एखाद्या पदार्थाची अॅलर्जी आहे का?’ अशा त्यांच्या अनपेक्षित प्रश्नांनी मी चकित झालो. त्यांना

म्हटले, ‘अहो मला फक्त अर्धा कप चहा मिळाला तरी मी खूश असतो.’ त्यावर ते म्हणाले, ‘तो तुमचा विषय नाही. फक्त मी विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरे द्या!’ ती विचारपूस झाल्यावर त्यांनी घराचा पत्ता पाठवला आणि कुठून कसे यायचे, तेही समजावून सांगितले.

ठरल्याप्रमाणे आम्ही साडेचारला माहीमला टॅक्सीत बसून परळला गांधी हॉस्पिटलसमोर पोहोचलो. ‘कल्पतरू हॅबिटॅट’ मध्ये जायचे होते. खोपकरांनी गेटवर सिक्युरिटीला तसेच त्यांच्या इमारतीखाली वॉचमनकडे आमची नावे देऊन ठेवली होती. त्यामुळे आम्ही कोणतीही अडचण न येता २१व्या मजल्यावर त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांचे मदतनीस संजय पाश्टे यांनी दरवाजा उघडला आणि आम्हाला हॉलमधून थेट खोपकरांच्या अभ्यासिकेत नेले. तेथे ते कम्प्युटरसमोर बसून नेहमीच्या एकाग्रतेने काही काम करत बसले होते. गीताताई काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत गेलेल्या होत्या.

औपचारिक ‘हाय हॅलो’ झाले. मी त्यांना रेखाची ओळख करून दिली. अगदी खरे सांगायचे तर पाच मिनिटांची भेट होईल असे डोक्यात होते, पण ती दोन तासांवर गेली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. ‘गप्पा’ म्हणजे आम्ही काहीतरी बडबडण्यापेक्षा त्यांचे ऐकून घेणे हेच शहाणपणाचे होते. (हे अर्थात आमचे मत !)

मी साहित्याचा विद्यार्थी. थोडे लेखन-वाचन केलेले. काही माणसे जोडलेली. काही ठिकाणी फिरलेला आणि जीवनाविषयी थोडेबहुत कुतूहल असलेला माणूस ! रेखा नेमस्त बँक कर्मचारी आणि गृहिणी. एवढ्याशा भांडवलावर आम्ही त्यांच्याशी दोन तास काय बोलणार होतो ?

खेडोपाडी वाचनालये बंद होत आहेत; वाचक कमी होत आहेत असे मी बोलून गेलो. पण त्यांचा अनुभव उलटा होता. वाचनालये चांगली चालत आहेत; लोक खूप वाचत आहेत; प्रकाशन व्यवसायही नीट सुरू आहे, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. मी रायगड जिल्ह्यातील पोलादपूरचा. तसा उल्लेख बोलण्यात आला. पोलादपूरशी त्यांचेही नाते आहे, हे ऐकून मला आश्चर्य वाटले; अभिमानही वाटला.

नवीन तंत्रज्ञानाविषयी थोडे बोलणे झाले. ‘त्यातले मला फार काही कळत नाही’ असे मी बोलून गेलो. ते म्हणाले, ‘जुन्या पिढीतील माणसांनी टेक्नॉलॉजीशी फारकत घेतली आहे, याचे वाईट वाटते. नव्या तंत्रज्ञानाशी सगळ्यांनी कनेक्टेड असायला पाहिजे.’ नव्या पिढीविषयी मात्र ते खूपच आशावादी दिसले. मुले खूप हुशार आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जात आहेत, याबाबत त्यांनी खुशी व्यक्त केली.

आजच्या एकूणच राक्षसी बाजारव्यवस्थेबाबत आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या गोंधळाबाबत मी काहीतरी बोलून गेलो. पण त्याच्याशी ते पूर्णपणे असहमत होते. हे असे अनादी काळापासून चालत आले आहे. त्यामुळे आपण हतबल होऊन जाणे योग्य नाही; असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता.

आमच्या कॉमन आवडीचा विषय म्हणजे अरुण कोलटकर. त्यांच्याविषयी आणि ‘कालकल्लोळ’मधील त्यांच्या प्रदीर्घ लेखाविषयी बोललो. मी त्यांच्या जुन्या-नव्या लेखनाचे कौतुक करत होतो, पण त्यांच्याविषयी मी काही स्तुतीपर बोलायला लागलो, की ते लगेच विषय बदलायचे.

काही वेळाने त्यांच्या अभ्यासिकेतून आम्ही हॉलमध्ये आलो. बाजूला भलेमोठे डायनिंग टेबल होते. आम्हाला त्यांनी तेथे अगदी आग्रहाने आणि प्रेमाने बसवले. मग एकेक खाद्यपदार्थ टेबलावर येऊ लागला. चटपटीत ‘व्हेज कॅनोपी’ने सुरुवात झाली. तो पदार्थ प्रारंभी खायचा अशी पद्धत ! मग छोटे समोसे, चीज सॅन्डविच, वेफर्स, तीन-चार प्रकारची मिठाई आणि शेवटी आइस्क्रीम! एकामागून एक पदार्थ येत होते. अगदी रेलचेल !

खोपकर आग्रह करत होते आणि आम्ही ‘नको नको’ म्हणत खात होतो. यात एक बारकावा होता तो असा की, तेही आमच्याबरोबर मस्तपैकी एन्जॉय करत खात होते. (त्यामुळे आमचाही धीर चेपला.) यजमान आणि पाहुण्यांनी एकाच पातळीवर येऊन भोजनाचा आनंद घेण्याचे असे प्रसंग माझ्या आठवणीत अगदी कमी ! ते आग्रह करून करून वाढायचे. ‘एक घ्या, एक घ्या’ असे म्हणायचे. आम्हाला कल्पना नव्हती की पुढे खूप पदार्थ रांग लावून उभे आहेत ! एखाद्या चित्रपटाचा शेवट जवळ आला आहे, असे वाटत असताना नवा क्लायमॅक्स पुढे यावा, तसे त्यांचे नवे नवे धक्के पुढे येत होते.

आमचे खाणे सुरू होते, तेव्हा मोगी हे त्यांचे मांजर बाजूच्या खोलीतून निषेधात्मक आवाज काढत दरवाजा ओरबाडत ओरडत होते. खोपकरांनी त्याला बंद करून ठेवले होते. आमचे आवरले तसे ते उठले आणि मोगीला छातीशी धरून त्याचे मुके घेत, पाठीवरून हात फिरवत त्याला बाहेर घेऊन आले. ‘तू जेवणाच्या टेबलावर उडी मारतोस ना, म्हणून तुला बंद करून ठेवले होते,’ असा खुलासा त्यांनी केल्यावर ते शांत झाले.

मोगी हे एक भटके मांजर. सोसायटीच्या आवारात एक दिवस एक पिल्लू त्यांना दिसले. त्या पिल्लाला भाऊही होता. सोसायटीतील काही मुलांनी ती पिल्ले खाली एक जागा करून तेथे सांभाळली होती. एक दिवशी त्यातील एक मांजर मेले. मग उरलेले पिल्लू घेऊन खोपकर वर त्यांच्या घरी आले आणि त्यांनी तेथे त्याचा सांभाळ सुरू केला. मुलांनी त्या मांजराचे नाव मोगॅम्बो असे ठेवले होते.

ते खोपकरांकडे राहायला आल्यावर ती मुले आता अधून मधून ‘अपॉइंटमेंट घेऊन’ ठरावीक वेळी मोगॅम्बोला भेटायला वर जात असतात. खोपकर लाडाने त्याला ‘मोगी मोगी’ म्हणत कुरवाळत होते. आम्हाला गंमत वाटत होती. (खोपकरांचा ‘कोश्का’ हा त्यांच्या लाडक्या मांजरीवरील लेख त्यांच्या चाहत्यांना येथे नक्कीच आठवेल !)

खाणे-पिणे झाल्यावर अभ्यासिकेत पुन्हा गप्पा सुरू झाल्या. मी ‘कालकल्लोळ’ आणि ‘चित्रव्यूह’ ही दोन पुस्तके काढून त्यांच्यासमोर ठेवली. त्यांवर त्यांची स्वाक्षरी घेतली. पुस्तकावर ते सही करत असताना फोटो घेतला पाहिजे, असा विचार माझ्या डोक्यात आला. माझी चुळबूळ त्यांच्यातील दिग्दर्शकाने नेमकी ओळखली आणि त्यांनी संजयला बोलवून आमच्या मोबाइलवर फोटो काढून द्यायला लावले. मी एकदम खूश झालो. ‘यातला एक फोटो मी पंचवीस वर्षांनी एक लाख रुपयांना विकणार आहे’ असे म्हणालो तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘काहीच हरकत नाही. कारण तेव्हा मी नसणार!’

आम्ही पुन्हा बाहेर आलो. २१व्या मजल्यावरून दक्षिण मुंबईचे विहंगम दर्शन घडत होते. श्रावणातील एक सर नुकतीच पडून गेल्यामुळे ‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर’ असे चित्र होते. खोपकरांनी आम्हाला वरून मेट्रो वगैरेचे रस्ते कुठून कुठे जातात ते दाखवले. मग एकीकडे हात दाखवत म्हणाले, ‘ती जी सर्वात घाणेरडी इमारत दिसत आहे, ती इन्कमटॅक्सची!’ पुढे ते म्हणाले, ‘तुम्ही तेथून जात असाल तर तिथला कावळासुद्धा तिरकी नजर करून तुमच्याकडे बघतो.’

आधीच आम्ही जवळपास दोन तास अधूनमधून हसत होतो. आता त्या हसण्यावर कळस चढला !

तनमनात एक तृप्ती-समाधान घेऊन खाली उतरलो आणि एका धुंदीतच घरी परतलो. कोरोनाची छाया अजूनही मुंबईवर होती. आम्हीही आमच्या कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात अनेक आव्हानांचा सामना करत होतो. अशा भयग्रस्त आणि संवेदनाहीन वातावरणात एका मोठ्या ज्ञानवंत लेखकाची अशी भेट व्हावी आणि त्याने आमचे निर्मळ माहेरपण करावे हा अनुभव शब्दातीत होता !

मी तीस वर्षे जनसंपर्क विभागात नोकरी केली, पण आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना तुम्हाला काय आवडते किंवा कशाची अॅलर्जी आहे असा प्रश्न त्यांना आधीच विचारण्याचे मला कधी सुचले नव्हते! आपण एखाद्याला घरी जेवायला बोलावले तर यजमान आणि पाहुणे दोघांनीही एकत्र बसून पाहुणे अवघडणार नाहीत अशा पद्धतीने त्यांच्याशी गप्पागोष्टी करत स्वतःही जेवणाचा आनंद घेतला पाहिजे, हा धडाही मिळाला.

घरी आल्यावर मी त्यांना आभाराचा एक संदेश पाठवला. त्यावर त्यांनी लगेच उत्तर देऊन त्यांच्यासोबत काढलेले फोटो ईमेलवर पाठवायला सांगितले. त्यांचा ईमेल आयडीसुद्धा दिला. त्या फोटोंचे महत्त्व फक्त आम्हालाच नाही, तर आपल्यालाही आहे हे दाखवण्याचा मोठेपणाही त्यांच्याकडे होता! तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर सुवर्णकमळ मिळवणाऱ्या माणसासोबत झालेली ही भेट आमच्याही मनात एक कधीही न कोमेजणारे कमळ फुलवून गेली.

***

दोन : श्रीनिवास विनायक कुलकर्णी

श्रीनिवास विनायक कुलकर्णी अर्थात् माझ्यासाठी सर ! सुप्रसिद्ध ललित लेखक, ‘मौजे’चे संपादक आणि माझे एक आदरस्थान. त्यांना कराड येथे भेटायला जायचे ठरले. एम.ए.ला त्यांचे ‘डोह’ हे पुस्तक अभ्यासाला होते. ते अपूर्व स्वरूपाचे लेखन वाचून मी त्यांच्या प्रेमात पडलो. तेवढे पुस्तक वगळता त्यांच्याशी अन्य काही संबंध नव्हता. तशी काही गरजही नव्हती. कारण आपला आवडता लेखक त्याच्या लेखनातून आपल्याला नेहमी भेटत असतो.

‘डोह’मधील त्यांच्या लेखनाचे मनावर गारूड होते, अजूनही आहे. विशेष म्हणजे आपल्यालाही असे काही लिहिता येईल, असा विश्वास ते पुस्तक वाचून मनात निर्माण झाला. ‘पाण्यातले दिवस’ (राजहंस प्रकाशन) हे माझे पुस्तक त्या विश्वासातूनच जन्माला आले. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सावित्री नदीत डुंबण्यात आणि मासेमारी करण्यात माझे बालपण गेले; त्या आठवणी त्या पुस्तकात आल्या आहेत. (श्री. ग. माजगावकर यांनी ते लेखन जसेच्या तसे ‘माणूस’च्या एका दिवाळी अंकात ‘कव्हर स्टोरी’ म्हणून छापले होते. दिलीप माजगावकरांनी ‘पाण्यातले दिवस’ या नावाने ते पुस्तकरूपाने प्रकाशित केले. १९९३ साली त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ललित गद्याचा पुरस्कारही मिळाला.)

पुढे कधीतरी सरांचा नंबर मिळवून दोन-चारदा त्यांच्याशी बोलल्याचे आठवते. वाचन-लेखनाविषयी बोलणे झाल्यावर प्रत्येक वेळी ‘आशीर्वाद द्या’ असे मी म्हणायचो तर, ‘आशीर्वाद नाही आपण मित्र आहोत; माझ्या तुम्हाला शुभेच्छा’ असे ते म्हणायचे. ‘तांबट’ पक्ष्याच्या निरीक्षणावर आधारित माझे ‘तांबट’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले आहे. त्याचे हस्तलिखित मी सरांना पाठवले. त्यांनी ते तपासून आपल्या मौलिक सूचनांसह त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातील एक पत्र मला पाठवले. ते मी अजून जपून ठेवले आहे.

साहित्य संस्कृती मंडळाच्या कामकाजाच्या अनुषंगाने ते कधीतरी मंत्रालयात येत, पण आमची भेट झाल्याचे आठवत नाही. फोनवर मात्र बोलणे व्हायचे. ‘लोकराज्य’च्या ‘वाचन विशेषांका’साठी त्यांच्या मागे लागून एक लेख मी लिहून घेतला होता. ‘मौजे’च्या संपादकांना आपण ‘लोकराज्य’शी जोडू शकलो, याचा कोण आनंद तेव्हा मला झाला होता. अर्थातच अभिमानही वाटला होता. पुढे अधूनमधून फोन करून मी त्यांच्याशी बोलू लागलो. ते मोकळेपणाने आणि अगत्याने बोलायचे. त्यांचे बोलणे माझ्यासाठी एक संस्कार असायचा.

त्यांना एकदा समक्ष भेटावे असा विचार नेहमी मनात यायचा. तसे मी त्यांना बोलून दाखवायचो. मुंबई आणि कराड अशा दोन्ही ठिकाणी ते आलटून-पालटून राहायचे. ‘नक्की भेटूया’ असे ते म्हणायचे. मी ‘हो हो’ करायचो आणि तो विषय तिथेच थांबायचा. सरकारी नोकरीत महाराष्ट्रभर सतत फिरावे लागल्यामुळे माझ्या मित्र-आप्तेष्टांपासून नकळत दूर झालो होतो.

लेखन-वाचनाचीही आबाळ झाली होती. मंत्रालयात बदली झाल्यावर थोडे स्थैर्य मिळाले आणि निवृत्तीनंतर पुरेसा वेळ मिळाल्यामुळे राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना कराडचे पत्रकार मित्र, ‘कृष्णा एक्सप्रेस’चे संपादक गोरख तावरे यांना एक दिवस कराड-भेटीविषयी विचारले. कुलकर्णी सरांना भेटायचे आहे, असे स्पष्ट केले तर ते आनंदून म्हणाले, ‘त्यांचा मुलगा उदयन (मर्देकर स्मारकाचे आर्किटेक्ट) यांच्याशी माझी ओळख आहे; काही अडचण येणार नाही, जरूर या!’

अखेर तो दिवस उजाडला. १७ जुलै २०२५. दुपारी उशिरा मी आणि रेखा मुंबईहून एस.टी.ने कराडला पोहोचलो. दिवसभर पाऊस पडत होता. पिशव्या रेस्ट हाऊसवर टाकल्या. ताजेतवाने झालो. खाणेपिणे आवरले आणि गोरख यांच्यासोबत प्रथम कृष्णा-कोयना संगमावर गेलो. मग तेथून सरांना भेटण्यासाठी वाकाण परिसरातील सुशांतनगरमध्ये शिरलो. तोवर संध्याकाळ होत आली होती. एके ठिकाणी ‘उदयन कुलकर्णी’ अशी पाटी दिसली. तेथे थांबलो. ते आमची वाट पाहत होते.

फाटक ओलांडून आत शिरताच तेथील वेगळेपणाची जाणीव झाली. अंगणात फॅशनेबल फरशांऐवजी दगड बसवलेले होते. आजूबाजूला भरपूर झाडे लावलेली होती. घराच्या बांधकामात दगड, माती, लाकूड जास्त वापरलेले तर सिमेंट नावापुरते होते ! उदयन यांनी आपल्या मनाप्रमाणे बांधलेल्या या घराने आमच्याशी जवळिकीचे नाते निर्माण केले. आत शिरतोय तोवर त्यांच्या कोकीने भुंकून भुंकून आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली. (उदयन यांनी तिला शांत केले. मग ती निमूट झाली आणि बाजूच्या बैठकीवर बसून आमच्या गप्पा ऐकू लागली.)

मुंबईतील घरांच्या तुलनेत प्रशस्त अशा बैठकीच्या खोलीत आम्ही आलो. तेथून डावीकडे एक पायरी खाली उतरून गेले की पडवीचा भास निर्माण करणारे आणि मधे भिंत नसलेले स्वयंपाकघर. दुसरीकडे पाच-दहा जणांना मांडी घालून बसता येईल, अशी बैठकव्यवस्था. बाजूला विराजमान हार्मोनियम. मधोमध दर्शनी भिंतीसमोर खुर्चा, सोफासेट, कोपऱ्यात काटकोनातील टेबल-टीपॉय. नाटकाचा सेट पाहत आहोत, असे वाटले.

बाजूची खोली सरांची. आम्ही आल्याचा निरोप त्यांना गेला. उदयन, त्यांची पत्नी वर्षाताई, आई ललिताबाई साऱ्यांचा परिचय झाला. तपकिरी देखणा झब्बा आणि निळी जिन्स अशा रुबाबदार वेषात, काठी टेकत ते बाहेर आले. त्यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केली आहेत, यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही एकमेकांना प्रथमच पाहत होतो. पण लगेच सूर जुळले आणि गप्पांचा सिलसिला सुरू झाला.

सरांना ऐकू येत नाही, पण ते व्यवस्थित बोलू शकतात ! (त्यांना अलीकडे Trigeminal neuralgia झाल्याने त्यांचा चेहरा आणि मान दुखत असते.) उदयन यांनी पाटी पेन्सिल आणून दिली. प्रश्न लिहून दिला की सर बोलायला सुरुवात करत. मग दुसरा प्रश्न, मग तिसरा; मग त्यांची तोंडी उत्तरे अशी मैफल सुरू झाली! अधूनमधून उदयन, वर्षाताई, ललिताबाई, गोरख यांच्या प्रतिक्रिया असायच्या. लेखन-वाचन, नाटक-सिनेमा, असे अनेक विषय होतेः

समकालीन साहित्य व्यवहाराविषयी त्यांचे स्मरण अगदी तल्लख होते. नावे, तारखा तोंडावर होत्या. वाणी स्वच्छ आणि खणखणीत होती. आणि त्यांचा मिश्कील स्वभाव अगदी पूर्वीसारखाच त्यांच्या सोबत होता.

मी आमच्या गावी पोलादपूर येथे घर बांधत होतो, हे त्यांना माहीत होते. (ही २०१२ सालची गोष्ट.) ‘घराचे कुठवर आले, तिकडची व्यवस्था कोण बघते,’ असे त्यांनी विचारले. त्यांची ती स्मरणशक्ती बघून मी थक्क झालो.

‘नदीवर मासेमारी करणाऱ्या एका छोट्या मुलावर मी चित्रपट लिहिला आहे’, असे त्यांना सांगितले, तेव्हा ते खूश झाले. नदी हा त्यांच्याही आवडीचा विषय. ‘त्या नदीचे नाव काय, चित्रपटाचे नाव काय’, असे विचारत माझी उत्तरे ऐकून पसंतीची दाद देत राहिले. व्यावसायिक रंगभूमीवर माझे नवीन नाटक येत आहे हे सांगितल्यावर ‘नाटकाचे नाव काय, प्रमुख भूमिका कोण करणार,’ अशी माहिती त्यांनी विचारली आणि त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवत मला शुभेच्छा (आणि या वेळी) आशीर्वादही दिला.

मी त्यांची रुची जाणून असल्यामुळे काय बोलायचे याचे मला भान होते आणि त्यामुळे माझ्या प्रत्येक प्रश्नावर ते खूश होते, आणि छान स्मित करत सविस्तर उत्तर देत होते. त्यांनी तपासून दिलेले ‘तांबट’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रसिद्ध केले आहे तसेच माझ्या हिमालयातील भ्रमंतीवर आधारित ‘हिमाक्षरे’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे, हे मी त्यांना सांगितले. उदयन, वर्षाताई, ललिताबाई, रेखा आणि गोरख आमचा हा संवाद कौतुकाने ऐकत होते.

माझ्या प्रश्नाला त्यांचे काय उत्तर येणार, याची कधी कधी मला कल्पना असायची. तसे मी इतरांना आधीच सांगायचो आणि मग तसेच उत्तर आल्यावर आम्ही सर्व जण मोठ्याने हसायचो. अशा वेळी सर आमच्याकडे प्रश्नचिन्हांकित चेहऱ्याने पाहायचे. त्या गप्पाष्टकात म. द. हातकणंगलेकर, पाडगांवकर यांची आठवण निघाली. ‘मौज’ दिवाळी अंकाचा विषय निघाला, तेव्हा ‘मोनिका गजेंद्रगडकर माझ्या मित्राची मुलगी’ असे ते म्हणाले आणि मग अर्थातच विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दीचा विषय निघाला.

आम्ही ‘आवाजाच्या दुनियेत’ आणि ते एका ‘परम शांततेच्या विश्वात’ असे दृश्य होते. गोंगाट आणि सन्नाटा यातील सुसंवादाच्या त्या अपूर्व वास्तवाने मी थरारून गेलो. तो अनुभव कथा, कविता, नाटक, सिनेमा अशा निर्मितीची अनेक बीजे माझ्या मनात टाकत गेला.

सरांच्या भेटीमुळे मी इतका उत्साहलो होतो की कोणताही प्रोटोकॉल न पाळता, काहीही टेन्शन न घेता अनौपचारिकपणे बोलत सुटलो होतो. त्यात कधी भाबडेपणा, कधी बालिशपणा, कधी गंभीरपणा तर कधी गमतीचा सूर असायचा. पाटीवर प्रश्न लिहून देताना आपले शुद्धलेखन चुकणार तर नाही ना याविषयी मी काळजीत असायचो. ‘सर रागावणार तर नाहीत ना’ असे म्हटले की सर्वांना हसू यायचे. आम्ही सगळेच कळत-नकळत मोकळेपणाच्या पातळीवर आल्याने प्रसंगनिष्ठ विनोदांनी वातावरण हलकेफुलके झाले होते.

मधेच वर्षाताई म्हणाल्या, ‘अण्णांचे (सरांचे) मित्र म्हणजे (‘सत्यकथा’- ‘मौजे’च्या संस्कारातील) गंभीर चेहरा करून बसणारे कोणीतरी येणार असे वाटले होते, पण तुमच्या या भेटीने तो गैरसमज दूर झाला.’ ते ऐकून मी खूश झालो.

‘घरी हे असेच (बडबडत) असतात का आणि तुम्ही अशाच (गप्प) असता का?’ वर्षाताईंनी रेखाला विचारले. तेव्हा ‘घरी हे शांत आणि मी बडबडत असते’ असे ती म्हणाली. त्यावर हास्याचा फवारा उडाला. ‘आमच्या घरीही असेच चालते,’ अशी पुष्टी उदयन यांनी जोडली आणि हास्याचा आणखीन एक मजला चढला.

वर्षाताईंनी आग्रहाने आम्हाला दडपे पोहे खाऊ घातले. योगायोगाने दडपे पोहे हा माझा आवडता पदार्थ. त्यावर त्यांनी काकडी किसून घातली होती. तो बारकावा मी उघड करताच त्या संतोष पावल्या. आमच्यासाठी काय करावे, असा विचार करत असताना त्यांनी दडप्या पोह्यांची निवड केली होती. तो निर्णय योग्य ठरला याचे त्यांना समाधान झालेले दिसत होते. पोह्यांच्या पाठोपाठ त्यांनी बशीतून एकेक वडी आणून प्रत्येकाला दिली आणि ती कसली हे ओळखायला सांगितले. वडी जांभळाची होती! त्या नव्या पदार्थावर त्यांच्या मित्रमंडळींचे काही प्रयोग सुरू असून ती त्यांना यथावकाश बाजारात आणायची होती. ते झाल्यावर मस्त चहा आला. वर्षाताई कोकणातल्या. त्यांचे तिकडचे नाव हर्डीकर. त्यांची प्रत्येक गोष्ट शिस्तीत आणि नियोजनबद्ध. त्यांनी शिक्षणशास्त्रावरील विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे हे सरांनी कौतुकाने सांगितले. विवेक सावंत सर यांच्या ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ (एमकेसीएल) या प्रसिद्ध संस्थेच्या शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांचे काम सुरू असते.

मी रेखाला म्हटले होते, ‘आपण फक्त पाच मिनिटे जाऊन सरांना पाहून येऊ.’ पण तिथे गेल्यावर दीड-दोन तासांची मैफील रंगणार आहे, याची कल्पना नव्हती. ‘बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठली आवडी !’ मी उघडपणे तसे बोलून दाखवले. निघताना सर म्हणाले, ‘तुमची भेट जरा आधी झाली असती तर मी तुम्हाला ‘मौजे’त लिहायला लावले असते !’ ते ऐकून मी भरून पावलो !

‘डोह’ पाठोपाठ ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ ही सरांची ललित लेखनाची पुस्तके आली. पण त्यांना ओळख मिळाली ती ‘डोह’कार म्हणून ! प्रारंभी त्यांनी कविताही लिहिल्या. त्यातील काही खुद्द ‘सत्यकथे’त छापून आल्या. एकदा श्री. पु. भागवत त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या कविता ‘मौजे’कडे संग्रहासाठी द्या!’ ‘तुम्हाला जर वाटत असेल’ याचा अर्थ ‘श्री.पुं.ना तसे वाटत नव्हते.’ हे श्री. वि. कुलकर्णी यांच्या लक्षात आले नसते तरच नवल! अर्थात संग्रहाचा विचार त्यांनी कायमचा सोडून दिला. हा किस्सा सरांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला आहे. अशी माणसे विरळा! या ज्ञानवंत माणसांच्या काळात जगायला मिळावे, या जाणिवेने मला त्या क्षणी कृतकृत्य वाटत होते.

सर्वांनीच आम्हाला जेवणाचा आग्रह केला. ‘जेवणाची वेळ झालीच आहे’ असे वर्षाताई म्हणाल्या. पण पूर्वकल्पना न देता असे वागणे मनाला पटेना. आम्ही मुंबईहून जाताना एका ठिकाणीची बालुशाही सोबत नेली होती. तो खाऊ पाहून सरांना आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही ! वर्षाताईंनी त्यातील एक वाटीत दुधात भिजवून सरांना दिली. ती त्यांनी आमच्या समोरच खाल्ली. ‘मला आवडली, पूर्ण खाल्ली!’ असे सांगायलाही विसरले नाहीत. ही छोटीशी घटनाही माझ्या भावविश्वात खोल रुजली. (सरांना काहीतरी खायला न्यावे आणि त्यांनी ते आपल्यासमोर खावे, असे मनापासून वाटले होते.)

शेवटी गोरख यांनी फोटोची कल्पना काढली. मग आम्ही बसून, उभे राहून फोटो काढले. फोटोसाठी उभे राहताना सरांनी ‘काठी नको’ असे म्हणत ती बाजूला फेकून दिली. खोलीतून बाहेर येताना ते काठी टेकत आले होते आणि आता काठी फेकून देत होते. त्या दीड तासांच्या मैफिलीचा तो चमत्कार माझ्यातील लेखक-दिग्दर्शकाने टिपला. सरांना आपण कंटाळा दिला नाही, उलट वय विसरायला लावले हे लक्षात आले. खरेतर यात त्यांच्याच चैतन्याचा भाग अधिक होता, पण मी मात्र स्वतःची पाठ थोपटून घेत होतो.

रात्री ९ वाजता तेथून निघालो, तेव्हा सारे कुटुंब आम्हाला बाहेर सोडायला आले. सरही दरवाजात उभे राहून हात हलवत होते. आम्ही पुन्हा यावे, असा प्रत्येकाचा आग्रह होता… तोवर पाऊस उघडलेला होता. कराडवर निवांत रात्र उतरली होती. आधी कृष्णा-कोयनेच्या संगमावर जाऊन स्वतःला हरवून बसलो होतो आणि आता श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्यात आणि माझ्यात सुसंवादाचा एक नवा झुलता पूल बांधून तयार झाला होता. ‘मृगजळातल्या यक्षघराला’ घेऊन जाणारी पायवाट कदाचित तेथूनच फुटत असावी.

***

(लेखक विविधांगी स्वरूपाचे ललित लेखन, नाटके, एकांकिका, कविता लिहितात. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून ते संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. वेबसाइट- www.pralhadjadhav.com)

pralhadjadhav.two@gmail.com, l संपर्क: ९९२००७७६२६

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

आपले घर, आपला किल्ला !

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या