‘प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे वाढतोय किडनी स्टोनचा धोका’ :  डॉ. राजेंद्र नेर्ली

Energy drinks increase the risk of kidney stones

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी स्टोनचा धोका वाढतोय असा इशारा डॉ. राजेंद्र नेर्ली यांनी तरुणांना दिला. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बहुआयामी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘युरिनरी स्टोन डिसीज आणि प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.

प्रोटीन पावडरमुळे मुत्रपिंडावर ताण

प्रा. डॉ. राजेंद्र नेर्ली यांनी ‘किडनी स्टोन’ या अत्यंत वेदनादायी आणि गंभीर वैद्यकीय समस्येवर प्रकाश टाकला. आजकालच्या धकाधकीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे साधारण १० टक्के लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी या आजाराच्या मुख्य कारणांचे विश्लेषण करताना सांगितले की, दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी न पिणे, फास्ट फूड आणि इतर आहारातून मीठ व साखरेचे शरीरात जाणारे अतिरिक्त प्रमाण हे खडे तयार होण्यास कारणीभूत ठरते. जिममध्ये जाऊन शरीरसौष्ठव कमावण्यासाठी तरुण वर्गाकडून कोणतीही वैद्यकीय सल्ला न घेता मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी ‘प्रोटीन पावडर’. या पावडरच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडावर ताण पडून स्टोन तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Energy drinks increase the risk of kidney stones)

‘शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ चा वापर

किडनी स्टोनवरील उपचारांच्या आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा आढावा घेताना ते म्हणाले की, पूर्वी खडा काढण्यासाठी रुग्णाची मोठी ओपन सर्जरी करावी लागत असे, जी अत्यंत क्लेशदायक होती. मात्र, आता तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असून कमीत कमी चीरफाड करणारे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये ‘शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ चा वापर सर्वाधिक केला जातो. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. नेर्ली यांनी उत्तरे दिली. शॉकवेव्ह ऊर्जेचा वापर करताना इतर अवयवांना इजा होत नाही का? या प्रश्नावर ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित आहे. मानवी शरीरात किडनी ही पाठीमागच्या बाजूस स्थित असते. त्यामुळे पाठीमागून ध्वनी लहरींचा मारा करणे अधिक सोयीचे आणि सुरक्षित असते, ज्यामुळे इतर अंतर्गत अवयवांना कोणताही धोका पोहोचत नाही. मात्र, एकदा खडा फोडल्यानंतर त्याची पावडर जर शरीरातून पूर्णपणे बाहेर फेकली गेली नाही, तर त्याच कणांभोवती पुन्हा नवीन खडा तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Energy drinks increase the risk of kidney stones)

एनर्जी ड्रिंक्सचा धोका

पिण्याच्या पाण्यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भारतात विहिरीचे पाणी पिणे सर्वसाधारणपणे सुरक्षित मानले जाते, परंतु आजकालच्या तरुणाईमध्ये ‘एनर्जी ड्रिंक्स’ पिण्याची जी क्रेझ वाढली आहे, त्यामुळे किडनी स्टोनचा धोका कित्येक पटींनी वाढू शकतो.

विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग बंधनकारक करा….

कोल्हापूरच्या मेनन बेअरिंग्ज लि. आणि मेनन अल्कॉप लि. चे व्यवस्थापकीय संचालक अरुण आराध्ये यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी भारताच्या सध्याच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडकडे लक्ष वेधताना सांगितले की, “आज भारताकडे जगात सर्वाधिक तरुण मनुष्यबळ आहे, ही अत्यंत जमेची बाजू आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्याकडे कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे.” केवळ चार भिंतींच्या आत मिळणारे पुस्तकी ज्ञान आताच्या स्पर्धेच्या युगात पुरेसे नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. यावर उपाय म्हणून त्यांनी एक अत्यंत व्यावहारिक सूचना केली; शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरातील स्थानिक उद्योगांशी आणि कारखान्यांशी अधिक घट्ट टाय-अप करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून प्रॅक्टिकल ट्रेनिंग बंधनकारक करावे, ज्यामुळे विद्यार्थी उद्योगांच्या थेट गरजा समजू शकतील.

प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी भौतिकशास्त्र, वैद्यकीय विज्ञान आणि औद्योगिक ज्ञान या तिन्ही भिन्न वाटणाऱ्या क्षेत्रांचा एकमेकांशी कसा घट्ट संबंध आहे आणि या कार्यक्रमातून तो कसा उत्तमरित्या उलगडला, याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या आंतरविद्याशाखीय व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात, असे ते म्हणाले. डॉ. एम. आर. वायकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एम. व्ही. टाकळे यांनी आभार मानले. (Energy drinks increase the risk of kidney stones)

Related posts

उच्च न्यायालयाकडून गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश

डेंग्यूवरील पहिली लस ‘क्यूडेंगा’ भारतात उपलब्ध

हरजिंदर कौर,  गुलवीर सिंगने पटकावली रौप्य पदके