कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एका चांदी व्यावसायिकाच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. ईडीच्या पथकाने त्यांची १२ तासाहून अधिक वेळ चौकशी केली. उपनगराध्यक्षांना २४ जून रोजी चौकशीसाठी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स अधिकाऱ्यांनी बजावले आहे .हुपरी शहरात पहिल्यांदाच ईडीची धाड पडल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. (ED action silver traders)
हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या चांदी उद्योजक माजी उपनगराध्यक्ष भरतराव आण्णासाहेब लठ्ठे यांच्या घरावर शुक्रवारी मुंबईहून आलेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली. .ईडीच्या अधिकाऱ्यांनी भरतराव लठ्ठे, त्यांचा मुलगा,पत्नी,सून यांच्यासह कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. हुपरी इथल्या महावीर नगरात भाजपचे माजी उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे हे आपल्या पत्नी,मुलगा,सून आदी कुटुंबासह राहतात.ते हुपरी नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष तसेच पक्षप्रतोद म्हणून कार्यरत होते. ते परवानाधारक सावकार आहेत. निधी बँकेशी त्यांचा संबध आहे. त्यांचे परदेशातही व्यवसाय आहेत. (ED action silver traders)
ईडी पथकाने सुरवातील कार्यालयात चौकशी केली त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि घरातील कर्मचाऱ्यांकडेही चौकशी केली. तसेच घरातील कागदपत्रांची तपासणी केली. कारवाईनंतर भरतराव लठ्ठे यांचा मुलगा राकेश लठ्ठे यांनी आजच्या कारवाईत आक्षेपार्ह असे सापडले नसून वडील भरतराव लठ्ठे यांच्या परदेशातील भागिदारांवर ईडीची कारवाई झाली असून त्याच्या चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. तसेच वडील भरतराव लठ्ठे यांना २४ रोजी मुंबई ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवल्याचे समन्स दिल्याचे सांगितले. (ED action silver traders)