कोल्हापूर : प्रतिनिधी : सत्ता ही समाजातील तळागाळातील लोकांसाठी राबवायची असते याचे भान ठेऊन जात, धर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकी जपणारा शाहू राजा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट, नाट्य दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी केले. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Dr. Jabbar Patel honoured)
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शाहू महाराजांच्या १५१ जयंतीचे औचित्य साधून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. जब्बार पटेल यांनी राजर्षी शाहूंच्या कार्याचा पट उलगडून दाखवताना कोल्हापूर कलानगरीचे कौतुकही केले.
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर संविधान, लोकशाही हे हक्क शब्द ऐकायला मिळाले. पण हे शब्द प्रत्यक्षात अंमलात आणणारे शाहू महाराज होते, अशा शब्दात डॉ. पटेल यांनी कौतुक केले. कोल्हापूर संस्थान आणि भारतात लोकशाही नसतानाही शाहू महाराजांनी समतेचा विचार रुजवला आणि प्रत्यक्षात अंमलात आणला. सामाजिक मुल्ये जपणारा राजा कोल्हापूरात होऊन गेला हे या नगरीचे भाग्य आहे, असे डॉ. पटेल म्हणाले. (Dr. Jabbar Patel honoured)
गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर जाऊन शाहू महाराज चहा घेण्याचे उदाहरण म्हणजे तळागाळातील माणसांचा संबध सत्तेतून कसा जोडायचे हे एक उदाहरण आहे. महाराजांनी सर्वजाती धर्मांना समान न्यायाची आणि एकतेची भावना निर्माण करण्याचे काम केले. त्यामागे महाराजांचा दृष्टीकोन माणुसकीचा होता याकडे डॉ. पटेल यांनी लक्ष वेधले.
ज्याला संगीत कळतं, तो माणुस मोठा असतो असे वर्णन करत शाहू महाराजांनी सर्व भाषांचा आदर करत सांस्कृतिक मुल्य जपणारा हा पहिला राजा होता. लोककलेला राजाश्रय दिला. चित्रकला, नाटक, साहित्य, नृत्य यासह सर्व कलांना आणि कलाकारांना उत्तेजन दिले. राजस्थान मधून अत्रोली घराण्याचे अल्लदियाँ खान यांना कोल्हापूरात आणून महाराजांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले. शाहू महाजांनी बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार संगीत क्षेत्राला दिले आहेत. (Dr. Jabbar Patel honoured)
आरक्षणाचा जनक शाहू राजा
तळगाळातील लोकांना सन्मानाची वागणून देण्यासाठी कोणाचाही डोक्यात येणार नाही अशी आरक्षणाची कल्पना महाराजांनी प्रत्यक्षात आणली अशा शब्दात डॉ. पटेल यांनी गौरव केला. अनेकांचा विरोध डावलून ५० टक्के आरक्षणाची प्रक्रियाही त्यांनी राबवली. या सर्वाचे मुळ महाराजांच्या शिक्षणात होते. पाश्चात सुधारणा आणि भारतीय संस्कृती यांचे सुरेख मिश्रण शाहू महाराज होते. महिलांच्या हिताचे कायदे, बालविवाह, जरठविवाहाला बंदी आणली. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केले. गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का बसलेल्या फासेपारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणून स्वाभिमानाने जगायला शिकवले.
शाहू महाराज एक कॅबिनेट होते
लोकशाहीत मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव असे मिळून एक कॅबिनेट होते. पण शाहू महाराजांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, क्रीडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री अशी सगळीच कामे त्यांनी केली. शाहू महाराज हे माणूपण जपत देवतांच्या पलिकडे गेलेले व्यक्तिमत्व होते, असे डॉ. पटेल म्हणाले.
कोल्हापूर सिनेमाचे स्कूल
कोल्हापूर हे सिनेमाचे स्कूल असून ते जपले पाहिजे. या भूमीने व्ही.शांताराम, चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे, सुलोचना यांच्यासह दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक चित्रपटसृष्टीला दिले. माझ्या पहिला सामना चित्रपटाचा शुभारंभ जयप्रभा स्टुडिओत झाला. चंद्रकांत मांडरे यांनी चित्रपटाचा पहिला क्लॅप दिला. भालजी पेंढारकर यांनी नारळ फोडला आणि लता मंगेशकर उपस्थित होत्या. लता मंगेशकरांनी ‘सख्या रे घायाळ मी हरिणी..’ हे गाणेही गाण्याचे मान्य केले आणि ते अजरामर झाले अशा आठवणी डॉ. पटेल यांनी सांगताना कोल्हापूरचे ऋणानुबंध उलगडून दाखवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपटाचे चित्रिकरणही कोल्हापूरात झाले. त्याला विद्यमान शाहू छत्रपतींनी मोठी मदत केल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. त्यांनी बग्गीसह अनेक स्थळे चित्रकरणास उपलब्ध करुन दिली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता मामुटीसह कोल्हापूर चित्रीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. (Dr. Jabbar Patel honoured)
घाशीराम कोतवाल नाटक पुन्हा रंगमंचावर आणा
खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या घाशीराम कोतवाल यांच्या नाटकाचे कौतुक केले. अडीचशे वर्षापूर्वी महाराष्ट्राचे समाजजीवन दाखवताना महाराष्ट्र कसा नसला पाहिजे हे घाशीराम कोतवाल या नाटकाने दाखवले. या नाटकाने महाराष्ट्राला ७० च्या दशकात एक दिशा दिली. हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणावे अशी मी त्यांना विनंती केली असून त्यांनी माझी विनंती मान्य केली आहे असेही शाहू छत्रपतींनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अशोक चौसाळकर यांनी करुन दिला. मानपत्राचे वाचन ट्रस्टच्या सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले.