द्रमुकचे २२ खासदार कुठे जाणार? एनडीए की इंडिया आघाडी?

नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचण्यासाठी एनडीएला आणखी एका महत्त्वाच्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे आणि तो पक्ष म्हणजे द्रमुक. त्यासंदर्भात नेमकं काय घडतं याकडं देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. (DMK plays major role in national politics)

द्रमुकची वेगळी आसनव्यवस्था

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं द्रमुकची साथ सोडून अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाशी हातमिळवणी केली. त्यामुळं नाराज झालेल्या द्रमुकने लोकसभा आणि राज्यसभेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केली. आगामी पावसाळी अधिवेशनात द्रमुकचे खासदार इंडिया आघाडीतील इतर पक्षांपासून वेगळे बसणार आहेत. सध्या द्रमुकचे लोकसभेत २२, तर राज्यसभेत ८ खासदार आहेत. (DMK plays major role in national politics)

तृणमूल काँग्रेसमधून फुटलेले २० आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामधून फुटलेल्या ६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानं लोकसभेतील एनडीएचं संख्याबळ ३१८ पर्यंत पोहोचलंय. त्यात द्रमुकच्या २२ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास हा आकडा ३४० वर जाईल. लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३६३ सदस्यांची आवश्यकता आहे. एनडीए अजूनही या आकड्यापासून २३ खासदार दूर आहे. मात्र, ते संख्याबळ मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातंय. ते मिळाल्यास सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

विरोधी आघाडीत ठेवण्याचे प्रयत्न

ही बाब काँग्रेसच्याही लक्षात आली असून त्यांनी द्रमुकला पुन्हा विरोधी आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडं दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला द्रमुकची उपस्थिती नव्हती. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण द्रमुक आणि एम. के. स्टालिन यांच्यासोबत संविधान, संघराज्य व्यवस्था आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र काम करण्यास इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं. याचाच अर्थ काँग्रेसनं द्रमुकसाठी संवादाचं दार खुलं ठेवलंय आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी द्रमुकला विरोधी आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस नेत्यांचं म्हणणे आहे की अनेक राज्यांत परस्परांविरुद्ध निवडणुका लढवूनही अनेक पक्ष संसदेत विरोधक म्हणून एकत्र काम करतात. त्यामुळं द्रमुकनं इंडिया आघाडीचा औपचारिक भाग नसले, तरी संसदेत विरोधी पक्षांच्या दररोज होणाऱ्या बैठकीत सहभागी व्हावं. (DMK plays major role in national politics)

काँग्रेस सध्या याच रणनीतीवर काम करतेय. त्यामुळं द्रमुकला एनडीएच्या गोटात जाण्यापासून रोखता येईल आणि सरकारच्या परिसीमन विधेयकासह इतर महत्त्वाच्या विधेयकांच्या योजनांना धक्का देता येईल, असा काँग्रेसचा विश्वास आहे.

बघूया द्रमुक काय निर्णय घेते. कारण द्रमुकच्या निर्णयावर देशाच्या पुढच्या राजकारणाला दिशा अवलंबून आहे.

Related posts

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना