विजयाबाईः हयात असलेल्या आणि नसलेल्या

  • हेमंत कर्णिक

हयात असलेल्या विजयाबाई आणि हयात नसलेल्या विजयाबाई यांच्यात फरक काय? (Vijaya Mehta: Living and Dead)

फरक असा की हयात विजयाबाई म्हणजे वर्तमानातल्या विजयाबाई. आज त्या ज्या आहेत, त्या विजयाबाई. आज त्या कार्यरत नसल्या, तर कालपरवा ज्या होत्या, त्या; म्हणजे त्यांच्या कालपरवाच्या कृत्यांच्या रूपाने, त्या कृत्यांच्या परिणामांच्या रूपाने जाणवणाऱ्या विजयाबाई.

हयात नसलेल्या विजयाबाई म्हणजे विजयाबाईंची संपूर्ण कारकीर्द. त्या ज्या कार्यक्षेत्रात होत्या तिथे त्यांनी कायमचा ठेवलेला ठसा. आज विजयाबाई हयात नाहीत. या संदर्भातच त्यांच्याविषयी लिहिलं बोललं गेलं पाहिजे. (Vijaya Mehta: Living and Dead)

आज विजयाबाईंचे भक्तगण किंवा त्यांचे शिष्यगण मोठ्या संख्येने शिल्लक आहेत आणि कामही करत आहेत. बाईंच्या कडू आणि गोड आठवणी त्यांच्याकडून ऐकायला वाचायला मिळत आहेत. त्या आठवणींवरून विजयाबाई नावाची एक भली मोठी आख्यायिका उभी राहणार आहे. उद्या नाही तर परवा विजयाबाईंवर मराठीतच काय इंग्रजीतही लेख, पुस्तकं येणार आहेत. कारण विजयाबाईंचा प्रभावी वावर मराठीच्या पलीकडे पसरलेला होता. विजयाबाईंचे संस्कार मानणारे अनेक जण आज कार्यरत आहेत.

मराठी नाटक दोन पाय-या वर

विजयाबाईंची मुख्य ओळख मराठी रंगभूमीवरील नाट्यदिग्दर्शक, ही आहे. त्यांनी नाटक सिनेमात अभिनय केला, चित्रपटांचं दिग्दर्शन केलं तरी विजयाबाई म्हणजे नाटक. नाटकाचं दिग्दर्शन. आता, नाटकाच्या दिग्दर्शकांबद्दल एक निरीक्षण असं आहे की ते कलावंत असले तरी त्यांच्या कलेला गोचर रूप नसतं. नाटक संपलं की नुसत्या आठवणी उरतात. कितीही कॅमेरे वापरून नाटकाचं चित्रीकरण करून ठेवलं तरी त्यातून नेपथ्य दिसतं, अभिनय दिसतो, शब्दांच्या माध्यमातून लेखन तर जाणवतंच जाणवतं; पण दिग्दर्शनाची अनुभूती थेट मिळत नाही, ती मानून घ्यावी लागते. त्यामुळे ‘हे पहा विजयाबाईंचं काम आणि कर्तृत्व,’ असा निर्देश ढोबळपणे करता येत नाही. (Vijaya Mehta: Living and Dead)

असं असलं तरी मराठी रंगभूमीच्या संदर्भात विजयाबाईंचा ठसा सांगण्यासाठी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकेका नाटकाची साक्ष काढण्याची गरज नाही. विजयाबाईंनी मराठी नाटकाला दोन पायऱ्या वर उचलून ठेवलं. मराठी नाटक जिथे होतं, त्याच्या वर दोन पायऱ्या आहेत आणि त्या चढणं शक्य तर आहेच; पण ते आवश्यकही आहे, असं आग्रहाने मांडून ते त्यांनी करून दाखवलं. तेसुद्धा अगदी लहान वयात.

तेंडुलकरांच्या नाटकांचं आव्हान

‘श्रीमंत’ या तेंडुलकरांच्या नाटकापासून त्यांची दिग्दर्शनाची कारकीर्द सुरू झाली. तेंडुलकरांची नाटकं कोल्हटकर, कालेलकर, कानेटकर यांच्याप्रमाणे धो धो चालली नाहीत; पण ‘मराठी रंगभूमी’ म्हटल्यावर देशपातळीवरच कशाला जागतिक पातळीवर तेंडुलकर हेच नाव सर्वात प्रथम घ्यावं लागतं. याचं कारण तेंडुलकरांची नाटकं प्रेक्षकाचं हसत खेळत मनोरंजन करणारी नसतात. विनोद, नाट्य, आशय-विषय यांचा सर्वपरिचित, सरधोपट मार्ग अनुसरणारी नसतात. कधी ती विचार करायला लावतात, कधी गोंधळात पाडतात, कधी प्रक्षोभ निर्माण करतात. एकूण, नाटक म्हणजे करमणुकीच्या पुढचा एक कलाप्रकार आहे आणि कला या नात्याने नाटक काहीतरी मांडतं, असं तेंडुलकरी नाटकाचं म्हणणं असतं. अशा नाटकांमध्ये अभिनय करणं आणि त्यांचं दिग्दर्शन करणं, दोन्ही आव्हानात्मक. विजयाबाईंनी ते केलं.

ते करताना अर्थातच प्रस्थापित मराठी नाट्यजाणिवांना धक्के दिले. तेंडुलकरांबरोबर त्यांनी ‘थिएटर ऑफ द ॲब्सर्ड’ची ओळखही करून दिली. तेंडुलकरांच्या ‘श्रीमंत’ या पहिल्या नाटकाचं दिग्दर्शन केलं. त्याबरोबर पिरँदेलोची ‘खुर्च्या’ आणि तेंडुलकरांचीच ‘अजगर आणि गंधर्व’ यांसारख्या एकांकिकांचं दिग्दर्शन केलं आणि त्यांच्यात कामही केलं. (Vijaya Mehta: Living and Dead)

बौद्धिक नाटकांचा रस्ता

गिरीश कर्नाड यांचं ‘हयवदन’ मराठीत केलं. खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकाचं दिग्दर्शन करून त्यात काम केलं. खानोलकरांनी भाषांतर केलेल्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या ब्रेश्तच्या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. या नाटकाचे प्रयोग चक्क ब्रेश्तच्या कर्मभूमीत, जर्मनीत झाले. इतकं होऊनही या प्रकारच्या नाटकांची तेव्हा प्रस्थापितांकडून टर उडवली जायची. त्यांना स्थानिक मराठी प्रेक्षकांची साथ तर मिळाली नाहीच; पण या नाटकांनी मराठी रंगभूमीला अजिबात अपरिचित अशा आशयाची ओळख करून दिली. चोखंदळ प्रेक्षकांना विचार करण्याची नवी दिशा दिली. आणि वेगळा, व्यामिश्र आशय व्यक्त करण्याच्या वेगळ्या मंचीय कल्पनासुद्धा दाखवल्या. मराठी नाट्यसंवेदनेसाठी हे नवीन होतं. हे श्रेय नि:संशय विजयाबाईंचं.

या प्रकारच्या नाटकाला जसं ॲब्सर्ड, असंगत म्हणता येतं; त्याचबरोबर बुद्धीला चालना देणारं, अस्वस्थ करणारंसुद्धा म्हणता येतं. ॲब्सर्ड नाटकाचं मूळ देशी नव्हतं, हे खरं; पण बुद्धीला संबोधणारं नाटकसुद्धा इथे प्रचलित नव्हतं. ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’ अशी गंभीर आणि ‘जड’ नाटकं त्यापूर्वी झाली असली, तरी ती अपवाद. विजयाबाईंनी अशा वेगळ्या, बौद्धिक नाटकांचा लहानसा का होईना रस्ताच काढून दिला. विजयाबाईंची ‘रंगायन’ ही संस्था असे प्रयोग सातत्याने करत राहिली.

उत्तम दिग्दर्शनाचे धडे (Vijaya Mehta: Living and Dead)

या प्रकारच्या नाटकांमधून नाटक बसवताना त्याचा बुद्धीतून सर्वस्पर्शी विचार करण्याची दिग्दर्शकीय रीत विजयाबाईंनी अंगिकारली आणि पुढे व्यावसायिक नाटकांच्या बाबतीतदेखील अनुसरली. त्यांच्या अभिनयातही याच प्रकारचा वेगळेपणा होता. प्रेक्षकांची पसंती कशाला जास्त मिळेल, या विचारापेक्षा भूमिकेला काय जास्त सुसंगत ठरेल, याच्या जवळ जाणारा विचार त्यात होता. असं म्हणायला हरकत नाही की मराठी रंगभूमीवर ताकदीचे नाटककार जरी विजयाबाईंच्या अगोदरपासून होते, तसेच दिग्गज दिग्दर्शकदेखील होते; तरीही विजयाबाईंच्या दिग्दर्शनाने रंगभूमीला उत्तम दिग्दर्शनाचे धडेच दिले.

जयवंत दळवी हे मराठी रंगभूमीवरचे एक महत्त्वाचे नाटककार. त्यांची नाटकं रंजनावर भर देण्यापेक्षा विशिष्ट समस्येचे पैलू शोधणारी होती. त्यांत वैविध्य होतं. ‘बॅरिस्टर’चा काळ शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचा होता. ‘पुरुष’, ‘संध्याछाया’, ‘महासागर’ ही नाटकं वेगवेगळे नातेसंबंध मांडणारी होती. त्याच दळवींच्या ‘महानंदा’ या कादंबरीवरून शं. ना. नवरे यांनी लिहिलेलं हळवं, रोमँटिक नाटक ‘गुंतता हृदय हे’ बाईंकडे गेलं नाही! अनिल बर्वेंचं ‘हमीदाबाईची कोठी’ मात्र गेलं. या बहुतेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिकासुद्धा केल्या. महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला तर मराठी रंगभूमीचा मानबिंदू म्हणावं लागेल. या सगळ्या नाटकांमधून विजयाबाईंनी नाट्यदिग्दर्शनाचे एकेक आदर्श उभे केले. ही सगळी नाटकं एका बाजूने व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाली आणि तरीही ती अजिबात प्रेक्षकशरण नव्हती. दोन घटका करमणूक करणारी नव्हती. मराठी प्रेक्षकाची अभिरूची उंचावण्याचं काम या नाटकांनी, म्हणजेच विजयाबाईंनी नि:संशय केलं. (Vijaya Mehta: Living and Dead)

रंगायन आणि अविष्कार

रंगायन ही विजयाबाईंनी उभी केलेली प्रायोगिक नाटकाला वाहिलेली संस्था. अरविंद देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या तेंडुलकर लिखित ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या अस्सल प्रायोगिक नाटकाला व्यावसायिक यश मिळू लागलं. पण याच मुद्यावर विजयाबाईंचे अरविंद देशपांडे आणि इतर यांच्याशी मतभेद झाले आणि ती मंडळी रंगायनपासून वेगळी झाली. त्यांनी ‘आविष्कार’ ही संस्था स्थापन केली आणि ‘शांतता..’चे प्रयोग होत राहिले. त्यानंतर रंगायनच तितकं कृतिशील राहिलं नाही आणि विजयाबाई व्यावसायिक रंगभूमीकडे वळल्या. आविष्कारतर्फे मात्र तेंडुलकरांच्या ‘तेथे पाहिजे जातीचे’ सारख्या नाटकांमधून प्रायोगिक रंगभूमी चैतन्यशील राहिली. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ अशा नाटकांमधून तेंडुलकर नाट्यजाणिवांची क्षितिजं विस्तारत राहिले.

त्यानंतर काही काळात विजयाबाईंचा संबंध मराठी प्रायोगिक रंगभूमीबरोबर व्यावसायिक रंगभूमीशीसुद्धा तुटला. त्यांनी जणू एकूण मराठी नाट्यविश्वाशीच फारकत घेतली. एनसीपीएच्या प्रमुखपदाची त्यांची कारकीर्द मराठी नाट्यविश्वासाठी काहीच न देणारी ठरली. (Vijaya Mehta: Living and Dead)

उत्तर काळात मराठीकडे पाठ

देशी परंपरेला पूर्ण अनोळखी अशा नाट्यजाणिवांपासून सुरू झालेला विजयाबाईंचा प्रवास प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, एनसीपीए अशा वाटेने जाताना मराठी रंगभूमीपासून दूर गेला. तसं असूनही मराठी रंगभूमीला त्यांचा प्रभाव विविध मार्गांमधून जाणवत राहिला. त्यांच्या तालमीत तयार झालेले दिग्दर्शक, अभिनेते मोठे झाले आणि त्यांनी विजयाबाईंचं ऋण अजिबात नाकारलं नाही. त्यामुळे मराठी नाट्यविश्वाने सतत त्यांच्याकडून अपेक्षा बाळगल्या, ज्या त्यांनी त्यांच्या उत्तर कारकीर्दीत पुऱ्या केल्या नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले, असंही झालं नाही. त्यांनी जणू मराठी रंगभूमीकडे पाठ फिरवली.

बऱ्याच वर्षांनी त्यांनी दिग्दर्शनासंबंधी व्याख्यानमालिका केली तेव्हा मराठी रंगभूमीवरील नामवंतांनी पुन्हा एकदा विद्यार्थी बनत तिथे हजेरी लावली. पण त्या व्याख्यानांमधून कोणतीच नवीन दृष्टी प्रतीत झाली नाही. तरीही ‘विजयाबाई’ या नावाचं ग्लॅमर इतकं पॉवरफुल होतं की शेवटपर्यंत मराठी नाट्यविश्वाला विजयाबाईंचा विसर पडला नाही. त्यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

उत्तर काळात त्यांनी मराठी विश्वाला का नाकारलं? विजयाबाईंच्या घसघशीत योगदानाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न टाळता येत नाही.

परिपूर्णतेचा ध्यास

नाटक ही एक सांघिक कला आहे. नाटककार, दिग्दर्शक, नट यांच्याबरोबर प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत यांचं योगदानसुद्धा नाटक या प्रयोगकलेसाठी महत्त्वाचं असतं. यात नाटककाराला नाटक लिहून मोकळं होण्याची मुभा असते, जी दिग्दर्शकाला नसते. हाती आलेल्या संहितेवरून प्रयोग उभा करणे ही प्रक्रिया दिग्दर्शक इतर सहकाऱ्यांच्या सहाय्याने पूर्ण करत असतो. याचा एक अर्थ असाही होतो की अनेक प्रतिभावंत आणि सृजनशील कलावंतांकडून सुसंगत, संघटित कृती काढून घेणे, हे अंगभूत कौशल्य दिग्दर्शकाकडे असावं लागतं. विजयाबाईंची लखलखीत कारकीर्द पाहता त्यांच्या ठायी हे कौशल्य होतं, असं निश्चित म्हणता येतं. नवीन कल्पना, नवीन तंत्र मांडून त्यातून सहकाऱ्यांना आणि प्रेक्षकांसकट इतर संबंधितांनासुद्धा विस्तारित क्षितिजांची जाणीव देण्यात त्या यशस्वी झाल्या.

पुढच्या काळात तपशिलांकडे बारीक लक्ष देत परिपूर्णतेचा ध्यास बाळगत निर्माण केलेल्या नाट्यप्रयोगांमधून त्यांनी कलावंतांमधील कलागुणांना दिशा दिली, आकार दिला, हेदेखील मान्य करावं लागतं.

‘हयवदन’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ अशा प्रयोगांमधून जरी त्यांनी लोककलेला स्पर्श केला असला तरी रंगभूमीवरील त्यांचा वावर एका अर्थी बौद्धिक होता, एलिटिस्ट होता, असं म्हणावं लागतं. मग असं झालं असेल का, की मराठी रंगभूमीच्या प्रेक्षकाची अभिरुची घसरते आहे, अशी खरी खोटी एलिटिस्ट जाणीव त्यांना होऊ लागली आणि म्हणून त्या दूर गेल्या? (Vijaya Mehta: Living and Dead)

त्यांच्यातल्या सृजनशील कलावंताला असं वाटू लागलं का की केलं एवढं खूप झालं, आता नवीन नाही करण्यासारखं उरलं नाही? की त्यांच्यातल्या दिग्दर्शकाला थकवा आला? की त्यांना इथल्या रंगकर्मींकडून कटू अनुभव आले?

हे प्रश्न आगाऊ, थिल्लर वाटू शकतील, पण विजयाबाईंसारख्या महान कर्तृत्वाच्या कलावंताच्या प्रवासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तर करायला हवा. आणि त्यासाठी कुठून तरी सुरुवात व्हायला हवी.

थोडंसं अवांतर

आधुनिक मराठी रंगभूमीच्या संदर्भात काहीही विधान करताना विजया मेहता आणि सत्यदेव दुबे या दोन नावांना टाळणं अशक्य आहे. दुबे शेवटपर्यंत प्रायोगिकतेशी जोडलेले राहिले. विजयाबाईंची मांडणी आखीव रेखीव, तर दुबे नवनवीन आशय शोधण्याच्या मागे. विजयाबाईंचं व्यक्तिमत्व संयत, सर्व संकेतांचं पालन करणारं. दुबे हा मनुष्य तऱ्हेवाईक, उतावळा. विजयाबाई मराठी रंगभूमी सोडून गेल्या आणि एलिटिस्ट काम करत राहिल्या. दुबेंकडून नंतरच्या काळात आशयघन असं काही निर्माण झालं नाही परंतु त्यांनी मराठी रंगभूमीची साथ शेवटपर्यंत सोडली नाही.

नीना कुळकर्णी (हमीदाबाईची कोठी आणि एजुकेटिंग रिटा), भक्ती बर्वे (बाई खुळाबाई आणि आधेअधुरे) यांना विजयाबाई आणि सत्यदेव दुबे, या दोघांकडे काम करायला मिळालं. आणखीही असतील. भक्ती आता नाही. नीना कुळकर्णी यांनी स्वानुभवाच्या आधारे या दोघांच्या शैलीविषयी खोलात जाऊन लिहायला हवं.

विजयाबाईंविषयी लिहिताना ‘पेस्तनजी’, ‘रावसाहेब’ हे त्यांनी केलेले चित्रपट, त्यांची एनसीपीएमधली कारकीर्द यांचीही चर्चा करता येईल. जाणकारांनी अवश्य करावी.

Related posts

राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार : आशिष शेलार

चलो इक बार फिर से…

सोमरस म्हणजे नेमके काय ?