मुंबई : विशेष प्रतिनिधी : खोटी आश्वासने आणि वारेमाप घोषणा करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. निष्क्रिय सरकारमुळे जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ५४ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (२१मे) केला. (Danave slams Govt)
बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत ते म्हणाले, ‘मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण १३ हजार ८१९ कोटींचे वाटप अद्याप झालेले नाही. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उचलणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. (Danave slams Govt)
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही करून ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यावरही परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.’
केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला २०२३- २४ मध्ये ३६ हजार कोटींवर होता, तो २०२४ -२५ मध्ये ३१, ८३० कोटी रुपयांवर घसरला असून डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरी मिळते का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूरहून रूग्णवाहिका आणावी लागली, यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण एमआयडीसींच्या सुरक्षा व उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले. (Danave slams Govt)
जनतेचा विरोध असताना ही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुत्तेदारांचे साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजशिष्टाचारात निष्काळजीपणा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढले आहे. या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही, चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ, असा इशारा दानवे यांनी दिला.