Dada Bhuse : ईडी कारवाईतील अनिलकुमार पवार मंत्री भुसेंचे नातेवाईक; संजय राऊतांचा आरोप

Dada Bhuse

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी मंगळवारी धाडी टाकल्या. त्यांची १८ तास चौकशी करण्यात आली. पवार यांच्या निवासस्थानावर ईडीची धाड पडल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच अनिलकुमार पवार हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यावर दादा भुसेंनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनूकसानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. (Dada Bhuse)

वसई विरारमधील डम्पिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या ४१ बेकायदा इमारतींप्रकरणी अनिलकुमार पवार यांच्यावर हा छापा पडला आहे. अनिलकुमार पवार यांची सोमवारी वसई विरार आयुक्त पदावरुन बदली झाली, त्यांना निरोपसमारंभ देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी ही कारवाई झाली आहे. या प्रकरणात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप होत आहेत. (Dada Bhuse)

शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये पत्रकारांसोबत बोलताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राऊत म्हणाले की, अनिलकुमार पवार हे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत. ईडीचे धागेदोरे आता दादा भुसे यांच्यापर्यंत जाऊ शकतात. अनिलकुमार पवार यांना आयएएस दर्जा मिळण्यापूर्वीच दादा भुसे यांच्या सांगण्यावरुन तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तपदी बढती दिली होती. अनिल पवार हे यापूर्वी ठाण्यात अपर जिल्हाधिकारी पदावर होते. तिथून त्यांची नाशिकला बदली झाली. तिथून ते पुन्हा ठाण्यात मुद्रांक शुल्क विभागात आले. त्यानंतर १३ जानेवारी  २०२२ रोजी त्यांची थेट वसई विरार महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्तपदी बदली झाल्यानंतर २९जून २०२३ रोजी ते आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले, असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. (Dada Bhuse)

त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी केलेले सर्व आरोप नाकारले आहेत. मंत्री दादा भुसे म्हणाले की, अनिल पवार माझे नातेवाईक आहेत हे मी नाकारत नाही. माझे अनेक नातेवाईक आहेत. त्यांनी काही गैरकारभार केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा करा. अनिलकुमार पवार माझे नातेवाईक आहेत, पण त्यांच्या कामाशी माझा संबंध नाही. त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातून तथ्य बाहेर येईल. मात्र ते माझे नातेवाईक आहेत म्हणून माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे. संजय राऊत यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, राज्याची माफी मागितली नाही तर या प्रकरणी त्यांच्यावर दावा दाखल करणार, असे दादा भुसे म्हणाले. (Dada Bhuse)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर