Congress slams NCP: अजित पवारांची राष्ट्रवादी गुंडांची टोळी

Congress slams NCP

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा सहभाग आहे. ही गुंडांची टोळी तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लुटारूच्या टोळीचे मुखिया आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी (२२ मे) केली. (Congress slams NCP)

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पोर्श कार ड्रंक ॲण्ड  ड्राइव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गँग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. (Congress slams NCP)

आमदार अर्जुन खोतकर यांची चौकशी करा

ते म्हणाले,‘राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे आहे. या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून केवळ लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीएकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. तसेच शिंदेंच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी आणि इन्कमटॅक्सकडून चौकशी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. (Congress slams NCP)

शेतकऱ्यांची परवड
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. लाखो हेक्टवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे, पण सरकारकडून मदत देणे दूरच, साधे पंचनामेही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.


Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर