India U-19 team : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा युवा संघ जाहीर

India U-19 team

मुंबई : भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी गुरुवारी संघनिवड करण्यात आली. १७ वर्षीय आयुष म्हात्रेकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून आयपीएलमध्ये छाप पाडणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान मिळाले. (India U-19 team)

जून-जुलै महिन्यात रंगणाऱ्या या दौऱ्यामध्ये एक ५० षटकांचा सराव सामना, पाच सामन्यांची वन-डे मालिका आणि दोन बहुदिवसीय सामने खेळणार आहे. या संघामध्ये १६ जणांचा समावेश असून मुंबईचा यष्टिरक्षक अभिग्यान कुंडू या संघाचा उपकर्णधार आहे. याअगोदर १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरवंश पंघलिया, युधाजित गुहा, महंमद एनान आणि अनमोलजित सिंग हे खेळाडू संघात आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीस झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप रंगणार आहेत. या वर्ल्ड कपसाठी वयोमर्यादेनुसार पात्र ठरू शकणाऱ्या खेळाडूंनाच इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. (India U-19 team)

इंग्लंड दौऱ्यांतर्गत २४ जून रोजी लॉघबरो युनिव्हर्सिटीच्या मैदानावर या संघाचा सराव सामना होईल. त्यानंतर २७ जून ते ७ जुलैदरम्यान होव्ह, नॉर्दम्प्टन आणि वॉर्केस्टर येथे वन-डे मालिका खेळवली जाईल. १५ जुलैपासून बेकनहॅम येथे पहिला, तर २० जुलैपासून चेम्सफर्ड येथे दुसरा बहुदिवसीय सामना रंगेल. सध्या सुरू असणाऱ्या आयपीएलच्या अठराव्या मोसमात आयुष चेन्नई सुपरकिंग्जकडून, तर वैभव राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. हे दोन्ही संघ या मोसमात अपयशी ठरले असले, तरी आयुष आणि वैभवने या मोसमात प्रभावी कामगिरी केली. आयुषने आतापर्यंत ६ सामन्यांत एका अर्धशतकासह २०६ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइकरेट १८७.२७ इतका आहे. वैभवने ७ सामन्यांत प्रत्येकी एका शतक व अर्धशतकासह २५२ धावा फटकावल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट २०६.५५ इतका आहे. (India U-19 team)

संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह छावडा, राहुल कुमार, अभिग्यान कुंडू (उपकर्णधार), हरवंश पंघलिया, आर. एस. अंबरिश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधाजित गुहा, प्रणव राघवेंद्र, महंमद एनान, आदित्य राणा, अनमोलजित सिंग.

हेही वाचा :
आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर