मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. (Congress slams CM)
राहुल गांधी यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटनंतर सत्ताधारी आणि विरोधकांत पुन्हा आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत प्रतिक्रीया देताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली आहे. काही बूथवर तर २०-५० टक्के मतदान वाढले. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे, पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून ही मतचोरीच आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. (Congress slams CM)
लोकसभेला दारूण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला, मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल ८ टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला. तसेच ४५ दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे मतचोरी लपवण्याचा प्रकार असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. (Congress slams CM)
हे तर राहुल गांधींच्या नैराश्याचे प्रदर्शन : फडणवीस
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या राहुल गांधी यांनी तर्कहीन दावे करून पराभवाचे खापर मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर फोडण्याआधी याच वाढीव टक्केवारीमुळे विजयी झालेल्या काँग्रेस उमेदवारांकडून वास्तव जाणून घेतले असते तर हवेत तीर मारण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला.
विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वाढीव टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट खुलासा झालेला असताना राहुल यांनी पुन्हा एकदा पराभवाच्या नैराश्यातून तीच संशयाची राळ उडवली आहे, पण मालाड मतदारसंघात ११ टक्के (३८६२५) मतदार वाढले. तेथे विजयी झालेले अस्लम शेख, पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के (२७०६५) मतदार वाढले, तेथे विजयी झालेले विकास ठाकरे, उत्तर नागपूरमध्ये ७ टक्के वाढ झाली, तेथे काँग्रेसचेच नितीन राऊत विजयी झाले, तर पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात १० टक्के (५०९११) मतदार वाढले व तेथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. मुंब्रा मतदारसंघात ९ टक्के मतदार वाढले, तेथेही शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले. या निकालाची स्वपक्षीयांकडून माहिती घेतली असती तर अशी निरर्थक निशाणेबाजी करण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आली नसती, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.
हेही वाचा :
निवडणुका कायद्यानुसार : राहुल गांधी यांना उत्तर
‘शक्तिपीठ’ला मंजुरी; शेतकऱ्यांचा विरोध बेदखल