काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

Congress free or BJP free

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहेहे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हेतर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोतअशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक व्यवहार राहिला आहे. आम्ही संविधानाचे पाईक आहोतम्हणायचे नि सर्वधर्मसमभावाचे मूल्य पायदळी तुडवत मंदिरात डमरू आणि ढोल वाजवायचेभारत ही लोकशाहीची जननी म्हणायचे नि लोकशाहीचा प्राण असलेल्या विरोधी पक्षांना संपवायचे धोरण खुलेआम अवलंबायचेअसे परस्परविसंगत चित्र आता नित्याचेच बनले आहे. तथाकथित आर्थिक विकासाला अशा या परस्परविसंगत वर्तनाची जोड हेच खरे तर आजचे चिंताजनक वास्तव आहे.

 डॉ. विवेक कोरडे

 ज्यांचा वर्तमान काळ स्पृहणीय नसतो आणि भूतकाळात ज्यांनी कोणतेही कर्तृत्व गाजवलेले नसते, त्यांना इतिहासात रमणे भाग असते. मग अशी मंडळी इतिहासाचे प्रत्येक पान जणू त्यांचेच आहे, त्यांच्यासाठीच आहे असे समजून इतिहासाचा वापर वा गैरवापर करत असतात. बऱ्याचदा आपण नेमके काय करतो आहोत, याचे भानही अशा मंडळींना नसते. या इतिहासाचे आम्हीच वारसदार हा टेंभा मिरवणे एवढेच या मंडळींचे कर्तृत्व असते.

असाच एक ऐतिहासिक कार्यक्रम काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सोमनाथमध्ये पार पडला. सोमनाथ मंदिरावर झालेल्या गजनीच्या महंमदाच्या पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे झाली, त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चमकण्याची संधी सोडतील, तर ते विश्वगुरू कसले? त्यात हे विश्वगुरू पडले नॉन बायोलॉजिकल. म्हणून अशा कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अनिवार्यच. त्यानिमित्ताने काढलेल्या यात्रेत विश्वगुरूंनी एखाद्या मदाऱ्यासारखा डमरू वाजवला. त्याने समाधान झाले नाही म्हणून ढोलही पिटला. सर्व नाटक म्हणा वा नाट्य अगदी ठरल्याप्रमाणे पार पडले. या नाटकाचे नाव स्वाभिमान पर्व असे होते. अंतस्थ हेतू परधर्मद्वेषाला खतपाणी घालणे हा होता. मुळात, एखाद्या मंदिरावर झालेल्या हल्ल्याला एक हजार वर्षे होऊनही मंदिर टिकून राहिले, म्हणून स्वाभिमान पर्व साजरे करणे, या सारखा मोठा राजकीय विनोद सापडणे कठीण आहे. कारण असे करून न्यूनगंडाचेच दर्शन घडले. त्या अर्थाने न्यूनगंड पर्वच साजरे झाले. अर्थात, ‘मोदी है तो मुमकिन है.’ (Congress free or BJP free)

गाफीलपणाचा चिंताजनक वारसा

इतिहासातल्या घटनांपासून वर्तमानातले धडे शिकायचे असतात. त्या काळाला अनुसरून सोरटी सोमनाथ मंदिरावर साधन संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने अनेक हल्ले झाले. अकराव्या शतकापासून सुरू झालेले हल्ले त्यानंतर किमान पाच शतके सुरूच राहिले. सोमनाथासारखे पवित्र मंदिर पुन्हा पुन्हा लुटले जात राहिले. सोमनाथाचे मंदिर सीमेपासून ३०० मैल आत आहे. इतके अंतर कापून शत्रू चालून आला आणि लूट करून परत गेला. ही गोष्ट एक दोन वेळा समजू शकते. परंतु ही गोष्ट अनेकदा आणि सतत चार-पाच शतके घडत असेल, तर त्याचा अर्थ वेगळा होतो. सोमनाथ मंदिर वारंवार लुटले जाण्याचा सरळ अर्थ तत्कालीन राजांनी आणि समाजाने या आक्रमणांचा मुकाबला संघटितपणे केला नाही, असा होतो. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणा गाफील असेल तर देशाचे सर्वोच्च मानबिंदू कधीही उद्ध्वस्त होऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो.

सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याला हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही आपली संरक्षण यंत्रणा गाफील आहे. याच गाफीलपणातून देशाचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या संसदेवर आक्रमण होते. याच गाफीलपणातून मुंबई, पुलवामा, पठाणकोटसारखे हल्ले होतात. हा संदेश जनतेला देण्याऐवजी विश्वगुरूंनी मेकअप करून डमरू वाजवणे आणि ढोल बडवणे पसंत केले. (Congress free or BJP free)

 इतिहासाशी प्रतारणा

अर्थात ते त्यांच्या स्वभावधर्माला धरूनच झाले. त्या डमरूच्या प्रभावामुळे की काय महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जवळपास निम्म्या जागा प्राप्त झाल्या. आजवर महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार होते, आता ते ट्रिपल इंजिनचे झाले आहे. या तीन इंजिनांची दिशा नागपूर, पुणे आणि ठाणे याकडे एकाच वेळी धावण्याची नसेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. तसे झाल्यास ‘विकास नको पण इंजिन आवर’ असे म्हणायची पाळी आपल्यावर येईल.

डमरूवादनाने मिळालेल्या या प्रचंड विजयाचा उन्माद भाजपला चढला नाही, तरच नवल करायचे. खरंतर या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या विजयासाठी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग, अर्थनीतीचा अतोनात वापर, धार्मिक आणि भाषिक ध्रुवीकरण आणि निवडणूक आयोगाशी असलेली भाजपची युती या गोष्टी कामी आल्या आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून भाजपच्या उन्मादी नेत्यांनी उन्मादी वक्तव्ये केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आता विश्वगुरू वाटचाल करीत आहेत, असे म्हटले गेले. असे बेताल व बिनबुडाचे वक्तव्य भाजप नेतेच करू शकतात. ज्यांना शिवाजी महाराज खरोखर माहीत आहेत, त्यांना या वक्तव्याने संताप आल्याखेरीज राहणार नाही. ज्या काळात जगाला ‘सेक्युलर’ हा शब्दही माहीत नव्हता, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात हिंदू-मुस्लिम इत्यादी सर्व धर्मांना समान न्यायाची हमी होती. म्हणूनच महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख दौलतखान असू शकतो. त्यांचे वकील काझी हैदर असतात आणि अंगरक्षकांमध्ये मदारी मेहतर या मुस्लिम युवकाचा समावेश असतो. महाराजांनी कधीही कोणतीही मशीद किंवा दर्गा पाडला नाही किंवा कुणी विशिष्ट धर्माचे आहे, म्हणून त्याचा छळही केला नाही. त्याचमुळे विश्वगुरू महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जात आहेत, असे म्हणणे इतिहासाची प्रतारणा करणे होय. अर्थात इतिहासाची प्रतारणा ही भाजपाच्या अंगोपांगात पूर्णपणे मुरलेली गोष्ट आहे. (Congress free or BJP free)

 सुपातले शिंदे, जात्यात

दुसऱ्या एका प्रवक्त्यांनी आता आम्ही आधी सर्व प्रादेशिक पक्ष समाप्त करू आणि मग ‘काँग्रेसमुक्त’ भारत करू अशी वल्गना केली. प्रादेशिक पक्षांना समाप्त करणे यात भाजप तरबेज आहेच. त्यामुळे याची नव्याने घोषणा करण्याची गरज नाही. भस्मासूर ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याचे भस्म होत असे, म्हणतात. भाजप ज्या ज्या प्रादेशिक पक्षांबरोबर युती करतो, त्यांना हळूहळू कमजोर करून नष्ट करण्याची उमेद बाळगून असतो. असे प्रयोग भाजपने अनेक राज्यात यशस्वीपणे केले आहेत. ज्या शिडीने वर चढायचे तिलाच लाथ मारायची ही भाजपची नीती आहे. या नीतीचा प्रसाद अनेकांनी चाखला आहे. बहुतेक आता हा प्रसाद चाखण्याची पाळी शिंदे यांच्या शिवसेनेची आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत निसटते का होईना, बहुमत महायुतीला मिळाले. तरीही शिंदेंजींनी आपल्या २९ नगरसेवकांना हॉटेल अरेस्ट ठेवले होते. या निवडून आलेल्या नगरसेवकांना आम्ही प्रशिक्षण देण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवले आहे असे शिवसेना शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणतो. असेच प्रशिक्षण तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोवा टू मुंबई अशा हॉटेल यात्रेने दिले होते, हे अख्खा महाराष्ट्र जाणतो.

शिंदे गटाला नेमकी भीती कशाची वाटते, हे देखील समजून घ्यायला हवे. मूळ शिवसेनेविरोधात बंड करून मुंबईतले अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपची पायरी चढले. यातील ९० टक्के नगरसेवकांना लोकांनी पराभूत करून घरी बसवले आहे. शिंदेंचे जे २९ नगरसेवक निवडून आलेत, त्यांनाही जनमनात असलेल्या संतापाची झळ जाणवलेली आहे. अशा परिस्थितीत हे नगरसेवक कधीही आपली भूमिका बदलू शकतात. भूमिका बदलण्याचा धडा त्यांना शिंदेजींनी शिकवला आहे.

शिंदेजी नेहमीच आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीतून पुढे चाललो आहोत, असे म्हणतात. मुंबईत भाजपचा महापौर झाला पाहिजे ही बाळासाहेबांची शिकवण होती, असे ते कधी म्हणतात याची वाट पाहू या.

खरंतर प्रादेशिक पक्ष समाप्त करण्याची आकांक्षा बाळगणे म्हणजे भारतीय संविधानाला विरोध करणे आहे. संविधानाने भारत हे एक संघराज्य घोषित केले आहे व या संघराज्यात प्रत्येक राज्याला त्याची भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रादेशिक पक्ष हे त्याच अस्मिता आणि आकांक्षांचे प्रतीक आहेत. ते नष्ट करणे म्हणजेच भारतीय संविधानाशी प्रतारणा करणे होय. अर्थात भाजपला संविधानाशी कोणतेही घेणेदेणे नाही. ‘अब की बार चारसो पार’ ही घोषणा संविधान बदलण्यासाठी देण्यात आली होती. अर्थात ज्या क्षणी भारताचे संघराज्य स्वरूप नष्ट होईल त्याक्षणी भारताच्या विघटनाला सुरुवात होईल. म्हणूनच अशा प्रकारची वक्तव्ये ही देशाच्या ऐक्याला घातक आहेत. (Congress free or BJP free)

आत्मघातकी वल्गना

.काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची सर्वात आवडती घोषणा आहे. कारण भाजपची संस्कृती संघाच्या एकचालकानुवर्तित्व या संकल्पनेवर आधारलेली आहे. ही संकल्पना पूर्णपणे लोकशाही विरोधी आहे. प्रतिपक्षाकडे विरोधक म्हणून न पाहता भाजप शत्रू म्हणून पाहतो. अर्थात तो त्यांच्या संघ संस्कारांचा भाग आहे. परंतु अशा प्रकारची आकांक्षा बाळगणे हे देखील संविधानविरोधी आहे. भाजपला काँग्रेसमुक्त भारत हिंदुराष्ट्र निर्माण करण्यासाठी हवा आहे. हिंदुराष्ट्र निर्माणात काँग्रेस पक्ष हा एक प्रमुख अडसर आहे. कारण काँग्रेसची स्थापना सर्वधर्मीय व्यक्तींनी एकत्र येऊन केली आहे. काँग्रेसच्या सर्वसमावेशक स्वातंत्र्य आंदोलनामुळेच भारत राष्ट्र निर्माण झाले आणि त्याने सर्वांना समान नागरिकत्व देणारे संविधान निर्माण केले. हे संविधान आणि काँग्रेस पक्ष नष्ट केला की हिंदुराष्ट्राचा मार्ग निर्वेध होईल, असा भाजपचा समज आहे. आणि असा समज जोपासण्याचा त्यांचा हक्क आपल्याला नाकारता येणार नाही.

आचार्य विनोबा भावे यांच्या ‘जीवनाचा उलगडा’ या पुस्तकात ३५ वे प्रकरण परशुरामाचे आहे. विनोबाजी लिहितात, हा एक विलक्षण प्रयोगी सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी होऊन गेला. कोकणस्थांचा हा मूळ पुरुष. आईकडून क्षत्रिय, बापाकडून ब्राह्मण. बापाच्या आज्ञेवरून परशुरामाने आईचे डोके उडवले. हे कितपत योग्य म्हणून कोणीही खुशाल विचारील. पण याच्या श्रद्धेला साशंकता माहीतच नव्हती. निष्ठेने प्रयोग करायचा आणि अनुभवाने शहाणे व्हायचे, असे याचे सूत्र असे.

परशुरामाने क्षत्रियांचा घोर प्रतिकार आरंभिला. सापडले तितके सारे क्षत्रिय त्यांनी सरसहा मारून टाकले. ‘पृथ्वी निःशस्त्रीय करायची’ हे त्याने आपले बिरूद बनवले. यासाठी तो स्वतः आपल्याजवळ नेहमी कुऱ्हाड बाळगू लागला आणि कुऱ्हाडीने एका तरी क्षत्रियाचे मुंडके रोज उडविले पाहिजे अशी उपासना त्याने आपल्या ब्राह्मण अनुयायांत रूढ केली. पृथ्वी निःशस्त्रीय करण्याचा प्रयोग त्याने एकवीस वेळा केला. पण जुने क्षत्रिय बुद्ध्या मारावयाचे आणि अबुद्धीने नवीन निर्मावयाचे या प्रक्रियेने फलित काय निघणार? शेवटी रामचंद्राने याच्या डोळ्यात अंजन घातले, तेव्हापासून त्याची दृष्टी निवळली.

परशुराम पृथ्वी निःशस्त्रीय करण्याच्या प्रयत्नात स्वतःच क्षत्रिय झाला. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या भानगडीत काँग्रेसच्या लोकांना स्वतःच्या पक्षात घेऊन भाजप स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे. विश्वगुरुंची ताकद आणि क्षमता उघड पाडणारी ही अवस्था आहे.

………….

(डॉ. विवेक कोरडे यांची ‘जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ’, ‘गांधीची दुसरी हत्या’, ‘शहीद भगतसिंग’, ‘वैचारिक बंदुकांचे शेत’, ‘गांधीहत्येचे राजकारण’, ‘आरएसएस आणि नथुराम गोडसे’, ‘भगतसिंग, गांधी आणि सावरकर : अपप्रचारामागचे वास्तव’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या