काठमांडू : लोकप्रिय अशा २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी (८ सप्टेबर) हजारो नेपाळी तरुण राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर उतरले. निदर्शकांनी प्रतिबंधित क्षेत्राचे उल्लंघन करून संसदेच्या परिसरात घुसल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली, ज्यामुळे पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा तसेच अश्रूधुराचा मारा केला. सुरक्षा दलांनी धडक कारवाई केली. नेपाळमधील इतर प्रमुख शहरांमध्ये निदर्शने पसरल्याने स्थानिक प्रशासनाने काठमांडूच्या अनेक भागात कर्फ्यू जारी केला आहे. (Clash erupt in Nepal)
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
सोमवारी नवीन बानेश्वरमध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान १६ निदर्शकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४२ जण जखमी झाले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही, तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मरण पावला, असे कार्यकारी संचालक मोहन चंद्र रेग्मी यांनी सांगितले.(Clash erupt in Nepal)
जनरेशन झेडच्या नेतृत्वाखालील ही निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्लॅकआउट आणि देशातील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून निदर्शक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हजारोंच्या संख्येने तरूण काठमांडूमधील मैतीघर येथे जमले. अलिकडच्या काळात, #NepoKid आणि #NepoBabies सारखे हॅशटॅग ऑनलाइन ट्रेंड करत आहेत, सरकारने नोंदणी नसलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लॉक केल्यानंतर ते लोकप्रिय झाले आहेत.
काठमांडू जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या मते, हामी नेपाळने रॅली आयोजित केली होती. त्याला पूर्वपरवानगी देण्यात आली होती.(Clash erupt in Nepal)
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूमध्ये मिरवणूक काढताना निदर्शकांनी ‘‘सोशल मीडिया नको तर भ्रष्टाचार बंद करा,’’ ‘‘सोशल मीडियावर बंदी हटवा’’ आणि ‘‘भ्रष्टाचाराविरुद्ध तरुणाई रस्त्यावर’’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेतले होते.
निदर्शनाच्या अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. संसदीय संकुलाकडे कूच करण्यापूर्वी मोठ्या संख्येने लोक राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीत गाताना दिसून आले.
निदर्शकांनी या बंदीचे वर्णन ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार आणि कनेक्टिव्हिटीवर थेट हल्ला’ असे केले आणि म्हटले की यामुळे संप्रेषण, बातम्या, मनोरंजन आणि लहान व्यवसायांसाठी महत्त्वाची साधने बंद झाली आहेत.
अनेक सहभागींनी सांगितले की निदर्शने ब्लॅकआउटच्या पलीकडे गेली.
‘‘आम्हाला सोशल मीडियावरील बंदीमुळे उत्तेजन मिळाले, परंतु आम्ही येथे जमण्याचे ते एकमेव कारण नाही. आम्ही नेपाळमध्ये संस्थात्मक झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध निषेध करत आहोत,’’ असा संताप २४ वर्षीय विद्यार्थिनी युजन राजभंडारी हिने व्यक्त केला.
या निदर्शनात सहभागी झालेली आणखी एक विद्यार्थिनी इक्षमा तुमरोक म्हणाली की, सरकारचे हे पाऊल हुकूमशाही वृत्ती दर्शवते. ‘‘आम्हाला बदल हवा आहे. इतरांनी हे सहन केले आहे, परंतु आमच्या पिढीने ही हुकूमशाही संपवावी लागेल,’’ असे तिने एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने सांगितले.