मुख्यमंत्री निवड, शपथविधी लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्यामुळे अमित शाह यांच्या सूचनेनुसार होणारी ही बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता एक डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात दोन पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजप या प्रकरणी मराठा चेहऱ्यावरही विचार करू शकते. या बैठकीनंतर महायुतीची बैठक बोलावण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरही चर्चा झाली. या बैठकीअगोदर शिंदे यांनी शाह यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. सूत्रांच्या मते, शाह यांच्यासोबतच्या बैठकीत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारून केंद्रात मंत्रिपद स्वीकारले, तर शिवसेनेच्या अन्य एखाद्या नेत्याला राज्याचे उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांनी खातेवाटपाची यादी शाह यांना सुपूर्द केली आहे. आता शिंदे यांनी भाजपला या यादीवर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळे ते अचानक गावी गेले.

दरम्यान, दिल्लीत शाह यांच्यासोबत अडीच तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्यानंतर काही शहरांत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली. यातच आता महायुतीची मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. महायुतीच्या बैठकीत नव्या सरकारचा शपथविधी मुहूर्त आणि खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती होती. दिल्लीत काल रात्री पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहाव लागेल. महायुतीची बैठक रद्द झाल्याने महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा पेच आणखी वाढला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकेच नाही तर शिवसेना आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

शिंदे आणि अजित पवार यांनी काल रात्री शाह यांच्याकडे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर विचार करून शाह हे या दोन्ही नेत्यांना फोन करणार होते. त्या फोननंतर राज्यातील तीन नेते एकत्र बसून निर्णय घेणार होते; मात्र शाह यांचा फोन न आल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जाते. महायुतीची बैठक होण्याच्या आधी शाह यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले होते. शाह आणि शिंदे हे दोघेच फक्त या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर शाह यांनी जे. पी. नड्डा यांना बोलावले. शाह, शिंदे आणि नड्डा अशी एक दुसरी बैठक त्यानंतर झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास या तिघांची बैठक सुरू होती. त्यानंतर फडणवीस आणि पवार यांना फोन करून बैठकीसाठी येण्याचा निरोप देण्यात आला होता; मात्र आधी झालेल्या बैठकीत शाह आणि शिंदे यांच्यात कोणती चर्चा झाली ही माहिती गुलदस्त्यात आहे.

राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर पाच डिसेंबर रोजी पार पडेल. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी येत्या दोन दिवसात अनेक आमदार, नेते मुंबईत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या मंत्रिपदासाठी महायुतीमधील अनेकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. मुख्यमंत्रिपद सोडून इतर मंत्रिपदे मिळावी, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोणाला कुठल्या मंत्रिपदाची अपेक्षा?

भाजप : गृह, ग्रामविकास, महसूल, सामान्य प्रशासन, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम

राष्ट्रवादी काँग्रेस : अर्थ, महिला व बालकल्याण, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास

शिवसेना : गृह, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, नगरविकास, आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ