नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, मात्र ती कधी करणार आणि तिची कालमर्यादा किती असणार ते स्पष्ट करा, असे आवाहन काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी (३० एप्रिल) केले. (Caste census)
केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय सखोल सामाजिक सुधारणांकडे जाणारा ‘‘पहिला टप्पा’’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु जनगणना पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे आम्हाला माहित असणे आवश्यक आहे. आम्ही सरकारवर दबाव आणू शकतो हे या निर्णयाने दाखवून दिले आहे.’’
सरकारला जातनिहाय जनगणना करण्यास त्यांनी सार्वजनिक आणि राजकीय दबाव महत्त्वाचा ठरला असे ते म्हणाले.
जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ही काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, आम्ही हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, ‘‘आम्ही संसदेत म्हटले होते की आम्ही जातीय जनगणना करू. आम्ही असेही म्हटले होते की आम्ही ५०% आरक्षणाची मर्यादा रद्द करू. काय झाले माहित नाही पण अचानक ११ वर्षांनी जातीय जनगणना जाहीर करण्यात आली.’’ (Caste census)
या उपक्रमासाठी तेलंगणा हे एक मॉडेल असल्याचे सांगून गांधी म्हणाले की केंद्रासाठी ते ब्लूप्रिंट म्हणून काम करू शकते. ‘‘ जातनिहाय जनगणना निर्णयाचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो, परंतु आम्हाला एक कालमर्यादा हवी आहे.’’
बिहार आणि तेलंगणा ही दोन स्वतंत्र दोन उदाहरणे आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये खूप फरक आहे.
त्यासाठी व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा सांगताना गांधी पुढे म्हणाले, “जातीय जनगणना ही पहिली पायरी आहे. आमची भूमिका जातीय जनगणनेतून विकासाचे एक नवीन आदर्श मॉडेल आणण्याची आहे. केवळ आरक्षणच नाही तर आमचे अन्य काही मूलभूत प्रश्नही आहेत. ओबीसी असोत, दलित असोत वा आदिवासी असोत त्यांचे विकासप्रक्रियेत किती स्थान आहे?’’ (Caste census)
त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाला परवानगी देणाऱ्या कलम १५(५) ची अंमलबजावणी सुरू करण्याचे आवाहन केले. ‘‘हा आधीचाच कायदा आहे. सरकारने त्याची अंमलबजावणी सुरू करावी अशी आमची इच्छा आहे,’’ असे ते म्हणाले.
पहेलगाम प्रकरणात लवकर कारवाई करा
राहुल गांधी यांनी पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘या हल्ल्यात २८ लोक निर्दयीपणे मारले गेले आहेत. यासाठी कोण जबाबदार आहे हे अगदी स्पष्ट आहे. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना किंमत मोजावी लागेल. पंतप्रधानांनी कारवाई करावी. कारवाई स्पष्ट असली पाहिजे. त्यात कसलाही गोंधळ नको. पंतप्रधानांनी टाळाटाळ करू नये, वेळ वाया घालवू नये. ते त्यांना आवश्यक वाटेल त्या वेळेत कारवाई करू शकतात परंतु त्यांना लवकरच कारवाई करावी लागेल.’’
भाजपचे प्रत्युत्तर
दरम्यान, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेस आणि राहुल गांधी जातीय जनगणनेच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “मी राहुल गांधींना विचारू इच्छितो की, अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होती, मग त्यांनी जातीय जनगणना का केली नाही?”
हेही वाचा :
जातनिहाय जनगणना करणार
कॉमनवेल्थ घोटाळ्याचे राजकारण