मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र?

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह असला, तरी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून, मराठा समाजाची नाराजी अधिक होऊ नये म्हणून भाजप धक्कातंत्र वापरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अचानक नवे चेहरे आणून भाजपने देशात जे बेरजेचे राजकारण केले, तसेच राजकारण महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री देऊन केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना महाराष्ट्रात पाठवण्याची चर्चा सुरू आहे. याशिवाय चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील यांचीही नावे घेतली जात आहेत. मुख्यमंत्रिपदाप्रमाणेच मंत्र्यांसाठीही काही अपवाद वगळता वयाचा निकष लावण्याची चर्चा सुरू असून, इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर भेट होण्याअगोदर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि शाह यांच्यात खलबते झाली. राज्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून मराठा आंदोलन अधिक तीव्र झाले. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आरक्षणाची लढाई गाजली. त्यांच्या उपोषणामुळे सरकारने अनेकदा नमते घेतले, तरीही जरांगे यांचा भाजप आणि फडणवीस यांच्यावरील रोष कमी झाला नाही. त्यांनी आता सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा यांच्यातील दरी कमी करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. काही नेते आजही सर्वसामावेशक आहेत. ते ओबीसी आणि मराठा समाजासह सर्वांसाठी अनुकूल आहेत. ओबीसींचे राजकारण करून आता सत्तेत आलेल्या भाजपसमोर फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे का, याची चाचपणी सुरू आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास राज्यातील राजकारणाची दिशा काय असेल, त्याचा राज्यात काय संदेश जाईल याची चर्चा होत आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काय परिणाम होईल, याची चर्चा शाह आणि तावडे यांच्यात झाली असावी, असा अंदाज आहे.

बिगर मराठा चेहरा दिल्यास त्याचे काय पडसाद उमटतील, याची पण चर्चा होत आहे. ब्राह्मण, मराठा आणि ओबीसी या तिघांना वगळून वेगळाच फॅक्टर समोर आणता येण्याची शक्यता काही जण वर्तवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह हे राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार येईल, असे कुणीही सांगत नव्हते; परंतु शिवराजसिंह चौहान यांनी ‘लाडली बहेन’ योजना आणून भाजपला प्रचंड विजय मिळवून दिला; परंतु त्यांना मोदी-शाह यांनी मुख्यमंत्री करण्याऐवजी केंद्रात नेले आणि राज्यात डॉ. मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावली. राजस्थानमध्येही वसुंधराराजे शिंदे किंवा शेखावत यांना संधी देण्याऐवजी ज्याचे नाव कुठेच चर्चेत नव्हते, त्या शेवटच्या रांगेतील भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्याचे धक्कातंत्र शाह-मोदी यांनी वापरले. महाराष्ट्रातही आता तशी चर्चा होत आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सहकार राज्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात भाजपचे वर्चस्व निर्माण करून शरद पवार यांच्या साखर कारखानदारीतील साम्राज्याला सुरुंग लावून जादा आमदार निवडून आणले. पुण्यातील भाजपच्या सर्व जागा निवडून आणल्या. चंद्रकांतदादा यांचे शाह यांच्यांशी चांगले संबंध आहेत, तर विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात महायुतीला १२ पैकी नऊ जागा निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मराठा समाजाला मुख्यमंत्रिपद द्यायचे झाले, तर या तीनपैकी एकाच्या नावाचा विचार होऊ शकतो. चंद्रकांतदादांनी भाजपच्या पूर्वीच्या धक्कातंत्राचा संदर्भ देत महाराष्ट्रात तसे होऊ शकते, असा संकेत दिला आहे. विखे-पाटील यांचे थेट मोदी आणि शाह यांच्याशी संबंध आहेत; परंतु फडणवीस यांनाही चालू शकेल आणि मोदी-शाह यांच्याही ‘गुड बुक’मध्ये असलेल्या मोहोळ यांचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते; पण आता चित्र काहीसे बदलल्याची स्थिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला महाराष्ट्रातील जातीय समीकरण साधायचे आहे. मराठा आरक्षणात भाजपचे हात पोळले आहेत. शाह आणि तावडे यांच्यात जवळपास ४० मिनिटांपर्यंत चाललेल्या बैठकीत तावडे यांनी शाह यांना महाराष्ट्रातील मराठा आंदोलनासंबंधी जो फिडबॅक दिला, तो फडणवीस यांच्या बाजूने नाही. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करण्यास विलंब होत आहे. सूत्रांच्या मते, महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे फिक्स आहे; पण तो कोण होणार, हा कळीचा मुद्दा आहे. तावडे यांनी शाह यांच्यासोबतच्या चर्चेत फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्याच्या स्थितीत मराठा समाज नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री दिला तर मराठा समाज नाराज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामु्ळे भाजप नवे समीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहे.

आमदारांची वाढली धाकधूक

भाजपने भविष्यातील निवडणुकांत फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत महायुतीच्या नव्या सरकारमध्ये तरुण नेत्यांना संधी दिली जाणार आहे. तरुण नेत्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० वर्षांवरील आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे. यामुळे या आमदारांची धाकधूक वाढली आहे.

गृह, अर्थ, नगरविकाससाठी भाजप आग्रही

महायुतीमधील चर्चेतून २१-१२- १० असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक २१, शिवसेनेला १२ व राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. अर्थ, गृह आणि सामान्य प्रशासन ही महत्त्वाची तीन खाती आपल्याकडे राहावीत, यासाठी भाजपचा आग्रह आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदासह महसूल, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात येऊ शकते. शिंदे यांच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात येऊ शकते.

Related posts

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला