मुंबई : प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आ. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आ. पाटील यांच्याबाबतीत बातम्या खोडसाळपणे पसरविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Awhad’s reaction)
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आ. जयंत पाटील यांच्यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पाटील यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. तसेच आमदार शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदग्रहण करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आव्हाड यांनी, ‘‘जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो,’’ असे म्हटले आहे. (Awhad’s reaction)
आव्हाड यांनी एकीकडे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळले असले तरी जयंत पाटील यांना अजित पवार गटाकडून पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी, जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला तर आमचे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील, अशी प्रतिक्रीया दिली.
आ. पाटील यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर आव्हाड यांच्याशिवाय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या स्तरावर बैठक झाली असून त्यातील निर्णय लवकरच जाहीर होईल. “प्रदेशाध्यक्ष नाही पण इतर पद मिळाले, तर पक्ष संघटनेसाठी आणखी चांगले काम करू शकतो,” असे ते म्हणाले.
…त्यांनाही शुभेच्छा : मुख्यमंत्री
दरम्यान, राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देताना, “तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा आणि जे नवीन होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा,” असे मत व्यक्त केले.
हेही वाचा :
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा
ईडीकडून रोहित पवार यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल