जमीर काझी : नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीबद्दल विरोधक सातत्याने आक्षेप घेत असतात.त्यामध्ये बराचवेळा तथ्य असल्याचेही जाणकाराकडून बोलले जाते. बुधवारी मात्र त्यांच्यातील ‘रामशास्त्री प्रभूणे बाणा’ सभागृहात अनुभवावयास मिळाला.
अत्यल्पमतात असलेल्या दुबळ्या विरोधी पक्षाकडून मांडलेल्या रास्त मुद्द्यावर मंत्री आणि सरकारचे कान टोचले. इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची घोषणा केलीतरी त्यांच्याकडून वसुली चालूच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संताप व्यक्त करत आठ दिवसात योजनेची १००% अंमलबजावणी करावीच लागेल, त्याचबरोबर घोषणेनंतर टोल वसुली केलेली टोलवसुलीतील रक्कम संबंधित वाहनमालकांना परत करण्याचे आदेश दिले. (Assembly Speaker’s role of ‘Ram Shastri Prabhune)
त्याचवेळी मुंबईतील महापालिका शाळांच्या खासगीकरणाबद्दल काँग्रेसचे आमदार अस्लम शेख, यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा हे धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न करत असताना तेथेच थोपविले. तर नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पदावरून काढून टाकण्याबाबतचा प्रस्ताव का घेता येत नाही, याबद्दलची नियम व सभागृहाची मर्यादा सविस्तरपणे विषद केली. (Assembly Speaker’s role of ‘Ram Shastri Prabhune)
विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्याना अनुसरून निर्णय घेत सरकारला निर्देश
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबतचा निर्णय, त्याबाबतची दिरंगाईमुळे नार्वेकर नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. अधिवेशनाच्या काळातही ते बोलायला, आमच्या मागण्यांना फारसा वेळ देत नाही, अशी आरोप त्यांच्याकडून सातत्याने होत असतो. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात तारांकित प्रश्नवेळी मात्र त्याला विपरीत दृष्य पहावयास मिळाले, विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्याना अनुसरून निर्णय घेत सरकारला निर्देश दिले. त्यामध्ये ठाकरे गटाचे वर्सोव्याचे आमदार हारून खान यांनी क्रिस्टल पॉईट मॉलमध्ये वारंवार बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत आहे. त्यावर काहीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांच्याकडून दंडात्मक वसुली करण्यात आल्याचे सांगितले. मात्र दंड भरून नियमितीकरण करणे आणि पुन्हा बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याने त्यांच्यावर ‘ एमआरटीपी अक्टनंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना त्यांनी केली. (Assembly Speaker’s role of ‘Ram Shastri Prabhune)
अध्यक्ष नार्वेकरांनी मंत्री लोढांना रोखले
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवणी येथे भाजपाकडून कथित घुसखोरांच्या नावाखाली धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे तेथील बीएमसीची टाउनशिप शाळा पीपीटी तत्वावर चालवण्यास देऊन अपात्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य मंत्री मिसाळ यांना समर्पक माहिती देता आली नाही. त्यावर तेथील सह पालकमंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढा यांनी या भागात विशिष्ट समाजाची मताची टक्केवारी वाढली असल्याचे सांगू लागल्यानंतर नार्वेकर यांनी त्यांना थांबवून मुद्दावर बोलण्यास सांगितले. त्याबाबत वेगळी माहिती देऊ लागल्याने शेवटी शिक्षणमंत्री दादा भुसे उत्तर देण्यास उठले, त्यांच्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न झाल्याने अध्यक्षांनी चुकीची माहिती दिली जात असल्याबद्दल योग्य कार्यवाही करण्याची सूचना केली.
अध्यक्षांकडून सरकारची खरडपट्टी
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२५’ अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा (अटल सेतू) या प्रमुख महामार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्याच निर्णय राज्य सरकारने एप्रिलमध्ये जाहीर केला आहे, आणि २२ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचे मंत्र्याकडून सांगण्यात आले. मात्र अद्यापही तेथून इलेक्ट्रिक वाहनाचे ऑनलाईन पेमेंट कट होत असल्याची बाब वरूण सरदेसाई यांनी पुराव्यानिशी सादर केली. त्यावर अध्यक्षानी त्याबाबत सरकारची खरडपट्टी काढली. येत्या आठ दिवसात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आणि ज्याच्या कडून चुकीची टोल वसुली झाली आहे, त्यांना ती रक्कम परत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली.
नाना पटोलेंना शांत केले
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त खोटी व चुकीची माहिती देत असल्याने त्यांच्या त्यांना पदावरून हटवण्याबाबतचा प्रस्ताव २४३ (क)अनुषंगाने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फारच आग्रही होते. मात्र नार्वेकर यांनी त्यांना सविस्तरपणे नियमावली वाचून दाखवित शांत केले, आजच्या तारांकित प्रश्नाच्या वेळी अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर पसरली होती.