मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

जमीर काझी; मुंबई : महायुती सरकारच्या बहुप्रतिक्षेत खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी  मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. पुणे,रायगड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, जळगाव,  सातारा, यवतमाळ या जिल्ह्यातील पालकमंत्री पद मिळविण्यासाठी  महायुतीत जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. एकाच जिल्ह्यावर भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून दावा केला जात असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात एकमत होण्यासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती काही दिवस लांबणीवर टाकली जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Maharashtra Cabinet)

विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबरला लागलेल्या निकालात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३७ जागा पटकावत पुन्हा सत्तेवर आले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ५ डिसेंबर उजाडावा लागला.त्यानंतर मंत्री पदासाठी घटक पक्षात रस्सीखेच कायम राहिल्याने मंत्रीमंडळ विस्तारासाठी आणखी १० दिवसाचा विलंब झाला.

 हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या राजभवनात ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.मात्र सहा दिवसाचे अधिवेशन संपेपर्यंत खाते वाटप करण्यात आले नाही. अखेर शनिवारी  रात्री मुख्यमंत्र्यांसह एकुण ४२ मंत्र्यांना खाते जाहीर करण्यात आले.त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  अपेक्षेप्रमाणे स्वत:कडे  गृह ,ऊर्जा सामान्य प्रशासन न्याय व विधी हे महत्त्वाचे विभाग आपल्याकडे ठेवले आहेत तर उपमुख्यमंत्री शिंदे यांना नगर विकास,  गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम) आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन आणि उत्पादन शुल्क ही महत्त्वाची विभाग सोपवण्यात आले. त्याशिवाय अन्य बहुतांश मंत्र्यांकडे मागच्या सरकार मधली खाती कायम ठेवण्यात आली आहेत. आता मंत्र्यांची पालकमंत्री मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे. (Maharashtra Cabinet)

पालकमंत्री पदासाठी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाद आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे व सेनेचे भरत शेठ गोगावले यांच्यामध्ये प्रचंड चढाओढ आहे. सरकारची स्थापना होण्यापूर्वीच सेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना पालकमंत्री करू नये, अशी उघड भूमिका घेतली होती.  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहण्याचे शक्यता आहे मात्र या ठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे इच्छुक आहेत. पुण्यात संधी न मिळाल्यास  ते कोल्हापूरसाठी  आग्रह करतील अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर हे दोघे मंत्री असून जेष्ठत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुश्रीफ यांच्यासाठी आग्रही असतील. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने मंत्रीपदाची संख्या लक्षात घेता मंत्री प्रकाश आबिटकर ही पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. (Maharashtra Cabinet)

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या चुलत बहिण भाऊंना मंत्रीपद मिळाले आहे .त्यापैकी दोघेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.  निवडणुकीनंतर या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचा  मास्टरमाइंड  वाल्मिकी कराड  असल्याचा आरोप होत असून त्याला  धनंजय मुंडे यांचे उघड वरदहस्त असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन, संजय सावकारे व शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे मंत्री असून महाजन व पाटील दोघे पालकमंत्री पदासाठी प्रयत्नशील आहे.

छ. संभाजीनगरचे पालकमंत्री मीच होणार, असे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट उघडपणे जाहीर केले असून भाजपचे मंत्री अतुल सावे यांनीही पालकमंत्रीपदासाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरला आहे.  सातारा जिल्ह्याचे पाकलमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून शंभूराजे देसाई आणि  सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले  यांच्यात चुरस आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचे वाटप करताना मुख्यमंत्री फडवणीस यांचा कस लागणार आहे.

हेही वाचा : 

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली