कोल्हापूरला नंबर एक बनवणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्ह्याला विकासात एक नंबर बनविण्याठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या संकल्पना राबवून कोल्हापूरच्या विकासाचा रोडमॅप तयार केला असल्याचे सांगून पाटील म्हणाले, औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्याला प्राधान्य देणार आहे. यामध्ये टॅलेंट एक्स्चेंजपासून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना संधी देण्यापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. जिल्ह्यातील ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल.

कोल्हापूर हे आयटी हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच स्थानिक उद्योगांच्या मदतीने रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून ते म्हणाले, कोल्हापूर २.० च्या अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल हब बनवण्यासाठी नवीन उद्योग उभारणी करणे तसेच सध्याच्या उद्योगांना अपडेट करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. इन्क्युबिशन सेंटरच्या माध्यमातून, मिशन रोजगारच्या माध्यमातून नवीन स्वयंरोजगार निर्माण करणार आहे. ‘वर्क फ्रॉम होमटाऊन’ अंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी नॉलेज सेंटर उभारणार आहे.

विमान कनेक्टिव्हीटी वाढवणार

पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, कोल्हापूर विमानतळावरील हवाई मार्गांची संख्या वाढवून देशातील अधिकाधिक शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. राधानगरी अभयारण्य तसेच अन्य पर्यटनस्थळांच्या विकासाकडेही लक्ष देणार आहे. श्री अंबाबाई, श्री जोतिबा, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, श्रीक्षेत्र आदमापूर या तीर्थक्षेत्रांना दर्जेदार पद्धतीने विकसित केले जाईल, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले जतन व संवर्धन करणार असल्याचे पाटील म्हणाले.

शेती, शेतीपूरक व्यवसाय मजबूत करणार

शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा कणा आहे. या व्यवसायाला चालना देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याबरोबरच दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून देणार आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येईल. तसेच काजू उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था करणार आहे. कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग युनिट्सचे जाळे जिल्हाभर उभे करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

कलाकारांसाठी अत्याधुनिक केंद्र

कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व प्रकारच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अत्याधुनिक केंद्र उभारणार असून यामध्ये लोककला, हस्तकला, सोनार काम आदी सर्व कलांचा समावेश असेल, असे सांगून पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम करणे, कोल्हापूर जिल्ह्यासाठी जादा एसटी बसेस उपलब्ध करुन देणे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करून कोल्हापूरची देशातील प्रमुख शहरे आणि बिझनेस हबशी कनेक्टिव्हिटी वाढवणे या गोष्टी प्राधान्य यादीवर आहेत.

वाहतूक विकेंद्रीकरण

बाह्यवळण रस्ते करून वाहतूक विकेंद्रीकरणाला प्राधान्य देणार आहे. जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक, पार्किंग, सिग्नल आणि सुरक्षा प्रणाली विकसित करणे तसेच जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विकसित करणार आहे. सध्या कोल्हापूर शहरातील एक हजार ५३ किलोमीटरपैकी ५०० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित रस्ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जातील. तसेच शहरातील ड्रेनेज व्यवस्था दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे पाटील म्हणाले.

शाहू इंटरनॅशनल सेंटरची स्थापना

कोल्हापूर जिल्ह्याला विकासात एक नंबर बनविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन करून पाटील म्हणाले, कोल्हापूरची क्रीडा परंपरा जपण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार आहे. कोल्हापूरची वैचारिक समृद्धी वाढवण्यासाठी शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू इंटरनॅशनल सेंटरची स्थापना करणार आहोत. समाजातील सर्व घटकांना समावून घेणारा अभ्यास, विकास पत्रिका, संशोधन, सेमिनार आदींसाठी काम करणार आहे. पुरासारख्या आपत्तीचे नियंत्रण व व्यवस्थापन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी