मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की आम्हाला बहुमत मिळेल. आमचे १६०-१६५ आमदार निवडून येतील; पण काही जण त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही त्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची व्यवस्था केली आहे,’ असे राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यात शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. आम्ही सर्वानुमते निर्णय घेऊ. अजून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही सगळे एकत्र बसून मुख्यमंत्री निवडू, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीसह महाविकास आघाडीनेही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आ. कडू हे नक्की कोणाच्या बाजूने जाणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती सरकारमध्ये कडू सहभागी होते. त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीपासून दूर जात परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने तिसरी आघाडी निर्माण केली. या आघाडीला महाराष्ट्रात १५ जागा मिळतील, असा दावा आ. कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीने आ. कडू यांच्याशी संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
‘आमच्या ‘प्रहार’चे किमान १० आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून १५ आमदार होतील. कोणत्याही आघाडीची सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. लहान पक्ष आणि अपक्ष, अशी आघाडी झाल्यानंतर मग सत्तेचे स्वरूप आणि दिशा बदलेल,’ असा दावा कडू यांनी केला आहे.
उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करू शकेल, अशा आघाडीसोबत जाणे पसंत करू, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.