बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली

झंस्कार नदीवर यंदा स्थिर बर्फ तयार झाला नाही, त्यामुळे दीर्घकाळानंतर पहिल्यांदाच चादर ट्रेक स्थगित करण्यात आला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उबदार होत चाललेल्या हिवाळ्याचा स्थानिकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम झाला आहे. (Chadar trek’s cancellation)

  • दावा डोल्मा

लेह, लडाख: यंदाच्या हिवाळ्यात ब-याच कालावधीनंतर पहिल्यांदाच नदी पूर्णपणे गोठली नाही. जिथे पूर्वी काही किलोमीटरपर्यंत जाड बर्फाची चादर पसरलेली असायची, तिथे आता निळसर-हिरवे वाहते पाणी दरीतून वाहताना दिसते. त्यामुळे, शतकानुशतके चालत आलेल्या एका हिवाळी परंपरेला ब्रेक लागला आहे.चादर ट्रेक साधारणपणे जानेवारीच्या सुरुवातीला सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत चालतो. कारण त्या काळात हिवाळ्यातील तापमान बर्फ स्थिर ठेवते. (The economy of the Himalayas has collapsed)

गोठलेली जीवनवाहिनी

गोठलेली झंस्कार नदी शतकानुशतके, हिमालयातील कडाक्याच्या हिवाळ्यात झंस्कारच्या दुर्गम खोर्‍यांना लेहशी जोडणारी एकमेव जीवनवाहिनी होती. बर्फाने डोंगरदऱ्या बंद झालेल्या आणि रस्ते महिनोनमहिने खंडित असताना, झंस्कार, लिंगशेड, न्येराक्स आणि युलचुंग येथील गावकरी या गोठलेल्या मार्गावरून अन्न, औषधे आणि आवश्यक वस्तू वाहून नेत असत. स्थानिक भाषेत “चादर” म्हणून ओळखली जाणारी ही बर्फाची चादर केवळ एक हंगामी मार्ग नव्हती, तर बाहेरील जगाशी जोडणारा अत्यावश्यक दुवा होती. कालांतराने, गरजेपोटी सुरू झालेली ही वाट हिमालयातील एक प्रसिद्ध हिवाळी ट्रेक बनली.१९९० च्या दशकाच्या मध्यापासून पर्यटकांनीही या गोठलेल्या नदीचा अनुभव घेण्यास सुरुवात केली. (Chadar trek’s cancellation)

हिवाळ्याच्या कडाक्यात, तापमान सुमारे -30°C पर्यंत घसरल्यावर ही नदी साधारणपणे जाड बर्फाच्या थरात रूपांतरित होते. जो सगळ्या दरीत पसरलेला असतो. काही ठिकाणी बर्फाची जाडी सहा ते दहा फूटांपर्यंत पोहोचते आणि जवळपास १५० किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात सलग गोठलेला मार्ग तयार होतो. (Chadar trek’s cancellation)

“जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बर्फ माणसांना चालण्यासाठी पुरेसा मजबूत असतो. आम्ही तीव्र थंडीमध्ये, पायाखाली बर्फ तडकण्याचा आवाज ऐकत प्रवास केला आहे. या गोठलेल्या मार्गाने आम्ही निमू येथे झंस्कार आणि सिंधू नद्यांच्या संगमापर्यंत गेलो आहोत. पिढ्यानपिढ्या, चादर ही केवळ वाट नाही, तर काळात कोरलेली एक आठवण आहे,” असे स्टांझिन स्टोबदान सांगतात—आता मात्र ही गोष्ट आठवणींतच उरली आहे.

बर्फाचा कमकुवत थर

यंदा अधिकाऱ्यांना हा ट्रेक स्थगित करावा लागला, कारण बर्फाचा थर खूपच कमकुवत आणि अस्थिर असल्याचे आढळले.ऑल लडाख टूर ऑपरेटर असोसिएशन (ALOTA) चे महासचिव त्सेवांग नामगेल यांनी सांगितले की, “पर्यटन विभाग, वन्यजीव विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि ALTOA यांच्या पथकाने झंस्कार नदीवर तीन-चार वेळा पाहणी केली. सुरक्षितपणे चादर ट्रेक आयोजित करण्यासाठी किमान ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत सलग मजबूत बर्फ असणे आवश्यक असते. दुर्दैवाने, यंदा बर्फ इतक्या अंतरापर्यंत तयारच झाला नाही.” (Chadar trek’s cancellation)

 नामगेल यांच्या म्हणण्यानुसार, काही भागात तयार होऊ लागलेला बर्फही रस्ते बांधकामादरम्यान नदीत पडणाऱ्या माती आणि दगडांमुळे वारंवार तुटत होता. चिलिंगमार्गे झंस्कार रोडचे काम सुरू असताना सैल माती आणि दगड नदीकडे ढकलले जातात, ज्यामुळे नाजूक बर्फाचा थर स्थिर राहू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.हा रस्ता आता झंस्कारला लेहशी जोडतो आणि हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा खुला राहतो. तो महत्त्वाचा संपर्क प्रकल्प आहे. मात्र, नदीत जाणाऱ्या ढिगाऱ्यामुळे तयार होणारा पातळ बर्फही तुटत असल्याचे त्यांनी सांगितले. (The economy of the Himalayas has collapsed)

लडाखमधील बदलते हिवाळे

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हिवाळ्यातील बदलत्या तापमानामुळे नदीवर स्थिर बर्फ तयार होऊ शकला नाही, त्यामुळे ट्रेकर्स, हमाल आणि सहाय्यक पथकांसाठी तो धोकादायक ठरला. “गेल्या पाच वर्षांच्या पाहणीदरम्यान असा अनुभव मला पहिल्यांदाच आला.” असे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे निरीक्षक त्सेरिंग अंगचुक यांनी सांगितले.“डिसेंबर आणि जानेवारीत दर दहा दिवसांनी पाहणी करूनही नदीवर कधीच व्यवस्थित बर्फ तयार झाला नाही. चालता येईल असा मजबूत थर तयारच झाला नाही.” (Chadar trek’s cancellation)

वैज्ञानिक आणि हवामान तज्ज्ञांच्या मते, चादर ट्रेक रद्द होणे हे पश्चिम हिमालयातील वाढत्या तापमान आणि बदलत्या पर्जन्यमानाच्या व्यापक पॅटर्नचा भाग आहे. लेह हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२६ चा हिवाळा मागील आठ वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान सरासरी तापमान -८.६ सेल्सियस होते, जे पूर्वीच्या हिवाळ्यांपेक्षा खूपच जास्त आहे. (Chadar trek’s cancellation)

गेल्या दशकात लेहमध्ये हिवाळ्यातील हिमवृष्टी अनियमित झाली आहे. काही वर्षांत डिसेंबर-जानेवारीत जवळपास हिमवृष्टीच झाली नाही, तर काही वर्षांत अचानक वाढ झाली. फेब्रुवारी २०१९ मध्ये ४८.१ सेमी हिमवृष्टी. इतिहासात कोरड्या असलेल्या या थंड वाळवंटी भागात उन्हाळ्यातील पावसातही वाढ झाली आहे. जुलै २०२३ मध्ये ५८.८ मिमी आणि ऑगस्ट २०२५ मध्ये ८०.३ मिमी पाऊस नोंदवला गेला, जो मागील पंधरा वर्षांतील सर्वाधिक आहे.

“हिमवृष्टी कमी आणि तापमान बदलते राहिल्यास नदी समान रीतीने गोठत नाही. त्यामुळे जाड सलग बर्फाऐवजी तुकड्या-तुकड्यांत आणि पातळ बर्फ तयार होतो,” असे लेह हवामान केंद्राचे संचालक सोनम लोटस यांनी स्पष्ट केले. (The economy of the Himalayas has collapsed)

हिवाळी अर्थव्यवस्थेवर परिणाम

चादर ट्रेकमुळे दर हिवाळ्यात लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. ट्रेक आयोजक, एजन्सी, हमाल, मार्गदर्शक, स्वयंपाकी आणि होमस्टे मालक यांचे उत्पन्न यावर अवलंबून असते. मात्र यंदा ट्रेक रद्द झाल्याने अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. “मी पंधरा वर्षांहून अधिक काळ चादर ट्रेकवर हमाल, स्वयंपाकी आणि गाईड म्हणून काम केले आहे, चांगल्या हिवाळ्यात मी दोन लाखांपेक्षा जास्त कमाई करायचो.” असे न्येराक येथील ३८ वर्षीय स्टांझिन स्टोबदान यांनी सांगितले.मात्र यंदा बर्फ तयार न झाल्याने त्यांना पर्यायी काम शोधावे लागले. “या हिवाळ्यात ट्रेकचे काम नव्हते, त्यामुळे मी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनसोबत मजूर म्हणून काम केले,” असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी भारत आणि परदेशातून शेकडो पर्यटक या ट्रेकमध्ये सहभागी होतात—कधीकधी पाचशेहून अधिक नोंदणी होते. मार्गावरील होमस्टे मालकांचेही उत्पन्न यावरच अवलंबून असते. त्यांनाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. “ते फक्त जवळचा गोठलेला धबधबा पाहतात आणि त्याच दिवशी निघून जातात. आमच्यासारख्या होमस्टेला त्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही,” असे नॉर्ला म्हणाले. (The economy of the Himalayas has collapsed)

पर्वतांकडून इशारा

झंस्कारची गोठलेली नदी पिढ्यानपिढ्या केवळ नैसर्गिक घटना नव्हती—ती दुर्गम गावांना बाहेरील जगाशी जोडणारा पूल होती. आता चिलिंगमार्गे लेह-झंस्कार आणि शिंकू पासमार्गे मनाली-झंस्कार असे रस्ते उपलब्ध झाले आहेत, त्यामुळे वर्षभर संपर्क शक्य झाला आहे. पण त्याचवेळी चादर ट्रेक नाहीसा झाला आहे. (Chadar trek’s cancellation)

अलीकडच्या काळात, या ट्रेकमुळे जगभरातील पर्यटक येऊ लागले आणि स्थानिकांसाठी नाजूक पण महत्त्वाची हिवाळी अर्थव्यवस्था निर्माण झाली. चादर ट्रेक रद्द होण्याचा परिणाम केवळ निसर्गावरच नाही, तर लोकांच्या आयुष्यावरही झाला आहे. हरवलेली “चादर” हे काहीतरी बदलत असल्याचे स्पष्ट संकेत आहे.

लडाखमध्ये घडत असलेले हे बदल केवळ स्थानिक नाहीत, तर संपूर्ण हिमालयीन परिसंस्थेतील बदलांचा भाग आहेत. उबदार हिवाळे, कमी हिमवृष्टी आणि कमी होत चाललेले गोठण्याचे कालखंड यामुळे शतकानुशतके टिकलेले नैसर्गिक चक्र बदलत आहे.जर चादर नाहीशी होऊ शकते, तर निसर्गाच्या नाजूक संतुलनावर उभ्या असलेल्या अनेक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय परंपराही नाहीशा होऊ शकतात. (The economy of the Himalayas has collapsed)

…………………

(महाराष्ट्र दिनमान आणि 101Reporters हे देशव्यापी नेटवर्क परस्परांशी सहकार्य करणार आहेत. त्यांच्या सहकार्याने हा वृत्तांत प्रसिद्ध करीत आहोत. दावा डोल्मा या स्वतंत्र पत्रकार असून 101Reporters या नेटवर्कच्या सदस्य आहेत.)

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन