कोल्हापूर : प्रतिनिधी : ऑस्ट्रेलियातील द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) च्या भारतातील शाखेने, म्हणजेच यू.डब्ल्यू.ए. (इंडिया) येथील कुलगुरू प्रा. अमित चाकमा यांनी आज शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शिवाजी विद्यापीठासोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन तसेच नव्या ज्ञानक्षेत्रांमध्ये सहकार्याच्या शक्यता यावेळी चर्चेत आल्या. (Vice-Chancellor of an Australian university visits Shivaji University)
दि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या विद्यापीठाने अंधेरी (मुंबई) येथे भारतातील पहिला कॅम्पस सुरू केला असून त्या कॅम्पसचे डॉ. चाकमा हे कुलगुरू आहेत. त्यांच्यासह विद्यापीठाच्या अकादमिक व धोरणात्मक सहकार्य व्यवस्थापक डॉ. केलिथा चेरियन यांनीही शिवाजी विद्यापीठास आज सकाळी भेट दिली. कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
कुलगुरू डॉ. चाकमा यांनी सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध सुविधा पाहण्यात मोठा रस दाखविला. विद्यापीठातील विविध अधिविभाग, संशोधन सुविधा, क्रीडा सुविधा यांसह विद्यापीठ परिसरातील जैवविविधता, विद्यापीठाने केलेले जलसंवर्धन इत्यादी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नजीकच्या कालखंडात शिवाजी विद्यापीठासमवेत निश्चितपणाने शैक्षणिक व संशोधकीय बंध निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. (Vice-Chancellor of an Australian university visits Shivaji University)
कुलगुरू डॉ. कामत यांनीही त्यांच्या भेटीविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, या भेटीमुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्ससारख्या भविष्यवेधी क्षेत्रांतील उपक्रम यांसाठी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधकांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या भेटीप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे हेही उपस्थित होते.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविषयी थोडक्यात…
द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे जगातील आघाडीच्या शंभर विद्यापीठांपैकी एक असून क्यूएस-२०२६ क्रमवारीत ७७ व्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’ (Go8) संशोधन विद्यापीठांपैकी ते एक आहे. भारतात कॅम्पस सुरू करणारे ते पहिले ‘Go8’ विद्यापीठ आहे. त्यांचे १३ विषय जगातील अव्वल ५० मध्ये गणले जातात. यूडब्ल्यूए-इंडियाचे कॅम्पस अंधेरी (मुंबई) आणि चेन्नई येथे आहेत. मुंबई कॅम्पससाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मंजुरीचे पत्र मिळाले असून चेन्नई कॅम्पसच्या मंजुरीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
यूडब्ल्यूए-इंडियाकडून कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, बिझनेस मॅनेजमेंट, ग्लोबल बिझनेस, एंटरप्राइज अँड इनोव्हेशन हे पदवी अभ्यासक्रम, तसेच एमबीए आणि मास्टर ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी आणि उद्योगजगताशी जोडलेले शिक्षण हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. (Vice-Chancellor of an Australian university visits Shivaji University)