ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन

Veteran publisher Anil Mehta has passed away

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी प्रकाशनविश्वात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ प्रकाशक अनिल डी. मेहता ( वय ८६) यांचे निधन झाले. पुस्तक, लेखक, वाचक आणि प्रकाशनविश्व यांच्यातील नाते अधिक समृद्ध करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या अनिल मेहता यांच्या निधनाने मराठी प्रकाशन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. (Veteran publisher Anil Mehta has passed away)

पुस्तक व्यवसायात १९६३ मध्ये प्रवेश

अनिल मेहता यांचा जन्म ३ मार्च १९४१ रोजी झाला.  पुस्तक व्यवसायातील १९६४ मध्ये पाऊल टाकले. कोल्हापूर येथील मेहता बुक सेलर्सपासून सुरू झालेल्या या प्रवासाला १९७५ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसच्या उभारणीमुळे नवे वळण मिळाले. आपल्या दूरदृष्टीने, व्यावसायिक कौशल्याने आणि पुस्तकांवरील निष्ठेने त्यांनी या संस्थेची उभारणी केली आणि मराठी प्रकाशनविश्वात तिला अग्रस्थान मिळवून दिले.

तीन हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित

मेहता पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून त्यांनी आजवर सुमारे तीन हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. दरवर्षी सुमारे १५० नवीन पुस्तके आणि ५० हून अधिक पुनर्मुद्रणे प्रकाशित करण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. अनेक नवोदित आणि तरुण लेखकांना त्यांनी प्रकाशनाची संधी दिली आणि मराठी वाचकांसमोर नवे साहित्यविश्व खुले केले.

परकीय भाषांमधील साहित्य मराठीत अनुवाद

मराठी साहित्याची क्षितिजे विस्तारण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतीय तसेच जागतिक साहित्य मराठीत आणण्यावर विशेष भर दिला. हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली, ओरिया यांसारख्या भारतीय भाषांबरोबरच जपानी, जर्मन, कोरियन, फ्रेंच अशा परकीय भाषांमधील साहित्याचे मराठी अनुवाद प्रकाशित केले. अरुण शौरी, नानी पालखीवाला, किरण बेदी, सुधा मूर्ती, तस्लिमा नसरीन, जसवंत सिंह अशा नामवंत लेखकांचे साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (Veteran publisher Anil Mehta has passed away)

लंडन, अमेरिकेत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

मराठी पुस्तकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. पॅरिस बुक फेअर, मॉरिशसमधील वर्ल्ड मराठी ऑर्गनायझेशन अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी सहभाग नोंदवला. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन आणि अमेरिकेत मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यासारखे उपक्रमही त्यांनी राबवले. जागतिक पुस्तक मेळ्यांमध्ये मराठी प्रकाशनविश्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोजक्या प्रकाशकांमध्ये त्यांचा समावेश होता.

ग्रामीण भागात वाचन संस्कृतीसाठी शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप

प्रकाशन व्यवसायाकडे केवळ व्यावसायिक दृष्टीने न पाहता त्यांनी त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीची जोड दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप केले. महाराष्ट्राच्या विविध भागांत साहित्यिक आणि मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन केले. प्रादेशिक भाषांतील प्रकाशकांना मदत करणे, नवोदित पुस्तक विक्रेत्यांना प्रोत्साहन देणे आणि लेखकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष तसेच फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचे पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा १९९६-९७ चा ‘डिस्टिंग्विश्ड पब्लिशर’ आणि ‘व्ही. पी. भागवत पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या प्रकाशन संस्थेतील पुस्तकांना साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे पुरस्कारही लाभले. १९९१ मध्ये पुणे महानगरपालिकेने त्यांचा विशेष सन्मान केला. त्यांचा समावेश आयबीसीच्या ‘हूज हू’मध्येही करण्यात आला होता.

प्रकाशक म्हणून त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीने मराठी प्रकाशनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात केली. मराठी साहित्यविश्वात अनुवादित साहित्याला प्रतिष्ठेचे आणि हक्काचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जगभरातील नामवंत लेखकांचे साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांनी मराठी वाचकांची अभिरुची समृद्ध केली. त्यांनी निर्माण केलेला हा समृद्ध वारसा पुढे असाच जपण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा माझा आणि साहिल मेहता याचा सदैव प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया मेहता पब्लिशन हाऊस पुणेचे संचालक अखिल मेहता यांनी दिली आहे. (Veteran publisher Anil Mehta has passed away)

Related posts

शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार : आमदार कौस्तुभ गावडे

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुश्रीफांविरोधात २७०० पानांची तक्रार ईडी कडे देणारे किरीट सोमय्या  गप्प का?