कणकवली : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार दोन लाचखोर तलाठ्यांनी केल्याची घटना रविवारी घडली. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते स्वीकारुन लाचखोरांना राजाश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांना द्यायचा होता का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस रविवारी (दि.११) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते हेलिकॉप्टरमधून उत्तरल्यावर त्यांचे स्वागत जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याचा संकेत आहे. पण लाचेचा गुन्हा नावावर असलेले वायंगणीचे तलाठी वैजीनाथ कंठाळे आणि कसालचे मंडल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार केला. यावेळी मंत्री नितेश राणेही यावेळी उपस्थित होते.
कोण आहेत दोन तलाठी ?
मुख्यमंत्र्याचा शाल घालून सत्कार करणारे वायंगणीचे तलाठी विठ्ठल कंठाळे यांनी २२ मार्च २०२२ मध्ये वाळू उपसावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यावसायिकांकडून २५ हजाराची लाच मागितली. तर मंडल अधिकारी संदीप हांगे यांनी खरेदी खताची नोंद सातबारावर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२१ राजी दहा हजाराची लाच मागितली होती. कंठाळे आणि हांगे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही केले होते. त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. दोन्ही तलाठ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय चौकशी सुरू आहे. ती थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
या लाचखोरांचा आका कोण? – मा. आमदार वैभव नाईक
मुख्यमंत्री फडणवीस यांचा लाचखोर तलाठ्यांनी सत्कार केल्याबददल माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते हेलिकॉप्टर मधून उतरले, तेव्हा त्यांचा सत्कार जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी करणे गरजेचे होते. अथवा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या दोन लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आहे. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून लाचखोर कर्मचाऱ्यांना राजश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा होता का? आणि कोणाच्या वरदहस्तामुळे या लाचखोर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची संधी देण्यात आली. बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लाचखोर कमर्चारी सापडत आहेत. या लाचखोर कर्मचाऱ्यांचा नेमका आका कोण असा सवालही या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित होत असून, देवेंद्र फडणवीस यांचे लाचखोर कमर्चाऱ्यांना अभय आहे का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.