UBT Fraction Protest: भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी होईपर्यंत आंदोलन सुरूच : उद्धव ठाकरे

UBT Fraction Protest

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमधील भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आणि सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द जनतेला जागृत करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सोमवारी (११ ऑगस्ट) जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले.  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाला तुफान प्रतिसाद लाभला. (UBT Fraction Protest)

शिवतीर्थावरून भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, आता चाय पे चर्चा नको…भ्रष्टाचारावर चर्चा होऊ द्या, असे आदेश  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिवसैनिकांना दिले. महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर येऊ घातलेल्या हुकूमशाहीविरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 शिवाजी  पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित जनआक्रोश आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो शिवसेनेतच आहे म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचाऱ्यांविरुध्द शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, असे सांगून ठाकरे यांनी,’ भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, या  घोषणेचा धागा पकडून म्हणाले,‘‘  मिंधे बिनडोक्याचे आहेत, त्यांना नुसते पाय आहेत सुरतेला आणि गुवाहाटीला पळून जायला, त्यांची डोकी नाहीत खोकी आहेत, दिल्लीत इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुध्द शिवसेना रस्त्यावर उतरली. भारतीय जनता पक्षाच्या जुलुमशाहीविरुध्द जनतेला आता रस्त्यावर उतरावेच लागेल. ती फक्त नेतृत्व कोण करतेय, याची वाट पाहतेय, असे सांगून ते म्हणाले की,’ छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधुसंतांचा महाराष्ट्र असे आपण दरवेळेला सांगतो. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो. असा हा गौरवशाली व अभिमान वाटणारा महाराष्ट्र भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे?’’ (UBT Fraction Protest)

महाराष्ट्रात कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो अशी परंपरा आहे. आपणही मुख्यमंत्री असताना महिलांसंबंधी आरोप असणाऱ्या वनमंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याला वनवासात पाठवले होते. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शोभा फडणवीस, महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, रवींद्र माने या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले गेले होते. जनतेच्या मनात संशय आहे त्यामुळे राजीनामे द्या, चौकशीला सामोरे जा, निर्दोष ठरलात तर पुन्हा मंत्रिमंडळात घेईन, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बजावले होते. याला म्हणतात जनताभिमुख सरकार. तसे जनताभिमुख सरकार आता नाहीच आहे, आत्ताच्या सरकारचे फक्त पैसे गिळणारे मुख आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी डागले. (UBT Fraction Protest)

विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात पुराव्यानिशी महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांची लक्तरे वेशीवर टांगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा पुढे चालवणारे असतील, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करतील असा विश्वास होता. पण त्यांनी केवळ समज दिली असे सांगितले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘पुढच्या वेळी रमी नको खेळू तीन पत्ते खेळ. पुढच्या वेळेला बॅग उघडी ठेवू नको, पुढच्या वेळेला सावलीत डान्सबार नको भर उन्हात डान्सबार कर,’ अशी समज फडणवीसांनी दिल्याचा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

पाशवी बहुमत आहे आणि वर दिल्लीत बापजादे बसलेत तरी  फडणवीस यांची भ्रष्ट मंत्र्यांना काढण्याची हिंमत होत नाही, त्यांची  कीव येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीसांनी कदाचित स्वतः काही भ्रष्टाचार केला नसेल मग भ्रष्ट मंत्र्यांसाठी बदनामी का ओढवून घेत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

 यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे सुभाष देसाई, दिवाकर रावते, भास्कर जाधव, अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, उपनेते विनोद घोसाळकर, सचिन अहिरआदी उपस्थित होते.

जगदीप धनखड कुठे आहेत?

भ्रष्टाचाऱ्यांविरुध्द पुरावे देऊनसुध्दा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना तत्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलेत? ते कुठे आहेत? असा सवाल करून  ठाकरे  म्हणाले की, धनखड यांनी राजीनामा का दिला त्याचे कारणच समोर आलेले नाही. ते सरकारविरोधात कारस्थान करत असल्याचा संशय आल्याने त्यांना गायब केल्याचे दिल्लीत समजले.

चीनमध्ये सरकारविरोधात कोणी बोलले तर तो माणूस अदृश्य होतो. राजीनामा दिला असला तरी धनखड आहेत कुठे? तब्येत बिघडली असेल तर कोणत्या रुग्णालयात आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतोय? की भाजपने थेट त्यांचे ऑपरेशन केले आहे? धनखडांचे नेमके झाले काय? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला.

चाय पे चर्चा नको, भ्रष्टाचारावर चर्चा करा

२०१४ मध्ये मोदींनी चाय पे चर्चा केली होती. तसेच शिवसैनिकांनीही महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा करावी,  सलूनमध्ये बसा, रेस्टॉरन्टमध्ये बसा…भ्रष्टाचारावर चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन थांबणार नाही. गणेशोत्सवही आला आहे. त्यामध्येही महायुतीचा भ्रष्टाचार दाखवा, असे निर्देश यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर