कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीपासून बचाव व्हावा म्हणून शेकोटीजवळ शेकत बसलेल्या चौघांना कारने जोरदार धडक मारली. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. पुणे बेंगळुरू महामार्गाजवळील कोल्हापूर शहराच्या प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेलजवळ हा अपघात झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी कारचालक मुकेश अरुण अहिरे (वय २९, सध्या. रा. कारंडे मळा, कोल्हापूर, मुळ रा. मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Three killed in a car accident)
दिलीप आण्णाप्पा पवार (वय ६५, रा. गांधीनगर, जि. कोल्हापूर), सुधीर कमलाकर कांबळे (वय ४१, रा. घरनिकी, ता. आटपाडी, जि. सांगली), विनयसिंह गौंड (२७ रा. मौरदहा मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. जखमी नवला नारायण शेळके (४५ रा. कागल) याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Three killed in a car accident)
शाहूपुरी पोलिसांनी या अपघाताची माहिती दिली. या घटनेतील कारचालक मुकेश अहिरे याची इव्हेंमट मॅनेजमेंट कंपनी आहे. कराड येथील एका हॉटेलमध्ये त्याने कामासाठी कर्मचाऱ्यांना पाठवले होते. त्यांना परत आणण्यासाठी कार घेऊन तो कराडकडे निघाला होता. तावडे हॉटेल बसस्टॉपजवळ समोरुन येणाऱ्या वाहनाचा त्यांच्या डोळ्यावर लाईट पडल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. ब्रेक दाबण्याऐवजी त्यांनी एक्सलेटर दाबल्याने रस्त्याच्या कडेला शेकोटीजवळ थांबलेल्या चौघांना कारण जोरात धडक दिली. धडक देऊन कारने तिघांना फरफटत नेले होते. अपघातात घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला. काही जागरुक रिक्षाचालकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याचा अपघाताची माहिती कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस उप निरीक्षक घटनास्थळी आले. त्यांनी जखमीला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना कारचालकाला ताब्यात घेतले आहे. (Three killed in a car accident)