कोची : तब्बल १९ वर्षे भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणारे माजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचे बुधवारी कोट्टायम येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकविजेती कामगिरी केली. (Sunny Thomas)
बुधवारी कोट्टायम येथील राहत्या घरी थॉमस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते कोसळले. घरी रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. थॉमस यांच्यापश्चात पत्नी जोसाम्मा, दोन मुलगे व मुलगी असा परिवार आहे. थॉमस हे १९९३ ते २०१२ या काळात भारतीय नेमबाजीचे मुख्य प्रशिक्षक होते. भारताचे अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज घडवण्यामध्ये त्यांचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ मध्ये राज्यवर्धन राठोडने भारतातर्फे नेमबाजीत प्रथमच ऑलिंपिक पदक जिंकले. त्यापाठोपाठ, अभिनव बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताच्या नेमबाजीतील पदकांची संख्या दोनवर पोहोचली. यामध्ये विजय कुमारने रौप्य, तर गगन नारंगने ब्राँझपदकाची कमाई केली होती. २००१ मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (Sunny Thomas)
थॉमस यांच्या निधनाबद्दल अभिनव बिंद्राने एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहून शोक व्यक्त केला आहे. थॉमस हे प्रशिक्षकांपेक्षा अधिक काही होते. भारतीय नेमबाजांसाठी ते मार्गदर्शक आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने अतीव दु:ख झाले,” असे अभिनवने म्हटले आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेचे (एनआरएआय) अध्यक्ष कालिकेश नारायणसिंह देव यांनीही थॉमस यांच्या जाण्याने न भरून येणारी हानी झाल्याची प्रतिक्रिया दिली. (Sunny Thomas)
थॉमस यांनी कोट्टायम रायफल क्लब येथे नेमबाजीस सुरुवात केली. १९७६ साली ते स्वत: नेमबाजीत राज्य आणि राष्ट्रीय विजेते बनले होते. याशिवाय, उळवूर सेंट स्टिफन्स महाविद्यालयामध्ये त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ३० वर्षे सेवा बजावली. त्यांची अंत्यविधी १ मे रोजी काक्कनाडजवळील थेवाक्कल येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहेत.
हेही वाचा :