पणजी : उत्तर गोव्यात शनिवारी (३ मे) पहाटे मंदिर उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ६ जणांचा मृत्यू झाला. ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिरगाव गावातील श्री लईराई देवी मंदिरात पहाटे ही घटना घडल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. चौकशीचे आदेश दिले. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Stampede in Goa)
तपासणीनंतर चेंगराचेंगरीचे नेमके कारण स्पष्ट होईल. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक या उत्सवासाठी मंदिरात जमले होते. या दुर्घटनेमुळे सरकारने येथील पुढील तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट भेट घेऊन विचारपूस केली. ते म्हणाले, ‘‘आज सकाळी शिरगाव येथील लईराई जत्रा येथे झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले आहे. मी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलो आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.’’ (Stampede in Goa)
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘‘सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.’’
पंतप्रधान मोदी यांनी घेतला आढावा
सावंत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. या कठीण काळात त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Stampede in Goa)
‘‘गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
चेंगराचेंगरी कशी झाली?
माईमचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ‘‘काल पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध लईराई जत्रा सुरू होती. यावेळी गर्दी होती. एका उतारावर काही भाविक इतरांवर पडले. त्यामुळे गोंधळ उडाला. पळापळ झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. ४ जणांचे मृतदेह म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, २ मृतदेह सामुदायिक आरोग्य केंद्रात आहेत.’’
तथापि, पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले की, ‘‘उत्सवासाठी किमान ३०,००० ते ४०,००० लोक जमले होते आणि काही जण उतारावर उभे होते. काही लोक उतारावर पडले, ज्यामुळे इतर एकमेकांवर पडले.’’
त्यांनी पुढे सांगितले की ४० ते ५० लोक उतारावर पडले. या ठिकाणीच चेंगराचेंगरी झाली.
हेही वाचा :
निधीची पळवापळवी, शिरसाट संतापले!
इतिहासाच्या पुस्तकांत दक्षिणेवर अन्याय