‘ईव्हीएम’बाबत शरद पवार यांनाही संशय

पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल  असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही.  पण, निकालानंतर आता तथ्य दिसत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ईव्हीएम’ हॅक होण्याची शक्यता व्यक्त केली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिली. तेव्हा पवार बोलत होते. ९५ वर्षीय आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी पवार यांनी महात्मा फुले वाड्यात आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.

पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण, राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.  आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.  पण निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते.’’

“निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल. लोक जागृत आहेतच, त्यांना उठावासाठी तयार करावे लागेल. बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.” असे सांगून ते म्हणाले की, आढाव यांच्या उपोषणाने एकप्रकारचा दिलासा सामान्य माणसांना मिळत आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली; पण त्यांनी एकट्यानेच भूमिका घेणे पुरेसे नाही. जनतेचाही यासाठी उठाव व्हायला हवा, अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल.

विरोधकांना बोलू दिले जात नाही

देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत, त्यांना याची काही पडलेली नाही. संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला बोलू देत नाहीत. रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलायला उभे राहतात; पण त्यांना बोलू दिले जात नाही. मागच्या सहा दिवसात संसदेत देशाच्या एकाही प्रश्नाची चर्चा होऊ शकलेली नाही,” असे पवार म्हणाले.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ