Shani Shingnapur scam : शनि शिंगणापूर देवस्थानमधील दोषींवर फौजदारीचे आदेश

Shani Shingnapur scam

मुंबई  :  प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाह्य तपास यंत्रणांची नियुक्ती करण्याचे आदेशही दिले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. आमदार  विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित मांडली होती. यावेळी सदस्य सुरेश धस यांनी चर्चेत सहभाग घेतला. (Shani Shingnapur)

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसुल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत २४४७ बनावट कर्मचारी दाखवण्यात आले. त्यांच्या नावाने पगाराचे पैसे काही अन्य व्यक्तींच्या खात्यांत वळते करण्यात आले. रुग्णालय विभागात ३२७ कर्मचारी दाखवले गेले, प्रत्यक्षात केवळ १३ कर्मचारी उपस्थित होते. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी, १०९ खोल्यांच्या भक्तनिवासासाठी २०० कर्मचारी, १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी, प्रसादालयात ९७ कर्मचारी दाखवण्यात आले होते. इतर विभागांमध्येही असेच बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. (Shani Shingnapur)

देवस्थानच्या देणगी व तेल विक्री काउंटर, पार्किंगसाठी कर्मचारी, गोशाळा, शेती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत आणि सुरक्षा विभागातही बोगस कर्मचाऱ्यांची माहिती आढळली. बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सायबर पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू आहे. जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. (Shani Shingnapur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर